वास्तू आणि मानसिकता!

    दिनांक :08-Nov-2019
|
अवंतिका तामस्कर
 
वस्तूची मानसिकता म्हणजे, त्याचे समोरच्या व्यक्तीच्या मनात उमटणारे प्रतिबिंब किंवा मानसप्रतिमा बदलण्यासाठी आपल्याला वास्तूचा काय उपयोग होतोय आणि काय उपयोग करायचा आहे, हे निश्चित करायला हवे.
 
 
घरामध्ये असलेला दवाखाना, ऑफिस किंवा शिकवण्यांना कधीही व्यापक स्वरूप प्राप्त होत नाही किंवा त्यांना फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. कारण, त्या वास्तूची ती मानसिकता, रचना वा प्रतिमाच नसते. म्हणूनच जेव्हा एखाद्या गोष्टीत आपल्याला वास्तूदोष वाटतो किंवा आपल्या व्यवसायाचा संबंध वास्तूशी आहे, असे वाटते, त्यावेळी याही गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून वास्तूची मानसिकता किंवा मानसप्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करायला हवा. वास्तूची मानसिकता म्हणजे वास्तू आपल्याला कशी वाटते किंवा त्या वास्तूमधून आपल्याला काय जाणवते. वास्तूचे काम काय आहे आणि त्यातून ते तसे होते की नाही, याचे प्रतिबिंब. वास्तूच्या या अंगाचा विचार करण्याचीही आवश्यकता आहे. 
 
 
 
वास्तूची मानसिकता म्हणजे, त्याचे समोरच्या व्यक्तीच्या मनात उमटणारे प्रतिबिंब किंवा मानसप्रतिमा बदलण्यासाठी आपल्याला वास्तूचा काय उपयोग होतोय आणि काय करायचा आहे, हे निश्चित करायला हवे. एखाद्या डब्यावर चहाचे वेस्टन असेल आणि प्रत्यक्ष आत साखर असेल, तर जी फसगत होते तशी होऊ नये, यासाठी घरातल्या ज्या खोलीत ऑफिस वा दवाखाना करायचा असेल, त्या खोलीचे संपूर्ण स्वरूप दवाखाना किंवा ऑफिससारखेच असले पाहिजे.
 
 
वास्तूची प्रतिमा निर्माण करण्यासाठी आपल्या त्या प्रकारच्या वातावरणाचे अस्तित्व जाणवायला हवे. यासाठी अशा दवाखाना, ऑफिस वा अपेक्षित वास्तूत जाऊन बघून त्याप्रमाणे तिथली सर्व साहित्य रचना, आवश्यक सामग्री, फर्निचर यांचा आपल्या जागेत कसा वापर करता येईल आणि आपली जागा आवश्यक वास्तू मानसिकतेसाठी कशी योग्य बनवावी याप्रमाणे आखणी आणि अंमलबजावणी करावी.
 
 
आपल्या आवडीच्या रचनेनुसार आणि वास्तुप्रतिमा मिळती-जुळती झाल्यानंतर मिळणारा प्रतिसाद हा निश्चितपणे उत्साहवर्धक असेल. हीच वास्तू मानसिकता घरातला दवाखाना किंवा ऑफिस या पलीकडे जाऊन दवाखान्यातली उपचारांची खोली किंवा तपासणी कक्ष अशा सूक्ष्म बारकाव्यांनी तयार करावा. घराबाबतीत म्हणायचे झाले, तर दिवाणखाना, बेडरूम, किचन, बाल्कनी या सर्वांची वास्तुप्रतिमा पुन्हा तपासून त्याप्रमाणे बदल करून आपले घर अधिक प्रसन्नता देणारे आणि हवेहवेसे वाटणारे बनवणे, सहज शक्य आहे.