खलिल जिब्रानचा कोल्हा...

    दिनांक :08-Nov-2019
|
न मम
श्रीनिवास वैद्य  
 
 
खलिल जिब्रानच्या एका कथेतील कोल्हा सकाळ होताच शिकारीच्या शोधात बाहेर पडतो. सकाळ असल्यामुळे कोल्ह्याची सावलीदेखील चांगलीच लांब पडली असते. सावलीकडे बघत कोल्हा विचार करतो की, बापरे! म्हणजे मला आज रानगव्याचीच शिकार करावी लागणार दिसते. त्याशिवाय माझी भूक कशी भागणार? रानगव्याच्या शिकारीसाठी कोल्हा जंगलात भटकत राहतो. दुपार होते, तरीही त्याला काही शिकार मिळत नाही. थकूनभागून उभा असताना त्याचे लक्ष आपल्या सावलीकडे जाते. आता सावली त्याच्या पायांपुरतीच उरली असते. त्या लहानशा सावलीकडे बघत तो म्हणतो- चला, आता मला एखादा ससादेखील पुरेल. शिवसेनेची सध्याची स्थिती खलिल जिब्रानच्या या कोल्ह्यासारखी झाली आहे. सध्या त्यांची सावली चांगलीच मोठी पडत आहे. त्यामुळे त्यांची भूक मुख्यमंत्रिपदाशिवाय भागणार नाही, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. सत्तासूर्य डोक्यावर आला की काय होईल माहीत नाही. खलिल जिब्रानची ही कथा जितकी छोटी आहे, तितकाच मोठा आशय या कथेत भरला आहे. मानवी जीवन, मानवी आशा-आकांक्षा, मानवी वासना, अहंकार, दांभिकता या सर्वांचे प्रतििंबब या कथेत पडलेले आपल्याला दिसून येईल. असो. 

 
 
 
शिवसेनेचा वारसा (राजकीय व संपत्ती दोन्हींचा) आपल्या सख्ख्या मुलाला देण्याचा निर्णय शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला, तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले होते. बाळासाहेबांचा राजकीय वारसा खर्‍या अर्थाने त्यांचे पुतणे राज ठाकरे गाजवत होते. जनता त्यांना प्रतिबाळासाहेबच समजत होती. त्यामुळे साहजिकच बाळासाहेबांच्या या निर्णयाने लोकांचा अपेक्षाभंग झाला. मला मात्र बाळासाहेबांचा हा निर्णय योग्य वाटत होता. राज ठाकरेंचा स्वभाव, त्यांचे वागणे, निर्णय घेण्यामागची त्यांची विचारप्रक्रिया... या सर्व गोष्टी शिवसेनेला शिखरावर नेण्यात कमी पडतील, असे माझे मत होते. उद्धव ठाकरे यांचा त्यावेळपर्यंत महाराष्ट्रातील जनतेला विशेष परिचय नव्हता. त्यामुळे ‘पाटी कोरी असलेला’ हा नवखा नेता शिवसेनेला कसे सांभाळणार, याची लोकांनाच नाही, तर शिवसैनिकांनाही चिंता होती. परंतु, हळूहळू उद्धव ठाकरे यांनी राजकारणावर आपली मांड मजबूत केली. या काळात त्यांना बरेच काही झेलावे लागले, घरगुती आणि राजकारणातलेही. पण ते ठाम राहिले. एक शांत, विचारी आणि सौम्य नेता म्हणून त्यांची प्रतिमा साकारत गेली. राजकीय पक्षाच्या प्रवासात चढउतार येतच असतात. ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्याही वाट्याला आले. इतक्या वर्षांनंतर त्यांच्यात बर्‍यापैकी मुत्सद्दीपणा, विचारीपणा आला होता, असे लक्षात येत गेले. कदाचित, पंधरा वर्षे राज्यातील सत्तास्थानापासून दूर राहिल्यामुळे असेल, हे गुण प्रकट होत असतील. परंतु, आता 2019 साली, म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळी आणि आता विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर, उद्धव ठाकरे यांचे जे व्यक्तिमत्त्व समोर येत आहे, हे बुचकळ्यात पाडणारे आहे. सत्तासीन नसताना त्यांच्यातून प्रकट होणारे लोभस गुण, केवळ वरवरचे होते की काय, अशी शंका यायला लागली.
 
 
उद्धव ठाकरे यांनी आपल्या कारकीर्दीत शिवसेनेला, बाळासाहेबांच्या काळातील शिवसेनेच्या सुवर्णकाळाकडे नेण्याचा प्रयत्न केला असेल; परंतु त्यात ते असफल ठरले आहेत. हे कुणालाही मान्य व्हावे. एकेकाळचा ‘मोठा भाऊ’ कालांतराने ‘लहान भाऊ’ झाला होता. याचे स्पष्ट दर्शन 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत झाले. परंतु, तरीही उद्धव ठाकरे हे मानायलाच तयार नव्हते आणि याच क्षणी, माझ्या मते, उद्धव ठाकरे आतापर्यंत ज्या सद्गुणांचे प्रकटीकरण करत होते, त्या गुणांचा कडेलोट होणे सुरू झाले. कुठला अहंकार होता माहीत नाही. निवडणुकीपूर्वीच्या जागावाटपाच्या वेळी आपला अहंकार (नागपुरी भाषेत ठसन) बाळगला तर त्यात काही वावगे नव्हते. कारण, तोपर्यंत ‘दूध का दूध और पानी का पानी’ व्हायचे होते. परंतु, निकालानंतर तर सर्व स्पष्ट झाले होते. भाजपा मोठा भाऊ ठरला होता आणि शिवसेना धाकटा. हे वास्तव उद्धव ठाकरे यांनी त्या वेळी मान्य केले असते, तर आज शिवसेना एका नव्या, आश्वस्त मार्गावर अग्रेसर होताना दिसली असती.
 
 
मुंबई महानगरपालिका म्हणजे (त्यातही सत्तारूढ) शिवसेनेचा प्राण आहे. राक्षसांच्या गोष्टीत, त्या राक्षसाचा प्राण एखाद्या पोपटात वगैरे असल्याचे आपण वाचले असेल. तसाच शिवसेनेचा प्राण मुंबई महानगरपालिकेत आहे. काहीही झाले तरीही तिथली सत्ता हातून जाणे शिवसेनेला परवडणारे नव्हते. 2014 मध्ये काही दिवसांनी भाजपा सरकारमध्ये रडतफडत सहभागी झाल्यानंतर, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली. तिथेही उद्धव ठाकरेंच्या आठमुठ्या धोरणामुळे, भाजपा व शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढविली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या महानगरपालिकेत भाजपा शिवसेनेच्या बरोबरीत आली. आता मात्र, शिवसेनेच्या पायाखालील वाळू सरकायला हवी होती. परंतु, तसे झाले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, राज्य सरकारला असलेल्या शिवसेनेच्या पाठिंब्याचे स्मरण ठेवीत, मुंबई महानगरपालिकेची सत्ता, बहुमत नसतानाही उद्धव ठाकरे यांच्या हाती सोपविली. पाठिंबा देऊनही भाजपाने एकही सत्तापद स्वीकारले नाही. हे सर्व सांगण्याचे कारण की, बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला पुढे नेले, असा जर कुणाचा समज असेल तर तो दूर व्हावा. शिवसेनेची पीछेहाटच होत गेली.
 
 
बाळासाहेबांची जीभ फार तिखट होती. ते शरीराने काटकुळे असले तरी त्यांची आभा मोठी होती. त्यामुळे ती भाषा त्यांना शोभूनही दिसायची. ती आभा ना उद्धव ठाकरेंकडे आहे, ना ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांच्याकडे. परंतु, तिखट जिभेचा वारसा मात्र या दोघांनी अलगद उचलला आहे. मोर नाचला म्हणून लांडोरीनेही नाचावे, असला हा प्रकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर तोंडसुख घेेण्याचा सपाटा सुरूच होता. सत्तेत सहभागी असूनही खुद्द मुख्यमंत्र्यांचाही जाहीर अपमान करण्यात त्यांना काहीही वाटत नव्हते. भाजपावालेही सत्ता कायम ठेवण्यासाठी अगतिकता म्हणून हे सर्व सहन करत होते. बरेच जण असे म्हणतात की, गेल्या पाच वर्षांत भाजपा नेतृत्वाने शिवसेनेचा जो अपमान केला तो योग्य नव्हता. परंतु, याच पाच वर्षांच्या काळात शिवसेनेनेही मोदी-शाह-फडणवीस यांना जाहीर विखारी फटके हाणून हिशेब बरोबरीत केला आहे, हेही आपण समजून घेतले पाहिजे.
 
 
2019 सालच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचंड यशानंतर, आता नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत युती करण्यावरून खूप मानापमानाची नाटके झालीत. शेवटी रडतफडत युती झाली. त्यानंतर जे निकाल आलेत त्याने महाराष्ट्रात सत्तेचा पेच फसला आहे. जनतेने या सर्व राजकीय पक्षांना अशा स्थितीत आणून ठेवले आहे की याची त्यांनी कल्पनाच केलेली नसावी. भाजपाला शिवसेनेच्या मदतीशिवाय सत्ता स्थापन करता येत नाही आणि शिवसेनेला सत्ता स्थापन करायची असेल, तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीशिवाय पर्याय नाही. गेले 15 दिवस, शिवसेनेचे खा. संजय राऊत ज्या पद्धतीने बोलत आणि वागत आहेत, त्यावरून मला खलिल जिब्रान यांची ही कथा आठवली. काही गोष्टी ओलावा आटताच कडक होतात. परंतु, इथे (सत्तेचा) थोडा ओलावा मिळताच गोष्टी कडक होऊ लागल्या आहेत. ज्या वेळी परिपक्वता आणि मुत्सद्देगिरी दाखवायची असते तेव्हा ती दाखविलीच पाहिजे. रबर एका मर्यादेपर्यंतच ताणायचा असतो. अन्यथा तो तुटतो. सावली ही सावलीच असते. सकाळी मोठी पडली तरी दुपारी ती आपल्या पायातच घोटाळते आणि संध्याकाळ होताना ती परत मोठी होत असली, तरी त्यानंतर मात्र दिसेनाशी होते. सावली आपला आकार नाही, हे लक्षात घेऊन कोल्ह्याने आरंभापासूनच सशाची शिकार करण्याचा प्रयत्न करणे शहाणपणा आहे, असेच जिब्रान यांना सुचवायचे आहे. शिवसेनेला हे समजेल?