कार्तिकीचा सोहळा। चला जाऊ पाहू डोळा।।

    दिनांक :08-Nov-2019
|
अंजली तालुकदार
 
जगातील प्रत्येक व्यक्ती (स्त्री म्हणा किंवा पुरुष) संसारात तसे संपूर्ण आयुष्यात सुखाची याचना करीत असतो. त्यासाठी त्याची अखंड धडपड सुरू असते. या धडपडीतून प्रत्येक व्यक्तीचे सुखप्राप्तीचे स्वप्न किंवा आंतरिक इच्छा पूर्ण होतेच, असे नाही. जोवर हा सुखप्राप्तीचा मार्ग गवसत नाही, तोवर तो जीव (मनुष्यरुपी) सुखी, समाधानी होत नाही. मग सुखाचा मार्ग मिळविण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपले अंतरंग जाऊन आपल्या हातून काही धार्मिक कार्ये व्रत, वैकल्ये, कुळाचार, सणवार घडावेत, यासाठी प्रयत्नशील असते. नंतर हे सर्व ते लोक आचरणात आणतात किंवा प्रत्यक्ष कृती करून ही इच्छा पूर्णत्वास नेतात. त्यामुळे त्यांना काही अंशी मानसिक समाधान,सुख प्राप्ती होते, अशी ते मनोमन कल्पना करतात. काहींना त्यात यशप्राप्ती होते. अर्थात्‌ व्यक्तिपुरत्वे ही भावना भिन्न भिन्न घाटीस पडते. अशाच व्रतांपैकी एकादशीचे व्रत करण्याची प्रथा, परंपरा आहे. 

 
 
संपूर्ण वर्षामध्ये 24 एकादश्या येतात. एकादशी या तिथिला ‘हरिदिनी’ असेही म्हणतात. आषाढ शुद्ध एकादशीला ‘देवशयनी’ एकादशी म्हणतात. कार्तिक शुद्ध एकादशीला ‘प्रबोधिनी’ एकादशी म्हणतात. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे आषाढ महिन्यात निद्राधीन झालेल्या बगवान विष्णूंना चार महिन्यांच्या दीर्घ निद्रेतून जागे करण्याची एकादशी होय. याला ‘प्रबोधिनी’ म्हणण्याचे कारण हे की प्रबोधन म्हणजे जागे करणे, उठविणे, योग्य ती शिकवण देणे असा अर्थ अभिप्रेत आहे. खरे तर देव झोपत नाहीत. देवांचा दिवस व रात्र याचा कालावधी बराच मोठा मानल्या जातो. पांडुरंग हे परब्रह्मचं सगुण रूप आहे. ते झोपतात असं आपण मानतो. या चार महिन्यांत व्रत-वैकल्ये, अनुष्ठानं केली जातात. फक्त मंगल कार्य करीत नाहीत. कारण देव निद्राधीन असतात. प्रबोधिनी एकादशीची पुराणांत पुढीलप्रमाणे कथा आहे. पुराणकाळात मुर नावाचा राक्षस होता. तो अहंकारी व उन्मत्त होता. या उन्मत्ततेतून राक्षस भगवान विष्णूवर चाल करून गेला. विष्णुदेवांनी सर्व देवागणांसह मुर दैत्याशी मोठे युद्ध केले. पण बलाढ्य अशा दैत्यापुढे, शक्ती सामर्थ्यापुढे देवगण हतबल झाले.
 
 
भगवान विष्णु बद्रिकाश्रमाच्या एका गुहेत लपून बसले. तेथे त्यांना शस्त्रांनी सज्ज व रुपवान लावण्यवती अशी सुंदर स्त्री दिसली. मुर दैत्य भगवान विष्णूंचा पाठलाग करीत गेला असता त्या अत्यंत तेजस्वी स्त्रीने आपल्या हुंकाराने मुर राक्षसाला ठार करून यमसदनी पाठविले. या कार्यामुळे संतुष्ट होऊन भगवान विष्णू प्रसन्न झाले व तिला वर मागायला सांगितले. तिने अत्यंत नम्रपणे एकादशीचे व्रत, उपवास करणार्‍यांवर आपण सदैव प्रसन्न असावे. असा सर्व जनहिताचा वर मागितला भगवान विष्णूजी प्रसन्न होऊन ‘तथास्तु’ म्हटले, अशी एकादशीच्या उत्पत्तीबद्दलची कथा पुराणांत आहे. एकादशी ही स्वर्गप्राप्ती, मोक्षप्राप्ती, दीर्घआयुरारोग्य, सुस्वरुप भार्या व पुत्रपौत्रादी देणारी आहे. या दिवशी उपवास केल्याने वैष्णवपद प्राप्त होते. असे या व्रताचे महात्म्य सांगितले आहे. निद्रेतून जागवणारी, ही तिथी एकादशी चैतन्यदायी, प्रेरक, कर्तव्यनिष्ठ करणारी आहे.
 
 
आषाढी एकादशीला भाविक भक्त पंढरपूरची वारी करतात. तर प्रबोधिनील आळंदीजी म्हणून ख्याती प्राप्त झाली आहे. आषाढी एकादशीला ज्ञानेश्वर माऊली पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला येतात. तर कार्तिकी एकादशीला पांडुरंग आळंदीला भेटीसाठी जातात अशी भक्त भाविकांची धारणा आहे.
 
 
अशा पुण्यप्रद कार्तिकी एकादशीला ठिकठिकाणी मंदिरामध्ये भजन, कीर्तन, जागर, ईश्वरिंचतन करतात. त्यामुळे जनमानसांत सत्‌प्रवृत्तीचा, सद्भावनेचा, आशेचा भाव निर्माण होतो. सर्व जण दिवसभर उपवास करतात. चार महिने तर काही ठिकाणी कार्तिक महिन्यात पहाटे जो काकड आरतीचा सोहळा दररोज भक्त करतात. त्याला दिवशी विशेष भर येतो. विठ्ठल मंदिरामध्ये दिव्यांची आरास, हार फुले यामुळे पांडुरंग व रुक्मिणीचे रूप डोले भरून बघावेसेच वाटते.
 
 
िंदड्याची ये-जा करणारे वारकरी भगवा झेंडा फडकवीत आनंदाने विठ्ठल नामाचा गजर करीत रस्त्यांनी जातात. तेव्हा तर प्रत्यक्ष पांडुरंग अवतरल्याचा भास होतो. विठ्ठलभक्त, पूजाअर्चा, अभंग यातून विठ्ठलाच्या समीप जाण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक विठ्ठल मंदिरामध्ये पंढरपूर अवतरल्याचा भास होतो. विठ्ठलाचे हे रूप नेत्रसुख देणारे तर असतेच पण मनाला कुठेतरी मानसिक समाधान सौख्य प्राप्त होते. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात-
कार्तिकीचा सोहळा। चला जाऊ पाहू डोळा।।
आले वैकुंठा जवळ। सन्निध पंढरिये।।
 
 
चातुर्मासातील एकादशीला बहुतांश भगिनी भजन, पूजन, उपवास यांत गुंतलेल्या असतात. आमच्याही भगिनी मंडळातील भगिनी प्रत्येक एकादशीला एकेका भगिनीकडे भजनाचे आयोजन घरी करून पांडुरंग भक्तीत रममाण होतात. तेव्हा त्या विठ्ठलाच्या भजनातून प्रत्यक्ष विठ्ठल भेटीचा भास होतो. भजन, आरती, प्रसाद इ. चे आयोजन उत्कृष्ट प्रकारे केल्या जाते. त्यातील एक भजन पुढीलप्रमाणे उदाहरणादाखल देते आहे-
विठ्ठलाच्या भेटी आला संत मेळा
भिवरेच्या काठी रंगला सोहळा ।।धृ।।
वाजती मृदंग ऐकती अभंग। आले पांडुरंग जोडोनी राऊळा।।
भव्य वाळवंटी भाविकांची दाटी। वाहे खळखळा भक्तिभाव ।
विश्व झाले गुंग प्राशोनी अभंग। आनंदाचा कंद डोलतो सावळा।।
या विठ्ठलकाव्यातून विठ्ठल महिमा मनाला तर सुखावतोच पण किती सुंदर काव्य रचल्याचा आनंदही मनात कुठेतरी घट्ट रुतून बसतो.
त्यामुळे या कार्तिकी एकादशीचा लाभ आपण सर्व भक्तगण घेऊ या. त्या विठुरायाला शरण जाऊ या सुख, समृद्धीची, आरोग्याची त्याच्याकडे याचना करू या.
जय हरी विठ्ठल। ज्ञानदेव तुकाराम।।
 
9423706821