आर्थिक मदत आणि ट्रकचालकाच्या अटकेसाठी मृतदेह पोलिस ठाण्यात

    दिनांक :08-Nov-2019
|
रामनगर ठाण्यात तणाव
ट्रकच्या धडकेत चिमुकल्याचा बळी
.
चंद्रपूर, 
ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या 9 वर्षीय चिमुकल्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, त्या ट्रकचालकास अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागण्यांसाठी मृतकाच्या कुटुंबियांनी शुक्रवार, 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता चिमुकल्याचा मृतदेह चक्क रामनगर पोलिस ठाण्यात आणून ठेवला. त्यामुळे येथे तणाव असून, वातावरण चिघळू नये म्हणून पोलिस ठाणे परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वृत्तलिहेस्तोवर या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू होती.
 

 
 
26 ऑक्टोबर रोजी दुर्गापूर परिसरातील मेजर गेटजवळ राहणारे अमृत नाईक व त्यांचा मुलगा वेदांत काही कामानिमित्त जनता महाविद्यालय चौकात आले होते. अमृत नाईक यांच्या दुचाकीला मागून एका वाहनाने धडक दिली. त्यामुळे दुचाकीवर बसलेला वेदांत खाली पडला. या अपघातात वेदांत गंभीर जखमी झाला होता. घटनेच्या दिवशी वेदांतला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात आले होते. नागपूर येथील एका रूग्णालयात सलग 15 दिवस तो मृत्यूशी झुंज देत होता. मात्र, शुक्रवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मुलाच्या मृत्यूस ट्रकचालक जबाबदार असल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी मृतदेह थेट रामनगर पोलिस ठाण्यात आणला. पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. मृताच्या कुटुंबियास आर्थिक मदत करावी व ट्रकचालकावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी, या मागण्या नातेवाईकांनी केल्या. पोलिस प्रशासनाने समजूत काढली. पण, नातेवाईक ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंद नांदेडकर यांनी ठाण्याला भेट देवून संतप्त जमावाला शांत करण्याचे प्रयत्न केला. वृत्तलिहिपर्यंत चर्चा सुरू होती.