'सूर्यवंशी'च्या सेटवर अक्षय कुमार जखमी

    दिनांक :09-Nov-2019
|
मुंबई,
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार मुंबईत त्याचा आगामी सिनेमा ‘सूर्यवंशी’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या सिनेमाची शूटिंग सुरु असतानाच अक्षय कुमार सेटवर जखमी झाल्याची माहिती आहे. त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली. फिजिओथेरपिस्टने या जखमेची तातडीने दखल घेतली आणि जखम गंभीर नसल्यामुळे शूटिंग चालू ठेवली.

 
अक्षय कुमारला जखम झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही. मात्र अक्षय कुमारने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात त्याच्या हाताला दुखापत दिसून येत आहे. सूर्यवंशी सिनेमात एक मोठा भाग हा बँकॉक, मुंबई आणि हैदराबादमध्ये चित्रित करण्यात आला होता. या सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये अजय देवगण आणि रणवीर सिंह हे देखील दिसणार आहेत. अक्षय कुमारच्या सिनेमांची उत्सुकता नेहमीच असते. त्यातच रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार यांचा हा सिनेमा असल्याने उत्सुकता आणखी वाढली आहे. सिनेमात कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातील अक्षय कुमारचा हेलिकॉप्टर स्टंट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
 
 
 
 
अक्षय कुमारचा हा सिनेमा २७ मार्च २०२० रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार काही थरारक स्टंट करताना दिसून येणार आहे. त्याच्या हेलिकॉप्टर स्टंटवरुनच याचा अंदाज येऊ शकतो. एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील अक्षय कुमार पुन्हा एकदा चाहत्यांचं मन जिंकतो का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.