माझा शेतकरी बाप!

    दिनांक :13-Dec-2019
|
संजना संतोष गिरी
 
 
सरकारी कर्मचार्‍यांची नोकरी आठ तास. फारच झालं तर बारा तास, असा नियम आहे भारतात. त्यात ठरलेल्या वेळेचा ठरलेला पगार बरोबर महिन्याच्या एका विशिष्ट दिवशी बँक खात्यात जमा केला जातो. पण, जो 24 तासांतील 24ही तास देशाला सेवा द्यायला मागे हटत नाही, ज्याच्या कष्टावर, ज्याने गाळलेल्या घामावर तुम्ही जगता, अशा शेतकर्‍याचे उत्पन्न किती व त्याला जगण्याला लागणारा खर्च किती, याकडे लक्षही द्यायला वेळ नसतो या सरकारला.
 
 
काय तर म्हणे, सातवे वेतन लागू होणे, दर महिन्याला पगार पाचशे, हजार रुपयाने वाढणे, हे सर्व सरकारी सेवेत कार्यरत असणार्‍यांनाच का? आम्ही शेतकरी काय बाह्य देशात मालाची विक्री करतो? आम्हीतर आपल्याच देशाला जगवतो ना? मग आमचा विचार केव्हा होईल? प्रत्येक राजकारणी येतो, मोठमोठी आश्वासने देतो आणि चार-साडेचार वर्षे पदाचा उपभोग घेतल्यावर शेवटच्या सहा महिन्यांत त्याला आठवते, शेतकर्‍यांसाठी काहीतरी करायला हवे. काय तर म्हणे, शेतकर्‍याला कर्जमाफी द्या. अहो, जगाचा पोशिंदा असतो शेतकरी! तुमची काय लायकी त्याला माफी द्यायची? ज्याच्या भरवशावर तुम्ही जगता, त्याला तुम्ही कर्जमाफी देणार? कर्ज काढून पाप नाही केलं त्यानं, द्यायचीच असेल तर कर्जमुक्ती द्या! 

poshinda _1  H  
 
 
भरपूर असे क्षेत्र आहेत, ज्यात पालकांना पाल्याच्या शिक्षणाकरिता विशिष्ट निधी सरकारद्वारे प्राप्त होतो. त्यात शेतकरी का सामील नसतो? त्यात शेतकर्‍याच्या मुलाला महिन्याचे निदान पाच हजार तरी देता का हो कधी? शहरातील जीवन फार चांगले असते. कारण इथे सर्व सुखसुविधा आहेत. कमी मेहनतीत भरपूर पैसा मिळतो. पण, खरा शेतकर्‍याचा मुलगा असला ना, तर खेड्यात लागणार्‍या उन्हाच्या चटक्यांची मजा इथे केव्हाच घेऊ शकणार नाही. संध्याकाळी पाच-सहा वाजता जेव्हा शेजारच्या मैत्रिणीचे बाबा घरी येऊन चहा घेतात, तेव्हा माझे बाबा केव्हा येणार ही ओढ लागते. पण, नक्की काहीच नसतं.
 
 
गारठवणार्‍या थंडीत जेव्हा दोन पांघरुणं कमी पडतात ना आपल्याला, तेव्हा माझा बाप गव्हाला पाणी देतो हो! जेव्हा सकाळी सात-आठ वाजता तुम्ही ‘गुड मॉर्निंग’ पप्पा, असं म्हणता ना, ती माझ्या बापाची घरी यायची वेळ असते. रात्रभर शेत ओलीत करून गारठलेल्या पायाने बाप घरी येतो ना, तेव्हा त्याला होणार्‍या त्रासाची जाणीव त्याच्या परिवाराला अगोदरच होते. मनात चाकू रुतत असले, तरी ओठांवर स्मित हसू फक्त माझा शेतकरी बापच करू शकतो.
 
 
एवढं सगळं करून जेव्हा सहा बॅगला पाच आणि सहा पोते सोयाबीन होतं, चार एकर शेतात आठ क्विंटल कापूस निघतो, तेव्हा कुणाला सांगणार तो त्याचं दु:ख? पोलिस केस करायची का शेतकर्‍याने, मला नुकसानभरपाई पाहिजे म्हणून? कर्तव्यनिष्ठता तर जन्मतःच असते हो शेतकर्‍यात. कधीच कामाला मागे येत नाही. उन्हाळ्यात जमिनीची मशागत करून पूर्ण उन्हाळा शेतात राबून पूर्ण ऊन अंगावर घेणारा फक्त माझा शेतकरी बापच असतो.
 
 
तुम्ही जन्मलेल्या मुलाला जसे प्रेमाने पाहता, त्यावर प्रेम करता, त्याला काळजाच्या तुकड्यासारखं जपता ना, तसंच एक शेतकरी शेतातील प्रत्येक रोपट्यावर प्रेम करीत असतो आणि नशीब तर पाहा त्याचे, उन्हाळ्यात 9-10 हजार रुपये क्विंटल असणारी तूर, जेव्हा माझ्या बापाच्या शेतात होते व बाजारात विकायला नेली जाते तेव्हा तिचा भाव फक्त तीन, साडेतीन हजार रुपये क्विंटल! आणि हो, ती तूर विकत घेणारा जेव्हा तिचे डाळीत रूपांतर करतो ना तेव्हा ती डाळ 80 ते 100 रुपये किलो. म्हणजे तूर पिकवतो त्याच्यापेक्षा जास्त नफा त्या व्यापार्‍याला!
 
 
मुलगी सांगते, बाबा मला ट्युशनचे पैसे द्यायचे आहेत, मला कॉलेज खर्च आहे, तेव्हा एक पैशाचाही विचार न करता, मुलीने तोंडातून काढलेली रक्कम तिच्या हातात देणारा माझा शेतकरी बापच असतो. बाबा पैसे देताना थोड्या अशांत झालेल्या आईला हळूच शांत करून, अगं! लेकरासमोर काही नको म्हणू, आपण करू न काहीतरी, असं म्हणून आईला शांत करणारादेखील माझा शेतकरी बापच असतो.
 
 
इतके कष्ट करून आणि इतके दु:ख पचवून कधी ऐकलं का हो तुम्ही की, शेतकर्‍याने घोटाळा केला, शेतकर्‍याने भ्रष्टाचार केला किंवा शेतकर्‍याने देशद्रोह केला? नाही ना? कारण जगाचा पोशिंदा हा तारक असतो, मारक नाही. समाधानी असतो तो. गर्व आहे मला माझा बाप शेतकरी असल्याचा. माझा शेतकरी बाप राजा होता आणि राजाच राहणार!
9850376160