धुक्यामुळे रेल्वेला उशीर होत असल्यास येणार संदेश

    दिनांक :07-Nov-2019
|
नवी दिल्ली,
धुक्यामुळे अनेकदा रेल्वे उशिराने धावत असतात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदवार्ता आहे. कारण आता धुक्यामुळे रेल्वेला उशिरा झाला तर एसएमएसच्या माध्यमातून प्रवाशांना त्याची माहिती मिळणार आहे. रेल्वे अधिकार्‍यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना खूप वेळ रेल्वेची वाट पाहायला लागू नये यासाठी फोनवर एसएमएसच्या माध्यमातून रेल्वेचे लोकेशन सांगितले जाईल. तसेच किती वेळात रेल्वे स्थानकात पोहचू शकते, याबाबतही माहिती देण्यात येणार आहे. प्रवाशांना खूप वेळ रेल्वेची वाट पाहायला लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
 
थंडीच्या दिवसात धुक्यामुळे रेल्वेला उशिर होतो. मात्र याचा त्रास हा प्रवाशांना सहन करावा लागतो. यंदा रेल्वे प्रशासनाने याची खबरदारी घेतली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धुक्यामुळे उशिरा होणार्‍या रेल्वेंच्या संख्येत घट झाली आहे. यंदा 15 टक्के सुधारणा झाली असून 71 टक्के रेल्वे या आपल्या वेळेवरचं स्थानकात दाखल झाल्या आहेत. तसेच प्राथमिक सुरक्षिततेकडे लक्ष देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
 
 
रेल्वे अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या वेळेत बर्‍याच अंशी सुधारणा झाली आहे. रेल्वे आपल्या वेळेत स्थानकात पोहतच असल्याने ही आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तसेच थंडीच्या दिवसात धुक्याचा फटका रेल्वे सेवेला बसू नये यासाठी उत्तम खबरदारी घेण्यात येत आहे. साधारणत: 15 डिसेंबरनंतर रेल्वेला धुक्याचा फटका बसण्यास सुरुवात होते. मात्र यंदा उत्तर भारतातील अनेक भागात धुक्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वेमध्ये धुक्यापासून वाचण्यासाठी ‘फॉग सेफ्टी डिव्हाईस’ लावण्यात आले आहे. ‘लोको पायलटला फॉग सेफ्टी डिव्हाईस’च्या माध्यमातून ‘ऑडीओ-व्हिज्युअल क्यू सिग्नल’ देतील. ते सिग्नल जवळ येतच रेल्वेचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी देखील हे डिव्हाईस काम करणार आहे.