अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलेलाच नाही- देवेंद्र फडणवीस

    दिनांक :08-Nov-2019
|
अडीच-अडीच वर्षे हा फॉर्म्युला ठरलेलाच नाही, हे मी आजही सांगतो आहे. अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर आमची बोलणी फिस्कटली होती त्यानंतरच्या माझ्यासमोरच्या एकाही चर्चेत हा विषय झाला नाही. उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात जर विषय झालेला असेल तर मला माहित नव्हतं. मी तसं अमित शाह आणि नितीन गडकरी यांना विचारलं मात्र त्यांनीही असं काहीही ठरलेलं नाही असं सांगितलं. या संदर्भातले समज-गैरसमज चर्चेने सोडवता आले असते. गेली पाच वर्षे उद्धव ठाकरे यांचे आणि माझे चांगले संबंध आहेत. अनेकदा मी त्यांच्याशी चर्चा नाही. मी स्वतः उद्धव ठाकरेंना फोन केले पण त्यांनी ते उचलले नाही. चर्चेची दारं आमच्याकडूून खुली होती. भाजपासोबत चर्चाच करायची नाही हे धोरण शिवसेनेचे आहे आमचे नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
 
 
माननीय राज्यपालांना भेटून राजीनामा सादर केला आहे, राज्यपालांनी तो स्वीकारला आहे. महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी गेली पाच वर्षे दिली त्याबद्दल मी महाराष्ट्रच्या जनतेचे आभार मानतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. माझ्यासोबत ज्यांनी काम केलं ते सगळे अधिकारी, कर्मचारी यांचेही मी आभार मानतो. आमच्यासोबत असलेल्या शिवसेनेचेही मी आभार मानतो. पारदर्शी आणि प्रामाणिक सरकार आम्ही चालवलं. महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम आम्ही केलं. महाराष्ट्रासमोर आलेल्या विविध संकटांचा सामना अत्यंत समर्थपणे केला.
चार वर्षे दुष्काळाची, हे वर्ष अतिवृष्टीचं ठरलं तरीही शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहण्याचं काम राज्य सरकारने केलं. महाराष्ट्रातली सर्वात मोठी योजना ती यशस्वीपणे राबवण्याची संधी आम्हाला मिळाली. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाायाभूत सुविधांचं काम या कार्यकाळात करता आलं याचं समाधान वाटतं आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं
निवडणुकीत आम्ही लढलेल्या जागांपैकी ७० टक्के जागा लोकांनी आम्हाला दिल्या. जे काम आम्ही केलं त्या कामाची पावती महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला दिली. ज्या प्रामाणिकपणे सरकार चाललं त्या विश्वासातून जनतेने आम्हाला पुन्हा कौल दिला. अपेक्षेपेक्षा काही जागा कमी आल्या असतील. मात्र त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पहिलीच पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेतच त्यांनी स्पष्ट केलं की सरकार स्थापनेचे सगळे मार्ग खुले आहेत. लोकांनी महायुतीला मतदान केलं होतं त्यामुळे हे वक्तव्य आमच्यासाठी धक्काच होतं. त्यांनी हे वक्तव्य का केलं असावं हा प्रश्न निश्चितपणे आमच्यासमोर आला. मी पहिल्याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे आभार मानले होते. गेले पंधऱा दिवस ज्या प्रकराची वक्तव्य या महाराष्ट्रात माध्यमांमधून आपल्याला पाहण्यास मिळाली ते दुर्दैवी आहे.