ॲमेझॉन खोर्‍यातील आगीमुळे हिमनग विरघळतोय्‌!

    दिनांक :01-Dec-2019
|
वॉशिंग्टन,
ॲमेझॉन खोर्‍यातील जंगलाला लागलेल्या भीषण आगीचा थेट परिणाम जंगलापासून दोन हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या अमेरिकेच्या एंडिज पर्वतरांगेतील हिमनगांवर होत आहे. आगीच्या धुरातील काळ्या कार्बनमुळे येथील हिमनग वेगाने विरघळत असल्याची बाब एका संशोधनातून उघड झाली आहे.
 

 
 
ॲमेझॉनमधील जंगलाला काही महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणावर आग लागली होती. यामध्ये निसर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आगीचा परिणाम हजारो किलोमीटरवरील हिमनगांवरही झाला आहे. एंडिज पर्वतरांगेतील बर्फामध्ये अॅमेझॉन खोर्‍यातील आगीतून निर्माण झालेले धुली कण आढळले असून, हिमनग वेगाने विरघळत आहेत.
 
ब्राझील विद्यापीठातील तज्ज्ञांच्या गटाने 2000 ते 2006 दरम्यान घडलेल्या आगीच्या घटना, धुराची स्थिती आणि पाऊस व हिमनगांची विरघळण्याची गती याचा अभ्यास करून आकडेवारी जमा केली आहे. यामधून समोर आलेल्या माहितीनुसार, केवळ आगीतून निघणार्‍या काळ्या कार्बनमुळे हिमनग विरघळण्याचे प्रमाण 3 ते 4 टक्क्यांपर्यंत आहे. तसेच, धुळकण आणि आगीतून तयार होणारे काळे कार्बन एकत्र आल्याने, याचे प्रमाण 6 टक्क्यांपर्यंत गेले आहे. तज्ज्ञांच्या मते, एंडिज पर्वतरांगेतील हिमनगांमध्ये सापडणार्‍या धुली कणांवर, आगीचा हिमनगांवर किती परिणाम झाला आहे, हे लक्षात येईल.