शेतकरीपुत्र विधानसभा अध्यक्ष झाला याचा आनंद – मुख्यमंत्री

    दिनांक :01-Dec-2019
|
मुंबई, 
विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली त्यानंतर त्यांनी आपला कार्यभार स्विकारला. यावेळी सभागृहाचे नेते म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पटोले यांचे अभिनंदन केले तसेच शेतकरीपुत्र विधानसभा अध्यक्ष झाला याचा आपल्याला आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. 
 
 
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, सभागृहाचा नेता म्हणून सभागृहाच्यावतीने आपले स्वागत करतो. विधानसभा हे राज्याचे सर्वोच्च सभागृह आहे. याचे कामकाज तुम्ही चांगल्यापद्धतीने पार पाडाल ही अपेक्षा व्यक्त करतो. आपला स्वभाव बंडखोर स्वरुपाचा आणि अन्याय सहन न करणारा आहे. आपले मत मांडताना कोणाचीही भीती न बाळगणारा महाराष्ट्राचा हा सुपुत्र अध्यक्षदी विराजमान झाला आहे.
 
शेतकऱ्यांसाठी, कलाकारांसाठी, वृद्धांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी आपण सतत कार्यरत आहात. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाला सांभाळून घेण्याचे आपले काम आहे. आमच्या कोणावरही अन्याय न होता आमच्याकडून काही चुकीचे घडल्यास आमचे कान पिळावेत अशी अपेक्षा करतो, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी पटोले यांना शुभेच्छा देताना म्हटले.