नवा पाकिस्तान घडविण्यासाठी मानसिकता बदला

    दिनांक :01-Dec-2019
|
इम्रान खान यांची नोकरशाहांना सूचना
लाहोर,
नव्या पाकिस्तानची निर्मिती करणे इतके सोपे काम नाही आणि ते अल्पावधीत साध्यही होऊ शकत नाही. त्यासाठी देशभरातील सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांनी आपली जुनी मानसिकता बदलविण्याची गरज आहे, अशा सूचना पंतप्रधान इम्रान खान यांनी दिल्या आहेत.
 

 
 
कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात, त्या देशातील सक्षम नोकरशाहची भूमिका अतिशय आवश्यक असते. देशाची भरभराट करायची असेल, गुणवत्तेवर कार्य करा, तुमच्या कार्यात पारदर्शकता असायलाच हवी, असेही इम्रान खान यांनी वरिष्ठ प्रशासकीय व पोलिस अधिकार्‍यांच्या बैठकीला संबोधित करताना सांगितले.
 
आपण नव्या पाकिस्तानची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असले, तरी आपली मानसिकता जुनीच आहे. या जुन्या मानसिकतेसोबत आपण विकासाचा प्रवास करू शकणार नाही, असे त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले. विशेष म्हणजे, एक दिवस आधीच खान यांनी प्रशासकीय व्यवस्थेत व्यापक फेरबदल केले आहेत.
 
पारदर्शक राज्यकारभार आणि उत्तम कायदा व सुव्यवस्था या दोन्ही गोष्टी देशाच्या विकासासाठी आवश्यक आहेत. पंजाब प्रांतातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. तेथील पोलिसांना वैधानिक अधिकार असतानाही, ते सर्वसामान्य लोकांचे रक्षण करण्यात अपयशी ठरत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.