ऑनलाईन शॉपिंगची सवय हा रोग...!

    दिनांक :09-Nov-2019
|
चौफेर  
सुनील कुहीकर  
 
दिवसागणिक हा विषय गंभीर होतोय्‌. नवीच काय, जुनी पिढीही एव्हाना त्यात पुरती गुरफटत चालली आहे. ऑनलाईन खरेदीचे कालपर्यंत वाटणारे अप्रूप आता सवयीत आणि हळूहळू व्यसनात परिवर्तित होऊ लागले असून, या प्रकाराची गणना ‘न सुटणार्‍या सवयीत रूपांतरित होणार्‍या व्याधी’त करण्याची तयारी जागतिक आरोग्य संस्थेने चालविली असल्याचे वास्तव केवळ गंभीर, केवळ अफलातून, केवळ धक्कादायकच नाही, तर भविष्यात तमाम मानवी समूहावर परिणाम घडवून आणणारे ते भीषण वास्तव आहे.
 
सणासुदीच्या काळात घराबाहेर पडणारी, या दुकानातून त्या दुकानात पाहणी करत, भावटाव करत हुंदडणारी गर्दी अलीकडे रोडावत चालली आहे. कारण, आता बहुतांश लोकांना खरेदीसाठी घराबाहेर पडायचेच नाही. त्यांना सारेकाही घरबसल्या हवे आहे. इंटरनेट सुरू केले, मोबाईलवरून चार-दोन साईटस्‌ शोधल्या, पाहिजे ती वस्तू निवडली, पैशाची देवाणघेवाण केली की संपलं. ठरल्या कालावधीत पाहिजे ती वस्तू दारात हजर. विकसित देशातले हे फॅड गेल्या काही वर्षांत भारतातही व्यवस्थितपणे रुजले आहे. दिवाणखान्यातल्या फर्निचरपासून तर हॉटेलातून मागवावयाच्या खाद्यपदार्थांपर्यंत, कपड्यांपासून तर मोबाईल फोनपर्यंत, किराण्यापासून तर भाज्यांपर्यंत आणि आता तर औषधींपर्यंतची जिन्नसं ऑनलाईन खरेदी करण्याची सोय झाली आहे. बदलते तंत्रज्ञान, वेगाने पुढे जात असलेले जग, तरुणाईच्या दिवसागणिक बदलत चाललेल्या आवडीनिवडी, यात सहज उपलब्ध होणार्‍या सार्‍या सुविधा अगदीच नकारात्मकतेच्या पंक्तीत नेऊन बसविण्याचे तसे प्रयोजन नाही. पण, एका मर्यादेबाहेर त्याचा स्वीकारही समर्थनीय ठरत नाही. आपला समाज ती मर्यादा ओलांडतोय्‌, असेच काहीसे चित्र अलीकडे निर्माण होते आहे. ही एकट्या भारताची समस्या नाही. आज सारे जग त्या गर्तेत हेलकावे खात आहे. पण हे जरी खरे असले, तरी इतरांच्या तुलनेत भारताला भेडसावणार्‍या प्रश्नाचे स्वरूप काहीसे वेगळे आहे. परिणामी, त्या प्रश्नांच्या सोडवणुकीची येथील तर्‍हाही उर्वरित जगाच्या तुलनेत वेगळी असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे इतरत्र लागू होणारी मात्रा येथे लागू होईलच, हे ठामपणे सांगता येत नाही. पण, जे जागतिक पातळीवर गंभीर, ते येथील स्तरावरही तितकेच गंभीर ठरते, हे मात्र खरे!
 
 
 
लोकसंख्येपासून तर अर्थकारणापर्यंत, सर्वच दृष्टीने उर्वरित विश्वाच्या तुलनेत भारताचे वेगळेपण कायम दखलपात्र ठरले आहे. जिथे लोकसंख्या ही मोठी ताकद असूनही रोजगार ही भीषण समस्या ठरली आहे, अशा देशात कित्येकांचा रोजगार हिसकावून घेणारे ऑनलाईन विक्री केंद्रे हवीत की नको, हाच मूळात प्रश्न आहे. पण, येथे स्वत:च्या परिघाबाहेर विचार करतो कोण? ॲमेझॉनपासून फ्लिपकार्टपर्यंत, स्नॅपडीलपासून मयंत्रापर्यंत, जबॉंगपासून बिगबास्केटपर्यंतच्या विदेशी मालकीच्या कंपन्या कोट्यवधी रुपये ओतून व्यवसाय करण्यासाठी मैदानात उतरल्यात. काही कळायच्या आत त्यांनी बाजारपेठा काबीज केल्या. लोकांना घरबसल्या, जागेवर वस्तू उपलब्ध करून देणारी व्यवस्था उभारली. तशा सवयी जाणीवपूर्वक लावल्या गेल्यात जनतेला. ग्राहकांना आकर्षित करणार्‍या जाहिरातींची भावनिक पद्धतीने होणारी मांडणी, उपयोग असो वा नसो, माल खरेदी करण्यासाठी ग्राहकांना प्रवृत्त करणारी त्यांची तर्‍हा, ‘एकावर एक फ्री’सारख्या योजनांचा बेसुमार भडिमार... या सार्‍या बाबींचा वैश्विक स्तरावर ध्यानात आलेला परिणाम हा आहे की, गरजेचा, स्वत:च्या खिशाचा, बँक बॅलन्सचा, दराच्या दृष्टीने परवडण्या-न परवडण्याचा जराही विचार न करता लोक या आमिषांना बळी पडू लागले आहेत.
 
एका सर्वेक्षणानुसार, आजघडीला 450 दशलक्ष भारतीय लोक इंटरनेटचा वापर करतात. त्यातील अधिकांश लोक ऑनलाईन शॉपिंगचे शौकीन सिद्ध होताहेत. चीन, अमेरिका, फ्रान्सच्या तुलनेत ही संख्या आणि प्रमाण कमी असले, तरी एकूण भारतीय जनसंख्येच्या तुलनेत ही संख्या बरीच मोठी आहे. शिवाय, भारतात अशा शॉपिंग व्यवस्थेची खरोखरीच गरज आहे का, हा प्रश्नही महत्त्वाचा आहेच.
 
भारतात साधारणपणे 2009 पासून ऑनलाईन व्यापारतंत्राचे भूत उभे झाले. गेल्या दशकभराच्या कालावधीत ते पुरेशा प्रमाणात लोकांच्या डोक्यात शिरले अन्‌ मानगुटीवरही बसले. 2009 मध्ये 500 कोटींपेक्षा कमी असलेला या कंपन्यांचा भारतातील व्यवसाय नंतरच्या केवळ सात वर्षांच्या काळात चार हजार कोटींवर पोहोचला आहे. ही सारी कमाई विदेशात जाते आहे, ही बाब आहेच. सार्‍या वस्तू इथल्या, इथेच पिकणार्‍या, इथेच तयार होणार्‍या. म्हणजे निर्माते इथलेच, खरेदीदारही इथलेच, मालाची मागणी नोंदविण्यापासून तर तो घरपोच देणार्‍यांपर्यंतची यंत्रणाही स्थानिकांची. फक्त व्यापारी मात्र विदेशातले. आमच्या खिशातले पैसे काढून ते लुटून नेताहेत अन्‌ आम्हीच आमचा बाजार मांडून बसलो आहोत.
 
ऑनलाईन शॉपिंगच्या सवयीची गुलामी इतकी अंगात भिनली आहे आमच्या, की आता तर मोबाईलच्या 200 रुपयांच्या ईअरफोनपासून तर पायात घालण्याच्या मोज्यांपर्यंत सार्‍याच बाबी अॅमेझॉन, फ्लिपकार्टवरूनच येऊ लागल्या आहेत घराघरांत. इकडे, गावातले बाजार ओस पडलेत अन्‌ ऑनलाईन शॉपिंगचा धंदा मांडून बसलेल्यांना ऑर्डर्स नोंदविण्याची फुरसत नाही, अशी परिस्थिती कुणी निर्माण केली? भारतीय म्हणून साजर्‍या केल्या जाणार्‍या दिवाळसणातही भारतीय ग्राहक चीनमधून तयार होऊन आलेले दिवे, आकाशकंदील खरेदी करणार असतील, तर बाजारातल्या कुठल्याशा कोपर्‍यात मातीच्या दिव्यांचा ढीग मांडून बसलेली आजी काय गालावरच्या सुरकुत्यांचे फोटो काढून हळहळ व्यक्त करण्यापुरतीच उपयोगाची असणार आहे?
 
भारतीय बाजारपेठा अमेरिकेसारख्या पाऽऽर ओस पडलेल्या नाहीत, या ऑनलाईन शॉपिंगमुळे अजूनतरी. परिणामी, या व्यसनाची भीषणता इथल्या तुलनेत तिथे अधिक गंभीर आहे. बाजारात काहीतरी नवीन आलंय्‌ म्हटल्याबरोबर त्यावर तुटून पडण्याची धडपड, स्वस्तात मिळतेय्‌ म्हणून खूप सारे विकत घेऊन टाकण्याचा हव्यास, स्कीमने पाडलेल्या भुरळीच्या प्रभावातून आवश्यकता नसताना खरेदी करून टाकण्याचा हावरटपणा, गेल्या काही दिवसांत आपण काहीच विकत घेतलेले नाही म्हटल्यावर जणूकाय गुन्हा केला असल्यागत मानसिक विपन्नावस्था निर्माण होण्याची परिस्थिती आता आरोग्याच्या सुदृढतेच्या कसोटीवर तपासली जाते आहे. मिळेल ते, जमेल ते, वाट्टेल ते खरेदी करण्याच्या हव्यासापायी पैशाचे गणित जुळवणे जिकिरीचे होऊन बसले आहे कित्येकांना. त्याच्या चिंतेने ग्रासलेली मंडळी मानसिकदृष्ट्या खचत चालली आहे. आर्थिक जुळवाजुळव हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरतो आहे. दररोज बदलणार्‍या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालताना होणार्‍या बौद्धिक कसरतीचीही त्यात भर पडते आहे. यातून साकारणारे चित्र एका भयाण वास्तवाची जाणीव करून देणारे ठरत आहे.
 
जागतिक आरोग्य संघटनेने दखल घ्यावी, बाजारहाटीचे हे व्यसन थेट रोगाच्या रांगेत नेऊन बसविण्याचे संकेत त्यातून प्राप्त व्हावेत, ही बाब समाजस्वास्थ्य बिघडत चालले असल्याचे लक्षण आहे. जागतिक आरोग्य संस्थेने हा प्रकार टप्प्याटप्प्याने ‘ ॲडिक्टिव्ह डिस्‌ऑर्डर’ ठरविण्याच्या दृष्टीने तयारी आरंभली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, एकूणच जगात ऑनलाईन शॉपिंगच्या फॅडने लोकांना अक्षरश: वेडे केले आहे. हा धंदा चालवणार्‍यांनी पैसा कमावण्यासाठी आरंभलेल्या क्लृप्त्या त्यांना भुरळ घालतात खर्‍या, पण त्याचे परिणाम नकारात्मक आहेत. तरीही वर्षाकाठी निदान दहा टक्क्यांनी ग्राहक वाढताहेत या क्षेत्रात. झपाटल्यागत वागणे चालले सर्वांचे. काही लोक तर आता बाजारात काय उपलब्ध आहे, हे तपासण्यासाठी सतत ऑनलाईन असतात. कायम शोध सुरू असतो त्यांचा, कुठल्या ना कुठल्या वस्तूचा. कुठल्या ना कुठल्या स्कीमचा. आता आपल्या कपाटात बुटांचा कोणत्या रंगाचा सेट घ्यायचा राहिलाय्‌ इथपासून तर सध्या बाजारातून खायला काय मागवावं इथपर्यंतच्या चिंतेने ग्रासलेले असतात लोक. खरेदी करायची असेल तेव्हाही आणि करण्याजोगी पैशाची तजवीज नसेल तरीही अस्वस्थ होतात लोक. हे सारेच विचित्र वळणावर चालले आहे. इतके की, बाजारातून वस्तू खरेदी करण्याची लोकांची सवय, रोगाच्या दिशेने प्रवास करीत आहे.
 
आधीच, नव्याने प्रस्थापित झालेल्या या व्यवस्थेने प्रचलित पूर्वव्यवस्थेचे कसे कंबरडे मोडले, याचे गणित निदान भारतात तरी मन सुन्न करणारे ठरले असताना डब्ल्यूएचओचा हा नवीन अहवाल तर डोकेही सुन्न करणारा ठरतोय्‌...
 
9881717833