अल्झायमर होऊच नये म्हणून...

    दिनांक :13-Dec-2019
|
• डॉ. नितेश खोंडे
 
तुम्ही काजोल आणि अजय देवगण यांचा यु, मी और हम, हा चित्रपट पहिला असेल. त्या चित्रपटात काजोलला काहीपण वस्तू, गोष्टी, घडलेल्या घटना विसरण्याची व्याधी असते. या रोगाला अल्झायमर असे म्हणतात.
 
 
अॅलोइस अल्झेमर नावाच्या एका जर्मन डॉक्टरने 1906 साली या आजाराचा शोध लावला होता आणि याच कारणाने या रोगाचे नाव अल्झायमर, असे पडले. त्यावेळी एका स्त्रीचा मृत्यू स्मरणशक्तीच्या विचित्र लक्षणं मुळे झाला होता. तेव्हा त्याने तिच्या मेंदूचा अभ्यास केला आणि त्या लक्षणांचा संबंध तिच्या मेंदूच्या रचनेशी असल्याचा तर्क हा त्याने जगाला मांडला.
 
 
या रोगात होते काय, तर दिवसेंदिवस विसरभोळेपणा वाढत जातो. सुरुवात स्वत:चे नाव विसरणे, जेवण- खाणे विसरणे, ठेवलेल्या वस्तू विसरणे नंतर नाती विसरणे, ओळखीतल्या व्यक्ती विसरणे अशाप्रकारे लक्षणांमध्ये वाढ होत जाते. सुरुवातीला ही सर्व लक्षणे अगदी सामान्य वाटतात पण नंतर जेव्हा या रोगाचे गांभीर्य कळू येते तो पर्यंत उशीर झालेला असतो. कारण, अल्झायमर्सची सुरुवात मेंदूमध्ये झाल्यानंतर जवळपास दहा वर्षे उलटल्यानंतर मगच सुरुवातीची लक्षणे दिसू लागतात, असा शास्त्रज्ञांचा अभ्यास आहे. ज्या लोकांचे वय 70 पेक्षा अधिक आहे अशा लोकांमध्ये हा आजार झाल्याचे आढळून येते. या आजारामध्ये मेंदूतील रसायने झपाट्याने कमी होतात आणि त्यामुळे मेंदूतील पेशी हळूहळू सुकत जातात. 

alaz_1  H x W:  
 
 
मुख्य म्हणजे या विकाराचे कारण अद्यापही कारण माहीत झाले नाही. त्याशिवाय या आजारावर खात्रीशीर इलाजसुद्धा अजूनही सापडलेला नाही; पण हा रोग होवू नये म्हणून आपण काही प्रतिबंधात्मक उपचार निश्चितरित्या करू शकतो. जसे नियमित व्यायाम आणि योगासने करावी. शिवाय आहार पौष्टिक आणि सकस घ्यावा. आहार हा हलका आणि ताजा असावा, मन आणि चित्त प्रसन्न राहावे यासाठी संगीत, विरंगुळा, मेडीटेशन यांचा आधार घ्यावा.
 
 
आता आयुर्वेदानुसार या रोगाची संकल्पना आपण पाहू या...
आपले जस जसे वय वाढत जाते तस तसे आपण वृद्ध होत जातो आणि तसेच आपल्या शरीरातील इतर धातू आणि मेंदूसुद्धा वृद्ध (क्षीण) होत जातो. त्यामुळे आपली विचार करण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते; पण यामध्ये मेंदूच्या पेशी निकामी होत असतात.
 
 
मेंदूमधे 100 अब्ज चेतापेशी (न्यूरॉन्स) असतात. या चेतापेशी इतर पेशींसोबत संवाद साधून एक नेटवर्क तयार करतात आणि या नेटवर्कच्या माध्यमातून आपली विविध कार्य करत असतात. शिवाय याच्याच माध्यमातून आपल्या इतर स्नायूंना हालचालसुद्धा करता येते.
 
 
हे काम करण्यासाठी मेंदूच्या पेशी लहान कारखान्यांप्रमाणे कार्य करतात. ते पुरवठा घेतात, ऊर्जा निर्माण करतात, यंत्रसामुग्री बांधतात आणि कचर्‍याची विल्हेवाट लावतात. पेशी या माहिती साठवतात आणि त्यावर प्रक्रियादेखील करतात. सगळं काही सुरू ठेवण्यासाठी समन्वय लागतो, तसेच मोठ्या प्रमाणात इंधन आणि प्राणवायू लागतो.
 
 
अलझायमर्स रोगात, पेशींच्या कारखान्यांचे भाग नीट काम करत नाहीत, त्यामुळे इतर कार्ये प्रभावित होतात. नुकसान जसजसे वाढत जाते तसे, पेशी या आपले कार्य नीट करण्याची क्षमता हरवून बसतात. अंतत: त्या मरतात.
 
 
मेंदूची रचना पहिली तर कळून येते की मेंदू मुख्यत: स्निग्ध आणि प्रथिन पदार्थापासून बनला आहे. त्यातल्या त्यात स्निग्ध पदार्थाचा वाटा अधिक आहे. म्हणून मेंदूच्या विकृतीमध्ये कुठल्याही प्रकारचे स्नेह हे उत्तम फळ देणारे असते. आयुर्वेदामध्ये 4 प्रकारच्या स्नेहाचे वर्णन आले आहे. घृत-तैल-वसा-मज्जा अर्थात तूप, तेल, चरबी आणि मज्जा.
 
 
आयुर्वेदात गायीचे तूप हे प्रशस्त मानले आहे आणि त्याचे अनेक गुणधर्मसुद्धा आयुर्वेदात वर्णन केली आहेत.
शस्तं धीस्मृतिमेधाग्निबलायु: शुक्रचक्षुषाम्‌। बाल-वृद्ध प्रजाकान्ति सौकुमार्य स्वरार्थिनाम्‌ क्षत क्षीण परीस्पर्श स्त्राग्निग्लपितात्मनाम्‌। वात पित्त विषोन्मादशोषा लक्ष्मीज्वरापहम्‌। स्नेहानामुत्तमं शीतं वयसःस्थापनं घृतम्‌।
 
 
गायीचे हे तूप स्मृती आणि मेधा वाढविणारे आहे म्हणजेच अनुक्रमे ज्ञानग्रहण करण्याची शक्ती, ज्ञान योग्य प्रकारे साठवून ठेवण्याची शक्ती आणि वेळेवर स्मरण होण्याची शक्ती या तिन्ही गोष्टी गायीच्या तुपाचे नियमित सेवन केल्याने मिळत असते. तसेच गायीच्या तुपाने भूक सुधारते, शारीरिक शक्ती वाढते, प्रजनन क्षमता सुधारते, त्वचेची कांती वाढते, व्यक्ती सुमुमार बनतो, स्वर सुधारतो, स्क्षाताक्षीन या सारख्या शारीरिक व्याधी दूर होतात, शरीरातील वाढलेले वात-पित्त,विष दोश यांचा नाश होतो आणि वय स्थापन होण्यास मदत मिळते. म्हणून आयुर्वेदात कल्याणक घृत, महाकाल्याणक घृत, पंचगव्य घृत, ब्राह्मी घृत यासाख्या मानसिक विकारावरील चिकित्सेचा पाया हे गायीचे तुपाच असते.
 
 
या व्याधीवर दुसरी महत्त्वाची चिकित्सा म्हणजे नस्य.
आयुर्वेदानुसार नासा ही शिरसोद्वारं म्हणजे नाक हा मेंदूचा दरवाजा आहे, असे सांगितले आहे. म्हणजेच नाकातून टाकलेले औषध हे सरळ मेंदूमध्ये पोहोचते. आधुनिक मतानुसारसुद्धा ब्लड-ब्रेन-बॅरियर मुळे मेंदूच्या अनेक विकारांसाठी उपयोगी ठरणारा मार्ग म्हणजे नाकातून औषध देणे. नाकाच्या आतल्या श्लेष्मल त्वेचेतून स्निग्ध पदार्थ जलद गतीने मेंदूकडे पोहोचवले जातात. तोंडावाटे घेतलेली औषधं ब्लड-ब्रेन-बॅरियर मुळे मेंदूच्या विकारात कुचकामी होतात किंवा फारच अल्पांशाने उपयोगी पडतात. त्यासाठी नाकातून औषध देणे हा सहज, सोपा आणि परिणाम करणारा मार्ग आहे. यामुळे या विकारात गायीच्या तुपाचे नस्य नियमित केल्यास हा रोग टाळता येतो. याशिवाय या विकारात अश्वगंधा, ब्राह्मी, शंखपुष्पी, वेखंड, तुळस, गुडूची, आमलकी, यष्टीमधू अशा वनस्पतींनी आणि त्यांचे कल्पसुद्धा फायदे देणारे ठरतात.
 
 
9607297777