हिंदूंना कसे निपटायचे याचे कायदे

    दिनांक :15-Dec-2019
|
 
विजय मनोहर तिवारी
 
मोहम्मद गोरीच्या फौजांकडून पृथ्वीराज चौहानचा पराभव आणि दिल्ली-अजमेरवरील ताब्यानंतर कुतुबुद्दीन ऐबकचा राज्याभिषेक होतो. हा ऐबक मोहम्मद गोरीचा खरीदलेला गुलाम होता. तोच पहिला सुलतान झाला. याच्यापासूनच गुलाम वंशाची सुरवात मानली जाते. हे हिंदुस्थानचे दुर्भाग्यच म्हटले पाहिजे की, खरीदलेल्या गुलामांनीच या देशाच्या गुलामगिरीचे प्रारंभीचे अध्याय लिहिले.
 
 
दिल्लीवरील ताब्यानंतर प्रारंभीच्या आक्रमकांच्या टोळ्यांमध्ये, आता काफिरांना कसे वागवायचे, याचे कायदे करण्यात गुंतलेले धार्मिक जाणकार काही कमी नव्हते. सुलतानांचे राज्य बाबरच्या येण्यापर्यंत म्हणजे 1193 ते 1528 पर्यंत राहिले. त्या काळात हाफिझ सईदसारखे इस्लामचे विद्वान, सत्तेच्या नव्या ताबेदारांच्या वतीने काय सांगत होते आणि काफिरांबाबत त्यांचे काय विचार होते, हे बघू या.
 

hindu _1  H x W 
 
 
जियाउद्दीन बरनीदेखील त्यांच्यापैकीच एक होता. परंतु, बरनीच्या आधी, 1164च्या आसपास जन्मलेला फखरे मुदब्बिर होऊन गेला. तो लाहोर येथे कुतुबद्दीन ऐबकच्या राज्याभिषेकाच्या वेळी उपस्थित होता. इतिहासात त्याच्या दोन पुस्तकांचे उल्लेख सापडतात. त्यातील एक आहे- ‘आदाबुल हर्ब वश्शुजाअत.’ हे पुस्तक, हिंदुस्थानवर ताबा मिळविणार्‍या सुलतानांसाठी निर्धारित केलेली इस्लामी आचारसंहिता आहे.
 
 
प्रारंभीच तो म्हणतो- ‘‘पैगंबरने म्हटले आहे की, बादशहांचा एका क्षणाचा न्याय, रात्रभर नमाज पढणार्‍या आणि दिवसभर रोजा ठेवणार्‍या एखाद्या मनुष्याच्या 60 वर्षांच्या उपासनेहून अधिक असतो.’’ त्याने सुरवातीला अल्लाच्या नावावर प्रामाणिकपणा आणि न्यायाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. बादशाह आणि वजीर यांनी कसे वागले पाहिजे, याचे सविस्तर वर्णनही त्याने केले आहे.
 
 
ज्यावेळेस त्याने हे आदेश लिहिलेत त्या वेळी लाहोर-दिल्लीवर ताबा मिळाला होता आणि हिंदुस्थानात मुस्लिम राज्य सुरू झाले होते. राज्य तर कोट्यवधी बहुसंख्यक हिंदूंवर करायचे होते. त्यामुळे फखरे मुदब्बिर, लवकरच मुसलमानांसाठी प्रामाणिकता व न्यायाचे सल्ले सोडून, आपल्या मूळ स्वभावावर येतो.
 
 
फखरे मुदब्बिर म्हणतो- ‘‘युद्ध पाच प्रकारची असतात. एक म्हणजे काफिरांशी युद्ध. हे युद्ध खूपच उत्कृष्ट असते. यात जर दुसर्‍याची कत्तल केली तर तुम्ही गाजी (म्हणजे धर्मयोद्धा) होता आणि स्वत: मेले तर शहीद होता.’’ मुसलमानांसाठी त्याचा एक महत्त्वाचा तर्क आहे- ‘‘मुसलमानांसाठी युद्ध करणे, नमाज आणि रोजांप्रमाणे आवश्यक आहे.’’
 
 
हा काळ असा होता, जेव्हा लाहोर आणि दिल्ली ताब्यात आल्यानंतर गुलाम वंशाचे सुलतान आणि त्यांच्या सोबत आलेल्या इस्लामी सैन्यांच्या उन्मादी सरदारांना, दूरदूरपर्यंत आक्रमण करण्याची अतिशय घाई सुटली होती. पृथ्वीराज चौहानशी समोरासमोरच्या दोन लढायांमध्ये जबरदस्त पराभवानंतर प्राप्त झालेला विजय, त्यांच्या कल्पनेच्या पलीकडचा होता. काफिरांचा संपूर्ण प्रदेश त्यांना, रिकामे मैदान व छप्पन भोगांनी सजलेल्या थाळीप्रमाणे दिसत होता. विराण आणि उजाड पर्वतीय अथवा वाळवंटी प्रदेशातून आलेल्या या आक्रामक टोळ्यांच्या कल्पनेच्या पलीकडे होता भारत देश.
 
 
सुरवातीला ते इथे केवळ अमाप लूट आणि ताब्याच्या आशेने आले होते. परंतु, सिंधनंतर आक्रामकांच्या प्रत्येक पुढच्या पिढीनंतर त्यांचा लोभ आणि धडपड वाढतच गेली. आधी सिंध, नंतर काबुल, नंतर लाहोर आणि नंतर दिल्ली... त्यांच्याकडे रिटर्न तिकीटच नव्हते. अभावग्रस्त वाळवंटी राज्यात परत जाऊन ते करणार तरी काय होते!
 
 
फखरे मुदब्बिरसारखे अनेक विद्वान, कत्तल आणि लुटीचा हा क्रम पुढे नेण्यासाठी बारकाईने नियम-कायदे तयार करत होते. फखरे आपल्या पुस्तकाच्या 25 व्या प्रकरणात, या प्रदेशातील काफिरांना कसे निपटायचे हे सविस्तर सांगतो. त्याच्याच या सल्ल्यांना नंतर पूर्ण शक्तिनिशी अंमलात आणले गेले.
 
 
-काफिरांशी युद्ध करणे हे फार मोठे कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवा. मोहम्मद साहेबांनी सांगितले आहे की, जर कुणी दिवसरात्र काफिरांशी युद्ध करत असेल, तर तो जगातील सर्व वस्तूंहून चांगला आहे. गाजींच्या रांगेत क्षणभरही उभे राहणे, 60 वर्षांच्या उपासनेहून चांगले आहे.
 
 
-लुटीचा माल खाणे किंवा त्याचा उपभोग घेणे मुसलमानांना धर्मदृष्ट्या उचित आहे. सैनिक, उंट, घोडे, गाय, बकर्‍या, गुलाम, धन-दौलत आणि शस्त्रे जे काही आणाल, त्यातून सुलतानाने पाचवा हिस्सा घ्यावा. लुटीच्या मालाचा पाचवा हिस्सा अल्ला, प्रेषित, अनाथ, गरीब आणि कारभार्‍यांच्या मालकीचा आहे.
 
 
-काफिरांशी युद्ध आवश्यक आहे. मुसलमान दारुल-हर्बमध्ये गेले, आणि तिथे कुणा किल्ल्याला अथवा शहराला त्यांनी घेरले तर सर्वप्रथम त्यांना (म्हणजे काफिरांना) इस्लाममध्ये यावयास सांगावे. त्यांनी इस्लाम कबूल केला तर युद्ध करू नये. जर कबूल केला नाही तर, जिझिया वसूल करावा. जिझिया देणे मान्य केले तर युद्ध करू नये. जर इस्लाम किंवा जिझिया मान्य केले नाही तर युद्ध आवश्यक आहे. त्यांचा विनाश केला पाहिजे.
 
 
-जर एखाद्या शहरावर बळजबरीने कब्जा केला तर बादशाहाने जमीन मुसलमानांना वाटून द्यावी. त्यांची खंडणी (खिराज) निश्चित करावी. युद्धात बंदी बनविलेल्या लोकांची वाटल्यास कत्तल करावी. वाटल्यास त्यांना गुलाम बनवून ठेवावे किंवा त्यांनी मुसलमानांची सेवा करावी, असे वाटत असल्यास त्यांना मोकळे सोडावे. परंतु त्यांना उगीचच जिवंत सोडू नये.
-गुलाम, महिला, मुले आणि जिम्मींना (इस्लामी राज्यातील गैरमुस्लिम) लुटीच्या मालातील कुठलाही हिस्सा मिळणार नाही. जिम्मींना मुसलमानांच्या शहरात घोड्यावरून जाण्यास परवानगी नसेल.
 
 
या अशा नियम-कायद्यांमुळे इस्लाम कबूल करणार्‍यांची संख्या कमी राहिली नसेल आणि पुढे होत गेलेल्या प्रत्येक आक्रमणात पराभूत होणार्‍या हिंदूंपुढे हेच पर्याय ठेवले गेलेत. परंतु, तात्कालिक विवशतेमुळे जे लोक मुसलमान व्हायचे ते, हल्ले आणि लुटीपासून सुटका होताच पुन्हा आपल्या प्राचीन परंपरेत परतत होते. यापेक्षा असे म्हणणे अधिक योग्य राहील की, शिक्षा म्हणून ते वरवर मुसलमान दिसायचे, परंतु हजारो वर्षांची आपली संस्कृती व परंपरा तर त्यांच्या रक्तात होतीच, ती संकटांचा वाईट काळ जाताच पुन्हा आपल्या मूळ रंगात परतत होती.
 
 
 
आपली मूळ ओळख आजपर्यंत देशाच्या कानाकोपर्‍यात राष्ट्रनिष्ठ मुसलमानांनी आपल्या आडनावांच्या रूपात कायम ठेवली आहे. उत्तरप्रदेशात हजारो मुसलमान आपले आडनाव चौहान, त्यागी आणि राणा लिहितात. राजस्थानात राठोड, नागोरी आणि चौहान, काश्मिरात पंडित, भट्‌ट व डार (जे मुळात धर आहे), बंगालमध्ये चौधरी, विस्वास आणि सरकार, गुजरातमध्ये देसाई व पटेल, महाराष्ट्रात इनामदार, देशमुख व मोडक... अशी देशाच्या कानाकोपर्‍यात हजारो उदाहरणे आहेत.
 
 
त्या काळात नवे राज्यकर्ते व त्यांच्या विद्वानांसमोर एक आव्हान निश्चितच होते की, कन्व्हर्टेड लोकांना इस्लामच्या मार्गावर कायमचे कसे काय बांधून ठेवावे. कुणी आपल्या मूळ परंपरेत परतला तर त्याला मुरतद म्हटले जायचे. विद्वान आणि राज्यकर्ते म्हणजेच, मजहबी नेते आणि राजिंसहासनावर बसणार्‍यांची संयुक्त जुगलबंदी, इस्लाममध्ये नेहमीच एकरूप राहिली आहे. राज्य आणि मजहब याचे हे एक अजब मिश्रण आहे. त्यात आध्यात्मिकता शून्य आहे. कुठल्याही पंथाचा प्रवास विचाराने सुरू होत असतो आणि अनुभूतीच्या स्तरावर तो आपले प्रमाण सादर करतो. भारतातील प्रचलित पंथांनी आध्यात्मिक अनुभूतीच्या स्तराला स्पर्श केला होता आणि हा हजारो वर्षांचा प्रवास होता. हिंसक राजाने मारून-मुटकून लोकांच्या गळी उतरविलेला हा कुठला चार-सहा शतकांत तयार झालेला जिद्दी विचार नव्हता.
 
 
कन्व्हर्टेड लोकांना पक्के निष्ठावंत कसे करावे, यासाठी दिल्लीवर ताबा मिळविलेल्या या नव्या ‘मजहबी-सियासत’ किंवा ‘सियासी-मजहबा’ने केलेली ही मजबूत तयारी होती. मुदब्बिर म्हणतो- ‘‘जो कुणी इस्लामला त्यागून मुरतद होईल, त्याची तीन दिवस वाट बघावी. त्यानंतर त्याला पुन्हा इस्लाम कबूल करण्यास सांगावे. त्याने ते कबूल केले तर ठीक, नाहीतर त्याला ठार करण्यात यावे. त्याने इस्लाम कबूल केला तरच तो त्याच्या धनदौलतीचा मालक होऊ शकतो.’’ मुदब्बिरच्या अनुसार, इस्लाममध्ये एकमेकांना पाठविण्यात येणार्‍या भेटवस्तूंच्या लांबलचक यादीत भांडीकुंडी, तलवार, ढाल, धनुष्यबाण, चिलखत, चंदन, रेशमी कापड, वाघांचे कातडे, शिकारी कुत्रे आहेत. परंतु, या यादीत सर्वात वर हिंदू गुलाम आणि दासी यांना ठेवण्यात आले आहे.
 
 
प्रत्येक युद्धाच्या लुटीच्या मालात या दासी असंख्य असायच्या. त्या कुठल्या ना कुठल्या सैनिकांच्या वाट्याला येत असत. नंतर त्यांना मुले होत असतील. या मुलांनाही मुले होत असतील आणि वेगाने वाढणार्‍या लोकसंख्येत ही जमात मरत-जगत इथे-तिथे पसरत गेली असेल. आजच्या हिंदुस्थानात कुणाच्या चेहर्‍यात या जमातीचा शोध घ्यायचा? आजचे जिन्ना, जिलानी, जरदारी, गिलानी, आझाद, अब्दुल्ला, आझम, उस्मानी, ओवैसी, भट्‌ट, भुट्‌टो, इरफान, इकबाल, इमाम, खान, सलमान, सुलेमान, जावेद, जफर, हबीब, हाफिझ आणि मुफ्ती यांचे पूर्वज भूतकाळात कुणाशी जाऊन मिळत असतील?
 
 
 
खुनी आक्रमकांशी आपल्या एकजात पूर्वजांना जोडणे, एक मनोरम भ्रम आहे. खरेतर इतिहासातील रक्तपाताने बरबटलेली ही दुर्गंधी, विस्मरणात गेलेल्या आठवणीत दफन झाली आहे. भूतकाळातील तळघरात डोकावून बघण्याऐवजी, आम्ही तर इराण किंवा अफगाणिस्तानाहून फलाण्या-फलाण्या सुलतान अथवा बादशहाच्या काळी हिंदुस्थानात आलो होतो, असे मिरवणे अधिक सोयीचे आहे. आमचे पूर्वज मोठे योद्धे होते किंवा विद्वान होते किंवा आम्ही कुठल्यातरी सूफीच्या संगतीने मजहब बदलला! एक हजार वर्षांच्या काळाच्या खाचांमध्ये त्यांना आपल्या कुठल्या पूर्वजांवर गर्व आहे आणि कुणावर लाज वाटते आणि कुणावर रागवायला हवे, हे विचारायला हवे.
 
 
इस्लामी सुलतान, बादशाह, नवाब आणि निझामांना इस्लामच्या दृष्टीने जे अंमलात आणायचे होते, ते फखरे मुदब्बिरने सांगितले. येथे गंगा-जमुना संस्कृतीची कुठली शक्यताच नव्हती. हिंदुस्थान व हिंदूंशी कसे आचरण केले पाहिजे, याच्या स्पष्ट सूचना 34 प्रकरणांत लिहून ते पुस्तक त्याने इल्तुतमिशला भेट दिले. लाहोरमध्ये चौगान (पोलो खेळ) खेळताना कुतुबुद्दीन ऐबकच्या मृत्यूनंतर गादीवर बसलेला इल्तुतमिश हा गुलाम वंशाचा दुसरा सुलतान होता.
 
 
हा तो काळ होता जेव्हा पृथ्वीराज चौहान आणि त्याच्या आधी शतकानुशतकांपासून स्थापित हिंदू राजवंशांच्या कहाण्या संदर्भहीन होत चालल्या होत्या. या वेळी जी पिढी जिवंत होती, त्या पिढीतील लोकांनी पृथ्वीराज चौहानचा पराभव आणि त्यानंतर तुर्कांच्या फौजांनी दिल्ली व अजमेरच्या विध्वंसाच्या कथा केवळ ऐकल्या नसतील, तर ते सुरवातीचे भुक्तभोगीही होते. या दस्तावेजांमध्ये हिंदूंबद्दलचा द्वेष पानोपानी दिसून येतो.
 
 
राज्यासाठी भारतीय राजांमध्ये युद्ध आधीही होत होते. परंतु, जनतेला गाजर-मुळ्याप्रमाणे कापणे किंवा आपल्या मनमर्जीने हाकलणे, ही एक अजब आसुरी जिद्द होती. त्या वेळी या आसुरी जिद्दीची कल्पना दिल्ली, अजमेर अथवा आसपासच्या गावखेडी, शहरांतील हिंदूंना कदाचितच असेल. ते तर केवळ भविष्याच्या संथ गतीचे बळी होते. कोमट पाण्यात बसलेला बेडूक ज्याप्रमाणे हळूहळू वाढत्या तापमानाशी स्वत: जुळवून घेत जातो आणि नंतर त्यातच उकळून मरतो; परंतु उडी मारून बाहेर पडण्याचा प्रयत्नही करत नाही, त्याप्रमाणे लहान-मोठे हजारो हिंदू राज्य कोमट पाण्यात स्वत:ला अनुकूल करत राहिले. मध्ये-मध्ये कुठे उडी मारून बाहेर पडण्याचे प्रयत्नही झालेत, परंतु उकळत्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात ते अधिक प्रभावी सिद्ध होऊ शकले नाहीत.
 
 
दिल्लीत जम बसताच इल्तुतमिशच्या सैन्याने आसपासच्या प्रदेशात हल्ले करणे सुरू केले होते. या प्रारंभीच्या हल्ल्यांचा बळी राजस्थानचे जालौर शहरही होते. या शहराला वेढा घालण्यात आला. दिल्लीत सदुद्दीन हसन निजामी नावाच्या अशाच एका लेखकाने जालौरमध्ये इल्तुतमिशचा प्रतिकार करणार्‍या हिंदू राजाचे नाव उदीशाह नोंदविले आहे. त्याने पराभवानंतर आपले डोके सुलतानाच्या चरणावर टेकवले आणि 100 उंट, 20 घोडे सुलतानाला नजराणा म्हणून पेश केले. निजामी लिहितो की, सुलतान जेव्हा दिल्लीला परतला तेव्हा तिथे गगनचुंबी मंदिरांचे नामशेषही राहिले नव्हते. गैरइस्लामाच्या अंधारातून इस्लामची किरणे फाकली होती. याचा अर्थ हा आहे की, आजच्या दिल्लीतील महरौली भागात शतकांपूर्वीच्या प्राचीन 27 मंदिरांना तोडण्याचे काम पूर्ण झाले होते. तिथेच कुतुबमीनार आणि जिला कुव्वत-उल-इस्लाम मशीद म्हणून ओळखले जाते ती मशीद आकार घेऊ लागली होती. 800 वर्षांनंतर एखादी दृष्टिहीन व्यक्तीदेखील तेथील दगडांना चाचपडून सांगू शकते की, मंदिरांच्या मलब्यातून बनलेल्या या इमारती आहेत.
 
 
निजामीने ‘ताजुल मआसिर’ नावाच्या पुस्तकात, दिल्लीतील सत्तापरिवर्तनाच्या प्रारंभीच्या काळातील (1205-1217) तपशील लिहिला आहे. त्यानुसार, इस्लामच्या अराजक व लोभी सैन्यातील पहिल्या पंक्तीतील सरदारांमध्ये हिंदुस्थानच्या अगणित संपत्तीला समोर बघून ओढाआढ सुरू होती. ते फसवणुकीने प्रदेशांना ताब्यात घेत होते आणि लुटीच्या मालावर कब्जा करत होते. बहुतांश सरदारांची स्वत:च िंसहासनावर बसण्याची आकांक्षा होती. कुणीही स्वत:ला सुलतानाहून कमी समजत नव्हता. आता ज्याच्याकडे शक्ती होती, तो इतरांच्या कत्तलीनंतरच शत्रूच्या संपत्तीचा खरा दावेदार होत होता. सुलतानाला स्वत:च्याच सैन्यासोबत आलेल्या या तुर्की बंडखोरांसोबतदेखील लढावे, त्यांना मारावे, कापावे लागले. इतिहासाचा हा तपशील एक असे चित्र उभे करतो, ज्यात हिंदुस्थान एकप्रकारे शिकारी कुत्रे, लांडगे आणि तडसांच्या टोळ्यांनी घेरला गेला आहे. हे निर्दयी विजेते आपापसातही एक-दुसर्‍याचे लचके तोडू लागले होते. ज्याच्या तोंडात मांस किंवा हाडाचा जेवढा तुकडा आला, तो घेऊन पळत होता आणि बाकीचे त्याच्या नरडीचा घोट घेण्यासाठी त्याचा पाठलाग करत होते.
 
 
इल्तुतमिशनंतर आणखी एका खरीदलेल्या कुरूप गुलामाची पाळी आली. त्याचे नाव होते बलबन. तो जेव्हा सिंहासनावर बसला तेव्हा दिल्लीतून निघणार्‍या त्याच्या शानदार मिरवणुकीत सडकेच्या दोन्ही बाजूला लांबलचक रांगेत चालणारे शस्त्रसज्ज उत्साही जवान जेव्हा गळा फाडफाडून ओरडायचे तेव्हा या नार्‍यांचा आवाज दोन कोस दूर असलेल्या लोकांच्याही मनात दहशत निर्माण करायचा. हिंदुस्तानचे भविष्य निश्चित झाले होते.
(लेखक, ‘भारतात इस्लामचा विस्तार’ या विषयावर गेली 20 वर्षे अभ्यासरत आहेत.)
••