निकचा लूक पाहून प्रियांकाला आली वडिलांची आठवण

    दिनांक :07-Nov-2019
|
आंतरराष्ट्रीय गायक निक जोन्स सध्या आपला आगामी चित्रपट ‘मिडवे’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये निक हा एकटम हटके लूकमध्ये दिसत आहे. प्रियांका चोप्रालाही आपला हा नवा लूक आवडला असल्याचं तिने सांगितल्याचं निक म्हणाला.
 
 
प्रियांका चोप्राला माझा मिशीतील लूक अतिशय आवडला असल्याचं निकनं एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. तिचे वडिल अशोक चोप्रा हेदेखील मिशी ठेवत असत. त्यामुळेच तिला माझा हा लूक आवडला असं निकनं सांगितलं. प्रियांका चोप्रा आणि तिच्या वडिलांचं अनोखं नातं होतं. अनेकदा तिने आपल्या वडिलांसोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत. निक जोन्सनंदेखील फादर्स डेच्या दिवशी आपल्या वडिलांसोबत एक फोटो शेअर केला होता. या फोटोसोबत त्यानं प्रियांका चोप्राच्या नावाचाही उल्लेख केला होता. मला तुम्हाला ओळखण्याची संधी मिळाली असती तर आवडलं असतं, असा संदेशही निकनं लिहिला होता.
निक जोन्सचा ‘मिडवे’ हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. रोनाल्ड एमरिच यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकन आणि जपानच्या नौदलामध्ये झालेल्या तणावावर हा चित्रपट भाष्य करतो. निक जोन्सनं या चित्रपटात वैमानिक असलेल्या ब्रूनो गायडोची भूमिका साकारली आहे.