टोलच्या नियमांमध्ये १ डिसेंबरपासून होणार मोठा बदल

    दिनांक :08-Nov-2019
|
मुंबई,
येत्या १ डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवरील टोलच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवरील सर्व टोल प्लाझांमध्ये फास्टॅगद्वारे टोलची रक्कम भरता येणार आहे. केंद्र सरकारने १ डिसेंबरपासून संपूर्ण देशात सर्व वाहनांना फास्टॅग लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत घोषणा केली होती.
 
 
 
नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने देशभरतील सर्व टोल प्लाझांवर इलेक्ट्रॉनिक टोल घेण्यास सुरूवात केली आहे. यासाठी वाहन चालकांना आपल्या गाड्यांवर फास्टॅग लावावे लागणार आहे. हा फास्टटॅग अधिकृत टॅग विक्रेते किंना बँकेतून विकत घेता येऊ शकतो. काही ठिकाणी पेट्रोल पंपांवरदेखील हा टॅग विकत घेता येणार आहे. टोल प्लाझावर ऑटोमॅटिक ट्रान्झॅक्शनसाठी विंडस्क्रिनवर फास्टॅक लावावा लागणार आहे. यामध्ये रेडियो फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन देण्यात येते. वाहन टोल प्लाझावर पोहोचल्यावर त्या ठिकाणी लावण्यात आलेला सेन्सर फास्टॅक स्कॅन करतो. त्यानंतर फास्टॅगच्या अकाऊंटमधून पैसे वजा होतील.
दरम्यान, फास्टॅग अकाऊंटमधून टोलचे पैसे वजा झाल्यानंतर संबंधित वाहन चालकाला त्यासंबंधिचा एक एसएमएस त्यांच्या मोबाईलवर येईल. अकाऊंटमधील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे. फास्टॅगची वॅलिडिटी पाच वर्षांची असेल. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर नव्याने फास्टॅग खरेदी करावे लागणार आहे.