आसाममध्ये मोकाट फिरतोय्‌ ‘लादेन’

    दिनांक :07-Nov-2019
|
गुवाहाटी,
ओसामा बिन लादेनचा भलेही आठ वर्षांपूर्वी अमेरिकेने खातमा केला असेल, पण लादेनच्या नावाने आसाममध्ये अजूनही भीतीची लाट आहे. गेल्या आठवड्यात आसामच्या गोलपाडा जिल्ह्यात सर्वांच्या मुखी एकच प्रश्न होता, ‘लादेनला पकडले का’ हा लादेन एक जंगली हत्ती आहे. त्याने एकाच रात्री या भागात पाच जणांचा जीव घेतला आहे.
 
 
 
या हत्तीचा शोध घ्यायला वन खात्याचे अधिकारी ड्रोनच्या मदतीने संपूर्ण जंगल िंपजून काढत आहेत. लादेन आणखी कोणाचा जीव घेण्याआधी त्याला पकडण्याचे आव्हान वनखात्यापुढे आहे. त्याला ट्रॅन्क्विलायजर गनचा वापर करून बेशुद्ध केले जाणार आहे. तोपर्यंत आसामचे नागरिक जीव मुठीत धरून वावरणार आहेत.
 
 
वनविभागाच्या आकडेवारीनुसार, यावर्षी आतापर्यंत 57 लोक जंगली हत्तींचे शिकार ठरले आहेत. याच वर्षी जुलैमध्ये पर्यावरण आणि वन विभागाने आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार, अन्य राज्यांच्या तुलनेत आसाममध्ये हत्तींच्या हल्ल्यात मरणार्‍यांची संख्या सर्वाधिक आहे.
२००६ मध्ये हत्ती बनला 'लादेन'
आसामच्या गावांमध्ये जंगली हत्तींची इतकी दहशत आहे की शेत, पिकांवर, गावावर हल्ला करणाऱ्या प्रत्येक जंगली हत्तीला येथे 'लादेन' असं म्हटलं जाऊ लागलं. एकाला मारलं की त्याची जागा दुसरा हत्ती घेतो. ऑनररी वाइल्ड लाइफ वॉर्डन कौशिक बरुआ म्हणाले, 'नरभक्षक जंगली हत्तीला २००६ सालापासून लादेन म्हटलं जाऊ लागलं, २००६ मध्ये सोनितपूर जिल्ह्यात एक जंगली हत्तीने डझनभर लोकांना मारले होते. याच काळात दहशतवादी बिन लादेनही चर्चेत होता. याच वर्षाच्या सुरुवातीला लादेन नावाचा हा हत्ती ठार करण्यात आला आणि दहशतवादी लादेन २०११ मध्ये ठार झाला.'
प्रत्येक जिल्ह्यात एक लादेन
लादेन नावामुळे हत्तीच्या या संहाराची चर्चा प्रसारमाध्यमांमधून होऊ लागली आणि या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष गेले. प्रत्येक जिल्ह्यात असा एक तरी लादेन आहे.