बिग बींनी मागावी माफी

    दिनांक :07-Nov-2019
|
बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेला ‘कौन बनेगा करोडपती’ हा रिअॅलिटी शो टीआरपीच्या यादीत चांगलीच बाजी मारत आहे. यंदाच्या पर्वाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असतानाच आता हा शो एका वादात अडकला आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये बिग बींनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने हा वाद निर्माण झाला आहे.
 

 
गुजरातच्या शाहेदा चंद्रन या हॉटसीटवर बसल्या होत्या. त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या पर्यायांमध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेला. ‘यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यासाठी चार पर्याय देण्यात आले.
१. महाराणा प्रताप
२. राणा सांगा
३. महाराजा रणजीत सिंह
४. शिवाजी
 
 
 
 
यामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करण्यात आल्याने चाहत्यांनी नाजारी व्यक्त केली आहे. तुम्ही औरंगजेबच्या नावापुढे ‘मुघल सम्राट’ लावू शकता तर राज्याभिषेक झालेल्या छत्रपतींचा उल्लेख एकेरी का?, असा प्रश्न विचारला जात आहे. काहींनी बिग बींनी याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे.