शेतकर्‍याचा विठोबा

    दिनांक :08-Nov-2019
|
मीनाक्षी मोहरील
 
 
दिवाळी संपली आणि चातुर्मास सरत आला. आषाढी एकादशीला क्षीरसागरी शयन केलेले भगवान श्री विष्णू कार्तिकी एकादशीला आता जागे होणार.
पुन्हा एकदा पंढरी ‘विठोबा- माऊली’च्या गजराने दुमदुमून उठणार.
आज सकाळी सकाळी- लाडक्या विठोबाची तीव्रतेनी आठवण होण्याचं कारण, म्हणजे- सकाळच्या वेळी मोबाईलवर एक संदेश आला, तो म्हणजे-
सर्व वयोवृद्ध म्हणजे, 60 वर्षांच्या वरती वय असणार्‍याा अर्थात ज्येष्ठ नागरिकांना ‘तीरुपती बालाजी’चं दर्शन विशिष्ट वेळी अवघ्या 30 मिनिटांत होणार. त्यासाठी अनेक प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पायर्‍या न चढता, रांगेत उभे न राहता, विनामूल्य चहा, कॉफी, नाश्ता, जेवण, रिक्षाची सोय इत्यादी इत्यादी! बाहेर शंभर रुपयांत मिळणारा प्रसादाचा लाडू त्यांना वीस रुपयांत दोन मिळणार!
 
 
 
 
ते सगळं वाचल्यावर माझ्या मनात आपला पंढरीचा विठोबा आणि त्या अनुषंगानी मनावर कोरलेल्या बहिणाबाईंच्या ओळी आलटून पालटून पिंगा घालू लागल्या.
सोन्यारुप्यानं मढला मारवाड्याचा बालाजी
शेतकर्‍याचा इठोबा पानाफुलामधी राजी....
अरे, इठोबा बालाजी, दोन्ही एकच रे देवा
सम्रितीनं गरिबानं केला, केला दुजाभाव.....
 
 
खरंच, किती खरी गोष्ट आहे नं ही? तीरुपती बालाजीच्या दर्शनासाठी एका विशिष्ट वर्गातली, श्रीमंत मंडळीच जाऊ शकणार! भरमसाट पैसे भरून त्यांना व्हीआयपी दर्शन, म्हणजे- जराही वेळ न घालवता तत्काळ दर्शन मिळणार! तिथे बालाजीला सोनं, चांदी, हिरे मोत्याच्या दागिन्यांनी मढवून काढणार, साजुक तुपातला, भरपूर सुकामेवा घालून केलेला भला मोठ्ठा लाडू प्रसाद म्हणून घेणार आणि गुडुप अंधारात अर्धा क्षण फक्त बालाजी नजरेसमोर येतो न येतो तोच घाईघाईने समोर ढकलल्या जाणार! त्याचं रुपडं डोळाभर बघताही येत नाही तर डोळ्यात साठवणं तर दूरच राहिलं! हे सगळं मनात येऊन आठवत राहतात.
 
 
आषाढी एकादशीच्या आधी सार्‍या दिशांनी, पंढरपूरच्या विठोबाच्या भेटीसाठी मैलोनमैल पायी चालत, मुखानी ज्ञानोबा माऊली तुकाराम, पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलचा गजर करीत, फुगड्या घालत, रिंगण तयार करत, डोक्यावर तुळशी वृंदावन, विठोबा रखुमाईच्या मूर्ती घेऊन, वादळ वारा पावसाची तमा न बाळगता, तहानभूक विसरून, एकमेकांशी गळाभेट घेत, भजन कीर्तनात दंग झालेले, विठोबाच्या दर्शनाची, भेटीची एकच आस मनी बाळगून, विठ्ठलमय झालेले, पंढरीच्या दिशेने निघालेले भोळे भाबडे वारकरी!
 
 
पांढर्‍या स्वच्छ वेषात, कपाळावर बुक्का लावलेले, सगळे एकसारखे दिसणारे, निष्पाप, भाबडे वारकरी! नाही तरी देवाच्या दरबारात सगळे भक्त सारखेच तर असतात की! तिथे कुठे गरीब श्रीमंत, काळा गोरा, उच्च नीच, हा भेदभाव असणार? म्हणून
सगळे वारकरी सारखेच!
 
 
आपला विठोबा ही त्याच्या भक्तांसारखाच, साधाभोळा! त्याला नको सोनं नाणं, हिरे मोती, दाग दागिने, नको पैसा अडका, आणि नको भारी वस्त्र!
 
 
तो फक्त भक्तांच्या भावाचा, प्रेमाचा भुकेला! कमरेवर हात ठेवून युगेन्‌ युगे आपल्या भक्तांची प्रेमानी प्रतीक्षा करत उभा असतो. भक्तांनी त्याच्या गळ्यात घातलेल्या, फुलं आणि तुळशीच्या हारांनी तो प्रसन्न होतो आणि खडीसाखर चिरंजीच्या दाण्यांनी तृप्त होतो.
 
 
दर्शनसुख तर विचारूच नका. पैसे नाही मोजावे लागत विठोबाच्या दर्शनासाठी! रांगेतूनच विठ्ठलाचं नाव घेत, गजर करीत आधी किती तरी वेळ मुखदर्शन होत राहतं, आणि पुढे तर गाभार्‍याशी जाऊन उभं राहिलं की डोळे भरून ते सावळं सुंदर, साजिरं , प्रसन्न रुपडं बघून मनात साठवून घेता येतं. प्रत्यक्ष पुजारी बुवांनी आपलं मस्तक, विठोबाच्या चरणांवर टेकवलं की आपोआप आपल्या अश्रूंच्या अभिषेकानी ती पवित्र चरणद्वय िंचबिंचब होऊन जातात. विठोबाच्या गळ्यातील तुळशीहार आपल्या गळ्यात पडला, की- सारा जन्म सार्थकी लागल्याचं समाधान मिळून जातं. विठू माउली प्रसन्न होऊन त्याच्या भक्तांना भरभरून आशीर्वाद देते, त्यांचे अश्रू पुसून त्यांना उराशी कवटाळून धरते. असा हा भोळ्या भाबड्या वारकर्‍यांचा, गरीब भक्तांचा, भोळा भाबडा विठोबा आपल्या सगळ्या भक्तांना निश्चितच पावतो. जवळ घेतो. त्यांच्यावर समान कृपादृष्टी ठेवून असतो. बालाजीचं माहीत नाही
 
 
मात्र आपणा सर्वसामान्यांचा, शेतकरी वर्गाचा लाडका विठोबा मात्र खरोखरच पाना-फुलांमध्येच खूश असतो. आनंदी असतो. प्रसन्न असतो.

9923020334