तिच्या सुखाचं माहेरपण...

    दिनांक :08-Nov-2019
|
प्रॉक्सी थॉट
पल्लवी खताळ-जठार
 
पाणवठ्यावर असो किंवा सार्वजनिक नळावर, रस्त्यावर असो किंवा असो चालता-चालता, बाया-बायांच्या चालणार्‍या गप्पांचा ओघ हा न संपणाराच असतो. मात्र, यातूनच मनात चाललेल्या गोष्टींचे हितगुज एकमेकींपुढे उलगडले जाते. बाया-बायांच्या गोष्टीत एखादा विषय एकदम रंगून गेलेला असतो. यामध्ये कधी मनातली खदखद, तर कधी सोशिकतेचा सोस असतो. सासू सुनेच्या वादाचा अंशही असतो. नणंदेच्या अनेकदा माहेरी होणार्‍या फेर्‍यांची दखलही याच गोष्टीतून प्रकट होते. किती वेळा येते ती माहेरी, पत्ताच नाही. सासरच नाही तिला! अशा गोष्टींतून कुणी बाजू घेणारं असेल, तर बाईचं मन शांत होऊन जातं; पण नणंदेला, ‘‘बाई गं तू सारखी सारखी माहेरी येत जाऊ नकोस.’’, असं सांगण्याचं धाडस कुणाचंच नसतं. 

 
 
 
बाईचं रडणं, तिचं रुसणं, तिचा आनंद, तिचं हसणं सारं काही बाईच्या बोलण्यातून उलगडलं जातं. बाईचं दु:ख बाईपाशीच उलगडलं जातं. संसाराचं रहाटगाडं चालवताना येणारे कठिणाईचे प्रसंग एकमेकींना सांगताना धीर दिला जातो. बाईचं जीणं जगताना नको हा बाईचा जन्म, असं वाटून गेलं तरी, बाई उभ्या संसारात धीराने, खंबीरपणे कधी उभी राहून धीट बनते, ते तिचं तिलाही कळेनासं होऊन जातं.
 
 
सासूचा जाच सहन करणारी सून जेव्हा दुसर्‍या बाईसमोर आपल्या व्यथा मांडते, तेव्हा कंटाळा आला या सासूचा असंही म्हणते, तरी सासूचा भक्कम आधार बनून राहणारी ही तीच सून असते.
संसाराच्या व्यथा, दारिद्र्याचे धागे उसवताना श्रीमंतीचं स्वप्न नकळत तिच्या डोळ्यांत साठून राहतं. बाई-बाईची तुलना होताना, तिच्या फाटक्या संसाराला, ती आपल्या बोलण्यातून, हसण्यातून, समजूतदारपणातून नकळतच टाका घालून समाधानाची श्रीमंती प्रकट करते.
 
 
पावसाळा आल्यावर बाहेर ओघळणारा पाऊस कधीतरी तिच्या घरातही ओथंबणारा ठरतो. दु:खाचा पाऊस झेलणारी ती मग सार्‍या ऋतूमध्ये कमरेला पदर घट्ट खोवून खंबीरपणे उभी राहताना दिसते.
तिचं हसणं, गप्पांच्या ओघात बोलून जाणं याचा अर्थ ती फार आनंदी आहे, असा नसतोच मुळी. आतून ती कुठेतरी हरवून गेलेली असते. स्वभावातून प्रकटताना खोल- खोल विचारांनी खंगत गेलेली असते. प्रपंचाचं दु:ख सोसतानाही चेहर्‍यावर भविष्यातील आनंदाचा विचार करणारी ती नेहमी हसतमुख राहणं पसंत करत असते.
 
 
बाया-बायांच्या गोष्टीत खरंतर ग्रामीण रूप उमटून जातं. एकमेकींच्या आधाराने उभ्या राहणार्‍या त्यांच्या सगळ्या आनंद-दु:खाचं गणित त्यांच्या विचारांतून उमलणारं ठरत असतं. एकमेकींचा सल्ला ग्राह्य मानला जात असतो. विचारांचे कंगोरे एकमेकींना समाजात उभे करत असतात. वैचारिक, आर्थिक स्रोत एकमेकींच्या सहाय्याने उभी राहणारी मंडळे, ग्रुप, एकमेकींची स्तुती, काही त्रुटी या एकमेकींच्या चर्चेतूनच उमटत असतात, उमगत असतात.
 
 
एकमेकींची मनं समजून घेताना कधी रंगणार्‍या गप्पा, तर कधी गाण्यांच्या भेंड्या, कधी रंगसंगतीचा मेळ, कधी सणासुदीची आरास, कधी एकमेकींच्या संगतीने धरलेले उपवास, एकमेकींच्या साथीने चाललेला प्रवास, कधी भांडणे, रुसवे, नात्यांचा ओघ, आठवणींचे सूर, स्वयंपाकाच्या गोष्टी, सहलींच्या गप्पा, कधी रोजच्या होणार्‍या गप्पा, तर कधी कित्येक दिवसांच्या भेटीनंतर आश्चर्याने उंचावणार्‍या भुवया, मग तासन्‌तास रंगणारं गप्पाष्टकच!
 
 
सुख-दु:खाच्या गोष्टींनी ओलावणार्‍या पापण्यांच्या कडा, दिलेला धीर, संकटकाळी दिला जाणारा आधार हा एकमेकींना त्यांच्या संगतीतून, गप्पांच्या ओघातूनच मिळणारा.
कुणाचा नवरा दारू पितो, कुणाच्या नवर्‍याला नोकरी नाही, कुणाचा मुलगा सुनेसह वेगळा संसार थाटून राहिला, तर कुणाच्या नातेवाइकांनी सारी इस्टेट बळकावली, अशा एक ना अनेक गप्पा रंगतात. जिथे सुख-दु:ख वाटून घेतलं जातं, जिथे खांद्यावर आधाराचा हात टेकला जातो, जिथे बाईच्या विचारांना वाट मोकळी होते, तो मैत्रिणींचा ग्रुप जेथे एकत्र येतो, तिथे बाया-बायांच्या गप्पा रंगतात.
अनेक गोष्टींतून मनं मोकळी होतात. एखादीवर आलेली परिस्थिती लगेच बदलत नाही, मात्र तिला एक आधार मिळून जातो, डोळ्यांतून वाहणार्‍या अश्रूंतून मन हलकं होऊन जातं. विचारांचा, सल्ल्यांचा मेळ होऊन तिला आधार मिळून जातो आणि ती पुन्हा उभी राहते, नवेपणाने, नव्या नव्या जोमाने भविष्याच्या नव्या वाटा धुंडाळण्यासाठी!
संस्कृत शिक्षिका, महाल, नागपूर