‘माहा’ चक्रीवादळाचा धोका टळला

    दिनांक :08-Nov-2019
|
मुंबई,  
अरबी समुद्रातील चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्याने गुजरातच्या किनारपट्टीवरचा  ‘माहा’  चक्रीवादळाचा संभाव्य धोका टळला आहे. तीव्रता कमी झालेले चक्रीवादळ दक्षिण गुजरात किनारपट्टीकडे सरकण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दीवच्या किनारपट्टीपासून ९० किलोमीटर आणि वेरावळपासून १०० किलोमीटरवर हे चक्रीवादळ आहे. ‘कयार’ या चक्रीवादळापाठोपाठ आलेल्या ‘माहा’ या चक्रीवादळाने अतितीव्र स्वरूप धारण केले होते. हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता होती.
 
 
हवामान विभागाकडून गुजरातमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याने गुजरात सरकारकडून नागरिकांच्या स्थलांतरासाठीची तयारी करण्यात आली होती. तसेच राज्यातील आपत्ती निवारण यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली होती. मात्र, या चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागल्याने गुजरात राज्यात किनारपट्टीजवळ राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
बंगालच्या उपसागरात ‘बुलबुल’ चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात बुलबुल हे चक्रीवादळ तयार झाल्याचे हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर झाले असून, हे चक्रीवादळ बांगलादेश आणि पश्चिम बंगाल किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पावसाचा इशारा : गुरुवारी या चक्रीवादळाचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होत असल्याचे हवामान विभागाकडून नमूद करण्यात आले. दरम्यान ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ांसह उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांत ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि येत्या चोवीस तासांत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.