सोनाली दिसणार अनोख्या भूमिकेत

    दिनांक :07-Nov-2019
|
सध्या ‘हिरकणी’ हा चित्रपटा बॉक्स ऑफिसवर तुफान चालत आहे. चित्रपटातील हिरकणीच्या भूमिकेतील सोनाली कुलकर्णी प्रेक्षकांना चांगलीच भावली असल्याचे दिसत आहे. आता सोनाली लवकरच एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘विक्की वेलिंगकर’ असे आहे. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबतच स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दोघींच्या वेगळ्या लूकला आणि ‘मास्क मॅन’च्या झलकला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
 
 
‘विक्की वेलिंगकर’च्या या टीझरमधून ‘मास्क मॅन’चा अधिक रुद्र आणि घाबरवणारा ‘चेहरा’ समोर आला आहे. चित्रपटाची नायिका सोनाली कुलकर्णीच्या गर्भगळीत अवस्थेमुळे प्रेक्षकांमध्येही एक भीती निर्माण होते. “ती काळाच्या विळख्यातून सुटू शकेल का?,” हे पडद्यावर उमटणारे शब्द काहीतरी अघटीत तर घडणार नाही ना, अशी धास्ती निर्माण करून जातात. ‘लाईफ इज फुल ऑफ सरप्रायझेस’, असे वाक्य सोनालीच्या तोंडी आहे. तसेच या चित्रपटामध्येही अनेक सरप्रायजेस दडलेली असतील असा कयास प्रेक्षक बांधून जातो. या टीझरची सध्या जोरदार चर्चा समाजमाध्यमांवर अर्थात सोशल मिडियावर सुरु झाली आहे.
“विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून ती एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहणाऱ्या नायिकेची ही कथा आहे,” असे चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ म्हणाले आहेत. सौरभ वर्मा यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘विक्की वेलिंगकर’मध्ये सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, संग्राम समेळ आणि रमा जोशी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.