विकृतींची पेरणी!

    दिनांक :13-Dec-2019
|
रोहिणी पंडित 
 
एखादी घटना पार ढवळून काढत असते. माणूस अनेक संकटांशी सामना करतच आजच्या स्थितीत आला आहे. त्यात त्याच्या समूहाने राहण्याचा आधार त्याला मिळत आला आहे. मात्र, काही घटना अशाच घडतात की, मग तो मुळापासून हलून जातो. मानवी समूहाच्या बाहेरचा शत्रू असेल, संकटाचे कारण माणूस नसेल, तर मग सगळी माणसे एकत्र होतात आणि त्याचा सामना करतात; पण माणूसच माणसाचा वैरी झाला तर मग मात्र दुभंग होतो. माणसांत वाटणी होते. दोन तट पडतात आणि मग संकट आणखीच गहिरं होत जातं. आता तसंच झालेलं आहे. आतावर माणसानेच माणसाचे समूहाने जगणे संकटात टाकले आहे. बाहेरचा शत्रू फार कमी वेळा आलेला आहे. माणसांचे दोन गट पडले, कधी ते जात, धर्म, पंथ, वर्ण, वर्ग यामुळे पडले, तर कधी तो देशांच्या सीमांमध्य वाटला गेला. माणूस म्हणून तो एकसंध राहिला तर त्याच्यावर संकटे फार कमी येतात.
 
 
मुळांत माणसावर संकटे येतात ती त्याच्यातल्या स्पर्धेमुळे. त्याच्या गरजांचे तंटे होतात. दोन माणसांच्या गरजा छेदल्या किंवा मग समूहाच्या गरजा, अधिकार यांत तंटा निर्माण झाला तर त्यांच्यात युद्धच निर्माण होते. माणसा-माणसांत भेद निर्माण होतात. माणसांच्या भुकांनी त्याला माणूस म्हणून क्षीण केले आहे. मग तो पर्यावरण नासवितो, समाजजीवन नागवतो. त्याची संस्कृती धोक्यात येते. समूहाने समोपचाराने राहण्याचे नियम म्हणजे संस्कृती. ती संयमन आणि नियमनानेच स्थिर राहते. हे संयमन आणि नियमन त्याच्या नैसर्गिक भुकांचेच असते. त्यातली नैसर्गिकता संपली की, मग तो जनावरासारखा वागू लागतो. लहानपणापासून त्याला कुटुंब, समाजात नैसर्गिक भुका आणि गरजांचेच संयमन, नियमन शिकविले जाते. त्याचे मानवी पर्यावरण धोक्यात येते ते त्याच्या अतिरिक्त गरजांमुळे, भुकांमुळे. संस्कृती आणि संस्काराचा पायाच मुळात त्याच्या वासना संयमित ठेवण्यावर आधारलेला असतो. 
 
nira _1  H x W:
 
 
आता असे म्हणतात की, आजचा मानव हा प्रगत आहे. मात्र, प्रगतीच्या गतीत त्याने त्याचा निसर्ग सोडला आहे. बलात्कार्‍यांना जनावर असे म्हणतात. नराधम असे म्हणतात. मात्र, जनावरे असला अधमपणा कधीच करत नाहीत. इतर प्राण्यांत मादीवर जबरदस्ती कधीच केली जात नाही. मादीची संमतीच जास्त महत्त्वाची असते. नर तिला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. बर्‍याचदा एका मादीसाठी दोन नरांत जीवघेणे भांडण होते. त्यात जो पराभूत होतो तो माघार घेतो, मात्र तरीही कथित विजेत्या नराला मादीची पसंती आवश्यकच असते. तिने त्याला सहमती दिली नाही तर तो आपल्या वाटेने निघून जातो. मादीची सहमती अजीबात विचारात न घेणार्‍या आणि तिच्यावर जबरदस्तीने शरीरसंबंध लादणार्‍या पुरुषाला जनावर कसे म्हणायचे? त्याने निसर्ग सोडलेला असतो.
 
 
आतातर माणूस प्रगत झालेला आहे. झाकला गेला आहे. तितका तो उघडा पडत चालला आहे. आजच्या बाजारीकरणात माणसाचेच वस्तुकरण झालेले आहे. त्यात स्त्रीचे अधिकच झालेले आहे. ती वस्तूच आहे आणि उपभोग्य आहे, हा भाव वाढत चालला आहे. त्यामुळे स्त्रीचे दमन वाढत चालले आहे. तिचे शोषण सुरूच असते. त्याचा बोभाटाही होत नाही. बोभाटा तेव्हाच होतो जेव्हा ती त्याविरुद्ध बंड पुकारते. शोषणाला नकार देते. अन्यथा ती चुपचाप सहन करत राहते आणि कुटुंब, कबिले, वाड्या, गावे, शहरे अशा मानवी समूहांच्या गटांमध्ये तिच्यावर अत्याचार सुरू राहतात. तिचा अस्मिताभंग, विनयभंग सुरूच असतो. पुरुषी वासनेचे ओरखडे तिच्या शरीरावर उमटतच असतात. अगदी रस्त्याने जात असताना तिच्या बाजूने जात इव्ह टिझिंग करण्यापासून वासनांध नजरेने न्याहाळण्यापर्यंत हे सुरू असते. संधी साधून तिच्या शरीराला नको त्या ठिकाणी स्पर्श केला जातो. शाब्दिक आणि असे अस्पर्श विनयभंग सहन करत राहते ती. त्यातून मग मानवी नरांची धिटाई वाटढत जाते. मग कधीतरी हैदराबादसारखे प्रकरण घडते. ते घडले की, जो आक्रोश निर्माण होतो तो या सार्‍या भूतकाळात अनुभवलेल्या वासनेच्या ओरखड्यांतून निर्माण झालेला असतो. रस्त्यावर याचा निषेध करण्यासाठी ज्या स्त्रिया उतरतात त्या सगळ्याच जणींनी पुरुषी वासनेचे अन्‌ उपभोगाच्या आगीचे चटके सहन केलेले असतात. त्याचा दाबून ठेवलेला आक्रोश अशावेळी उफाळून वर आलेला असतो.
 
 
हे असे सहन करणेच चूक आहे. अगदी साध्या वाटणार्‍या प्रसंगातही रोखायला हवे. प्राचीन काळी गोधन होते, भूधन होते तसेच स्त्रीदेखील धनच मानली जात होती. युद्धे होत तर ती जमीन, जनावरे आणि स्त्रिया यांच्यासाठीच. विजेत्यांचे जनानखाने ओसंडून वाहत. आताही स्त्रीला उपभोग्य वस्तू समजण्याची, धन समजण्याची प्रवृत्ती कायम आहे. ती सुप्तावस्थेत असते, मात्र वेळ, प्रसंग पाहून ती फणा काढते आणि तिच्या स्त्रित्वाला दंश करते. हळूहळू या सार्‍यांचा बाजार झालेला आहे.
 
 
आजचे युग बाजारीकरणाचे आहे. त्यात जग हीच बाजारपेठ झालेली आहे. आधीच्या काळी मानवाच्या गरजांनुसार वस्तू तयार केल्या जायच्या आणि त्या मग त्याच्यापर्यंत पोहोचविल्या जायच्या. त्याला मर्यादा होत्या. आता अमर्याद वस्तूंचे निर्माण केले जाते आणि मग त्याची गरज निर्माण केली जाते. त्यासाठी काहीतरी प्रेरकांचा वापर केला जातो. बहुतांशवेळा ही प्रेरणा कामभावना हीच असते. खरेदीदार हे सहसा पुरुष असतात. किमान खरेदीचा अंतिम निर्णय पुरुषांचाच असतो. त्यांची परवानगी घेतल्याशिवाय घरची स्त्री खरेदी करत नाही. त्यामुळे त्याच्या पौरुषाला आवाहन देणारे, त्याचे पौरुष चेतविणारे प्रेरक वापरले जाते आणि ते कामभावना हेच असते. त्याला आम्ही स्त्रिया विरोध करत नाही. बहुतांश जाहिरातीत स्त्रियांचा वापर केला जातो. त्यातही कामभावनेला आव्हान केले जाते. अगदी सुप्तपणे, नर्म विनोद, नर्म शृंगार यांच्या माध्यमातून ते साधले जाते. ही सुरुवात असते. माणसाची पुरुषी आदिम प्रवृत्ती अधिक उत्तेजित केली जाते. स्त्रिया त्याला बळी पडतात. बाजारशरणतेतून ती आपले वस्तुकरण स्वीकारत जाते नकळत.
 
 
आता परवाचीच गोष्ट. मी सकाळच्या फेरफटक्याला निघाले होते. फिरून परत येताना साडेसहा-सातची वेळ झाली असेल सकाळची. घराकडे वळताना कोपर्‍यावरच्या तयार कपड्यांच्या दुकानापाशी थबकायला झालं. दुकान बंद होतं. स्त्रियांच्या वस्त्रांचं ते दुकान आहे. समोर शोकेस आहे. दुकान बंद असलं तरीही शोकेस खुलीच असते, म्हणजे काचेत बंद असलेले ते स्त्रियांचे पुतळे दिसत असतात आणि त्या पुतळ्यांना स्त्रियांचे अंतर्वस्त्र घातलेले असतात. दुकान बंद असताना काचेतून हे सारे दिसत राहणे, त्याचे असे जाहीर प्रदर्शन काय सूचित करते? अगदी शहरांपासून छोट्या गावांपर्यंत हेच दृश्य दिसते. पुरुषांच्या कपड्यांचेही प्रदर्शन केले जाते, मात्र असे अंतर्वस्त्र घातलेले त्यांचे पुतळे नसतात. गावाकडच्या बाजारात किंवा शहरांतील स्ट्रीट शॉप्समध्ये दोरीवर स्त्रियांच्या कुंचक्या टांगलेल्या असतात. का? त्यामुळे नजरा तिकडे वळतात. त्याच्या त्या प्रदर्शनावर कुणीच आक्षेप घेत नाही. अगदी स्त्रियादेखील. आता वस्तू कुठलीही असो, त्याच्या जाहिरातीत कामभावनेचा वापर अगदी सढळपणे केलेला असतो. त्यासाठी स्त्रियांचा वापर म्हणण्यापेक्षा गैरवापरच केलेला असतो. 
 
  
तुम्ही कुठलेही उत्पादन घ्या, त्यात हेच प्रेरक वापरलेले असते. पुरुषांच्या दाढी करण्याच्या रेझरच्याही जाहिरातीत त्याने अमुक रेझर वापरले तर त्याची दाढी स्मूथ होते आणि मग त्याच्या गालाला एखादी तरुणी येऊन गाल घासते... पुरुषांच्या अंतर्वस्त्राच्या जाहिरातीत तो अमुक एका ब्रँडची निकर घालून आला तर त्याच्या देहभर चुंबनाचे व्रण दाखविले जातात. अगदी मिनरल वॉटरच्या जाहिरातीतही तहानलेल्या महिला इन्स्पेक्टरला तहान लागलेली असते आणि तिने पकडलेला चोर तिला प्यायला पाणी देतो... ती त्याला सोडून निघून जाते! आता यात त्याचे पाणी देतानाचे हावभाव आणि तिचे ते पितानाचे हावभाव हे ही कुठली ‘प्यास’ भागविली जाते आहे, हे नेमकेपणाने दाखविणारेच असतात...
 
 
अशा काही घटना घडल्या की, माध्यमे त्याच्या विरोधात ओरड करतात. त्याचा निषेध करतात. ते योग्यही आहे. मात्र, अगदी वर्तमानपत्रांपासून (काही सन्माननीय अपवाद आहेतच!) सगळ्याच नियतकालिकांत अगदी हमखास उत्तान छायाचित्रे आणि सेक्सच्या संदर्भातला मजकूर असतोच. ‘कुठल्या राशीची व्यक्ती प्रेमात कशी असते!’ हे सांगताना प्रेम म्हणजे केवळ शरीरसंबंध असेच असते. या संदर्भातले ज्ञान आणि टिप्स देण्यात तर सारेच आघाडीवर असतात. ‘स्त्रियांना सेक्स करताना काय आवडतं?’, ‘मैथुन करताना घ्या ही काळजी!’, ‘स्त्रियांना त्यासाठी कसे तयार करावे...’ याच्या टिप्स अणि छोटेखानी लेख असतात. अगदी महिलांसाठीच असलेल्या काही नियतकालिकांत गुळगुळीत कागदावरच्या छपाईत अखेरची काही पाने पोर्नोग्राफिक फोटो असलेलीच असतात. अगदी मातब्बर वर्तमानपत्रांच्या पोर्टल्सवर तळाला स्त्रियांची उघडी- नागडी छायाचित्रे दिलेली असतात. तमक्या अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशूट, तमकीचे टॉपलेस हॉट फोटो बघा... अशा मथळ्यांसह हे फोटो दिलेले असतात. तिथे वाचक थांबतो आणि मग पोर्टलच्या हिटस्‌ वाढतात...
 
 
हे सगळे असे सर्रास सुरू असते. महाभारतात द्रौपदीचे एकदाच वस्त्रहरण झाले. ऑनलाईन माध्यमांवर जाहीरपणे स्त्रियांचे असले वस्त्रहरण सर्रास सुरू असते. अगदी रोजच सुरू असते. त्यावर कुणीच आक्षेप घेत नाही. त्यातून रोजच कामभावनेची प्रेरके इंजेक्ट केली जातात. हे स्लो पॉयझनिंग आहे. त्यातून मग असा स्फोट होतो. सतत कामभावना उद्दीपित केली जाते. अमका बॉडी स्प्रे वापरला की ललना विळखाच घालतात. तमकी टूथपेस्ट वापरली की लगेच चुंबनासाठी तरुणींच्या रांगाच लागतात. म्हणजे दात सुदृढ राहण्यापेक्षाही तोंडाला इतका मादक सुगंध असतो की मग तरुणींना चुंबनच घ्यावेसे वाटते, दुसरा उपायच नसतो... हे सारे असे होत असताना त्याला स्त्रियाही विरोध करत नाहीत. त्यांच्या संघटनांनाही हे सारे आक्षेपार्ह वाटत नाही. ही विकृतींची पेरणी आहे, असेही कुणालाच वाटत नाही. आम्ही कामभावनेचा असा बाजार मांडला आहे. त्याचे परिणाम व्हायचे तेच होतात. अर्थात बलात्कारांच्या मागे केवळ हेच एक कारण आहे, असे नाही. मात्र, अशा सूक्ष्म प्रेरकांनी विकृती वाढीस लागते, हे खरेच!