वासुदेव बळवंत फडके व ‘वंदे मातरम्‌!’

    दिनांक :08-Nov-2019
|
दिलीप भास्कर नानोटी
 
वासुदेव बळवंत फडके यांचा कार्तिक शुद्ध 5, शके 1767 या तिथीस म्हणजेच 4 नोव्हेंबर 1845 ला जन्म झाला. 3 जून 1818 साली बाजीराव (द्वितीय) पेशव्यांच्या शरणांगतीनंतर ब्रिटिशांच्या अनिर्बंध सत्तेला हवे तसे पाय पसरविण्यास मोकळीक मिळाली. दुर्दैवाने, 1857 च्या स्वातंत्र्यसंग्राम काही त्रुटीमुळे अयशस्वी ठरला. त्यामुळे ‘ब्रिटिश इस्ट इंडिया’ कंपनीचे राज्य जाऊन राणी सरकारचे ब्रिटिश राज्य प्रस्थापित झाले. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी उठणार्‍या अपेक्षित स्फुलिंगांना तत्परतेने दडपून टाकण्यासाठी ब्रिटिशांनी आणखी पावले पुढे टाकलीत. छोट्या मोठ्या अपराधाला राजद्रोहासारखे कलम लावून लोकांना सर्रास तुरुंगात डांबणे सुरू झाले होते. ब्रिटिश कायद्याची लोकांवर भीतियुक्त जरब बसली होती. 

 
 
मात्र ब्रिटिश सरकारच्या लेखा विभागात नोकरी करणार्‍या तरुणाला ब्रिटिशांचा क्रूरपणा व गरिबांची विशेषतः शेतकर्‍यांची दयनिय अवस्थेची जाणीव नव्हती. वासुदेव बळवंत फडके लहानपणापासूनच हूड व दांडगाई करण्याच्या प्रवृत्तीचे होते. वासुदेवरावांचे हे बंडखोर बालपण आणि हा हूडपणा त्यांच्या बंडखोर आयुष्याकडे पाहता अगदी स्वाभाविक ठरतात. वासुदेवरावांची मराठी शिक्षणाची प्रगती उत्तम होती. त्यांच्या वडिलांची इंग्रज व इंग्रजी भाषेची नावड लक्षात घेता त्यांना इंग्रजी शिक्षण घेणे दुरापास्तच होतं. पण डॉ. विल्यम या युरोपियन मिशनर्‍याच्या सायंकालीन शाळेत जाऊन वासुदेवरावांनी इंग्रजी दोन दोन बुकापर्यंत शिकून चांगलीच प्रगती साधली. पुढे त्यांची मॅट्रिकची परीक्षा देण्याइतपत प्रगती झाली होती. पण तेव्हा मॅट्रिकची परीक्षाच सुरू झाली नव्हती.
 
 
लवकरच त्यांना ब्रिटिशांच्या सेना सामुग्री विभागात निरीक्षक म्हणून नोकरी मिळाली. आपल्या प्रखर बुद्धीने व विलक्षण कार्य-क्षमतेमुळे त्यांच्या वरिष्ठाने त्याना दोनच महिन्यांत म्हणजे 1865 साली पुण्याला सैनिक लेखा नियंत्रक यांच्या हाताखाली मिलिटरी फायनान्स विभागात नेमणूक मिळाली.
 
 
लेखा विभागात कार्यरत असल्याने ब्रिटिश करीत असलेल्या लुटीचा त्यांना अदांज आला त्यांनी सर्व ब्रिटिश निर्मित वस्तूचा त्याग केला.
ब्रिटिशांची दडपशाही वाढच चालली होती. विशेषतः शेतकरी वर्ग जास्तच नागल्या जात होता. वासुदेवराव खूप अस्वस्थ असत. ब्रिटिशाविरुद्ध बंड करण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देईना. शिवाय ब्रिटिशांनी 1878 ला ‘मुद्रण निर्ंबंध कायदा’ व शस्त्रबंदी कायदा करुन ब्रिटिशाविरुद्ध उठणारा आवाजच बंद करून टाकला. वासुदेवरावांनी ब्रिटिशांच्या दडपशाहीविरुद्ध जनजागृतीचे कार्य सुरू केले. त्यासाठी त्यांनी व्याख्याने देण्यास सुरुवात केली.
 
 
ना संघटना, ना कार्यकर्ते व ना आर्थिक सोय या विवंचनेत वासुदेव रावांना इंग्रजांविरुद्ध आंदोलन कसे सुरू करावे, हे कळेना. शेवटी 23 फेब्रुवारी 1879 ला वासुदेवराव फडक्यांनी घामारी या गावावर दरोडा टाकून ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले. प्रथमदर्शनी या दरोड्यास सरकारने नेहमीचा प्रकार समजून चौकशी प्रारंभ केली. आता वासुदेवरावांचे कार्यक्षेत्र सातारा, सांगली, नाशिक, खानदेश, वर्‍हाडपर्यंत पोहोचले. वासुदेवरावांना जनतेच्या पािंठब्यासोबत वृत्तपत्रांचापण पािंठबा मिळायला लागला. त्यांचे नाव अखिल भारतीय स्तरावर गाजायला लागले.
 
 
वासुदेव बळवतांच्या बडांचा शेवट काय झाला, याचे परीक्षण करण्यापेक्षा या बंडामुळे परतंत्र राष्ट्रांच्या लोकात ज्यांचे मानसिक धैर्य शून्य स्थरावर रुजले होते, त्यावर स्फुलिंग पडून आपण जेत्या विरुद्ध लढू शकतो, ही भावना जी 1857 च्या स्वातंत्र्य समरानंतर मृतवत झाली होती, ती परत जागृत झाली व त्यामुळे भारतात वासुदेवाच्या बलिदानानंतर स्वातंत्र्य वाद्याची व वीराची एक मोठी फळी पुढील काळास जन्मली.
 
 
वासुदेव बळवंत फडक्यांच्या बंडाच्या रोमहर्षक इतिहासाने तुरुंगातील हाल-अपेष्टांनी आणि व्याकुळ करणार्‍या बलिदानाने संपूर्ण हिंदुस्थानच पेटविला. सर्व देशभक्ताना स्फूर्तिदायक ठरलेले ‘वंदे मातरम्‌’ राष्ट्रगीत ज्या कांदबरित प्रथम प्रसिद्ध झाले, ती ‘आनंद मठ’ कादंबरी लिहिण्याची स्फूर्तीच मुळी बंकीमचंद्र यांना वासुदेव बळवंत यांच्या बंडाने दिली. त्याचा समग्र इतिहासच आता बाहेर आला आहे. आनंदमठमधील सथांल वासुदेवरावांच्या रामोश्याप्रमाणे अशिक्षित अर्धनग्न आणि टोळ्या बनवून हाहाकार करीत लुटालूट करणारे आहेत. आनंदमठ कादंबरीतील कथानक इतके परिणामकारक होते की तिच्यातील ‘वंदेमातरम्‌’ या राष्ट्रगीताने सारा भारतवर्ष पेटून उठला. डॉ. रमेशचंद्र मुझुमुदार म्हणतात-
 
 
57 च्या बंडानंतरच्या काळात हिंदुस्थानातील ब्रिटिश राज्य उलथून पाडण्याच्या उघड उघड उद्दिष्ठाने पहिली गुप्त क्रांती संस्था संघटित करण्याचे श्रेय वासुदेव बळवंत फडक्यांचे आहे.
 
9764645799