आशियाई शतकासाठी भारत-चीन सहकार्य आवश्यक

    दिनांक :01-Dec-2019
|
दोन्ही देशांच्या राजनयिक अधिकार्‍यांचे मत
बीजिंग,
सध्याचे शतक आशियाचे असून, ते सिद्ध करण्यासाठी भारत आणि चीनने प्रादेशिक व जागतिक स्तरावर सहकार्य करण्याची गरज आहे. यासाठी बहुद्देशीय संबंध कायम ठेवायला हवेत व विस्तृत मुद्यांवर चर्चा करत द्विपक्षीय संबंध बळकट करायला हवेत, असे मत भारत व चीनमधील वरिष्ठ राजनयिक अधिकार्‍यांनी व्यक्त केले.
 
 
 
भारत-चीन थिंक टँक फोरमच्या चौथ्या बैठकीचा शनिवारी समारोप झाला. ‘आशियाई शतकातील भारत-चीन संबंध’ या विषयावर बैठक झाली. त्यात वरील मत व्यक्त करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे 2015 मध्ये चीनला भेट दिली होती. तेव्हापासून अशा पद्धतीने बैठकीचे आयोजन करण्यात येते.
 
भारताचे पाकिस्तानातील माजी उच्चायुक्त टी. सी. ए. राघवन्‌ यांच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यांचे भारतीय शिष्टमंडळ या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत विकासाच्या कामांमध्ये भागीदारी तयार करणे, दोन्ही देशांना परस्परांच्या संस्कृतीपासून काय शिकता येईल, यासारख्या विषयांवर सखोल चर्चा झाल्याचे चीनमधील भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आले.
 
राघवन्‌ म्हणाले, भारत व चीन या आशियातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. या अर्थव्यवस्था केवळ आशियाच्या आर्थिक आघाडीवरील उदयातील प्रमुख घटक नाहीत, तर जागतिक आर्थिक उतरंडीची नव्याने रचना करण्याच्या विचारांच्या केंद्रस्थानीही आहेत. या दोन्ही देशांनी परस्परांबरोबर बहुस्तरीय संबंध कायम ठेवतानाच, अन्य छोट्या देशांना त्यांच्या पुनरुत्थानामध्येही मदत करायला हवी.