पिंजरा मालिकेतील अभिनेत्रीला अटक

    दिनांक :01-Dec-2019
|
‘पिंजरा’ या लोकप्रिय मालिकेमध्ये झळकलेली अभिनेत्री सारा श्रवणला अटक करण्यात अली आहे. एका नवोदित अभिनेत्याला धमकी देऊन खंडणी उकल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी श्रवणला अटक केली आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी तिला शिवाजी नगर न्यायालयामध्ये हजर केले. त्यानंतर न्यायालयाने तिची जामीनावर सुटका केल्याचे वृत्त आहे.
 

 
साराने ‘रोल नंबर १८’ या चित्रपटातील अभिनेत्याविरोधात कटकारस्थान करुन विनयभंगाची खोटी तक्रार दाखल केली होती. तसेच ही तक्रार मागे घेण्यासाठी तिने अभिनेत्याला धमकी देत त्याच्याकडून खंडणी उकळली. याप्रकरणी तिला गुन्हे शाखा यूनिट दोनने रात्री मुंबईमधून अटक केली. गुन्हा गंभीर असल्यामुळे तिने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. अटकपूर्व जामीन अर्जाला फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. मिलिंद पवार आणि अ‍ॅड. अजय ताकवणे यांनी विरोध केला होता.
 
साराने धमकी दिलेल्या अभिनेत्याचे नाव सुभाष दत्तात्रय यादव असे असून, त्याने दिलेल्या फिर्यादीवरुन सहकारनगर पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिला अटक केली. तसंच याप्रकरणी तिला मदत करणाऱ्या ‘रोल नंबर १८’ मधील अभिनेत्री रोहिणी मच्छिंद्र माने, दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल विष्णू टेकाळे आणि राम भरत जगदाळे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. त्यांना अटक झाल्यानंतर साराने दुबईला पळ काढला होता. मात्र ती मुंबईमध्ये येताच तिला पोलिसांनी अटक केली.