वॉचमन झाला सिरियल किलर

    दिनांक :07-Nov-2019
|
- विष देऊन केली 10 जणांची हत्या
हैदरहाबाद,
आंध्र प्रदेश पोलिसांनी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आणले आहे. या प्रकरणाने सर्व राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी उघड केलेले हे प्रकरण एका सिरियल किलरचे असून त्याने गेल्या दोन वर्षात ‘सायनाइड’ हे जहाल विष देऊन तब्बल 10 जणांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सम्हाद्री उर्फ शीवा असे त्याचे नाव असून व्यवसायात अपयश आल्यानंतर तो वॉचमनची नोकरी करत होता. थरकाप उडविणारी ही घटना आंध्रातल्या वेस्ट गोदावरी जिल्ह्यातली असून हे प्रकरण उडकीस आल्यानंतर पोलिसही हादरून गेले आहेत. शीवाची पोलिस कसून चौकशी करत असून त्यामुळे अनेक हत्या प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. शीवा याला व्यवसायात अपयश आले होते, त्यामुळे तो लहान सहान कामे आणि नोकरी करून आपले पोट भरत होता. नंतर मात्र पैशाच्या हव्यासापोटी त्याची नियत बिघडली आणि तो गुन्हेगारीकडे वळला. त्यासाठी त्याने खास मोडस ऑपरेंडी बनवली होती. तांदूळ खेचू शकणारे एक दैवी नाणे आपल्याकडे आहे. त्यामुळे घरात पैसा येतो असे खोटे सांगून तो लोकांना फसवत होता.
 
 
 
 
शीवाकडे असे एक चुंबकत्व असलेले नाणे होते त्यामुळे तांदूळ आणि इतर काही गोष्टी आकर्षित होत होत्या. चुंबकासारखे असणारे हे नाणे दैवी असल्याची तो फुस लोकांना घालत होता. लोकंही जास्त पैसे मिळतील या आकर्षणापोटी ते नाणे घेण्याची इच्छा व्यक्त करत. अशा लोकांकडून शीवा टोकन म्हणून पैसे घेत होता. नंतर त्यांना प्रसाद म्हणून काही खायला देत असे. त्यात ‘सायनाइड’ हे अतिशय जहाल असलेले विष तो त्या प्रसादात मिसळत होता. तो विषारी प्रसाद खाल्ल्यानंतर काही मिनिटांमध्ये त्या माणसाचा मृत्यू होत असे.
 
 
 
हा प्रसाद द्यायला तो रात्रीची वेळ निवडत असे. तो माणूस मृत्यूमुखी पडल्यानंतर त्याच्याजवळचा सर्व पैसा आणि सोने-नाणे तो पळवून नेत असे. अशा पद्धतीने त्याने दोन वर्षात 10 माणसांची हत्या केली. हे पैसे घेऊन तो मौज-मजा करत असे, अशी कबूली त्याने पोलिसांकडे दिली. सायनाइड हे विषय अतिशय जहाल असून ते जीभेला लागताच माणसाचा मृत्यू होतो.
 
 
 
शेख अमीनुल्ला बाबू ही व्यक्ती त्याला सायनाइड पुरवीत असल्याची माहिती उघड झाली असून त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. एका हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी त्या व्यक्तीच्या आसपास एक संशयीत फिरत असल्याचे आढळून आले त्यानंतर पोलिस शीवापर्यंत पोहोचले आणि सगळ्या खळबळजनक प्रकरणाचा उलगडा झाला.