अखेर 'त्या' पट्टेदार वाघाचा मृत्यू

    दिनांक :07-Nov-2019
|
भद्रावती,
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील शिवना नदी पात्रात दगडांच्या फटीत अडकलेल्या त्या वाघिणीचा अखेर गुरूवारी (7 नोव्हेंबर) पहाटे 3 वाजताच्या सुमारास मृत्यू झाला आहे. वन विभागाच्या बचाव पथकाकडून तिला वाचवण्याचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. 
 
 
बुधवारी पहाटे दोन चारचाकी वाहनाच्या दिव्याच्या प्रकाशाने घाबरून जावून शिरना नाल्याच्या पुलावरून या पट्टेदार वाघाने नदीच्या पात्रात उडी घेतली. त्यात तो खडकावर आदळल्याने गंभीर जखमी झाला. कमरेला इजा झाल्याने त्याला चालताही येत नव्हते. दरम्यान, तो नाल्याच्या पात्रातील दोन खडकांच्या मध्ये फसल्या गेला. त्याला निघता येत नव्हते. वाघ पात्रात अडकून असल्याचे कळताच भद्रावती येथील वनविभागाची चमू चंद्रपूर येथील बचाव पथक आणि इको-प्रो संस्थेचे कार्यकर्ते वाघाला बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. दुपारी 2 वाजताच्या दरम्यान वाघ अडकलेल्या अवस्थेतून बाहेर पडला व आणखी पात्रातच बाजूला गेला. तो पिंजर्‍यात अडकावा यासाठी क्रेनला पिंजरा लावून त्याच्याजवळ नेण्यात आला. परंतु, चिडलेल्या अवस्थेत असलेल्या वाघाने चक्क पिंजर्‍यावरच राग काढून पिंजर्‍याच्या गजांना चावण्याचा प्रयत्न केला. तो पाण्याजवळ असल्यामुळे त्याला डॉट करता आले नाही. रात्रभर त्याला वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. परंतु, त्यांना यश आले नाही.
   
 
गुरूवारी सकाळी 8 वाजता त्याला चंद्रपूर येथे नेवून शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. मृतक वाघ हा नर प्रकारातील असून, अंदाजे चार ते पाच वर्षाचा असल्याचे भद्रावतीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर यांनी सांगितले.