लवकरच येतेय ‘आई कुठे काय करते’ मालिका

    दिनांक :15-Dec-2019
|
 
aai kuthe kay karte_1&nbs
 
आईचं प्रेम म्हणजे व्यापता न येणारं अस्तित्व आणि मोजता न येणारं प्रेम. तिच्या निर्व्याज प्रेमाची परतफेड करणे अशक्य आहे. आपल्याआधी तिचा दिवस सुरु होतो. सर्वांच्या आवडी-निवडी, कामाच्या वेळा, थोरामोठ्यांची काळजी आणि घर जपताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे विसरते. एकाचवेळी आई, सून, मुलगी, पत्नी, वहिनी अश्या अनेक जबाबदाऱ्या ती कोणतीही तक्रार न करता पार पाडत असते. तिच्या कामाचा मोबदला सोडाच पण साधं कौतुकही तिच्या वाट्याला येत नाही. घरासाठी आयुष्यभर राबणाऱ्या या माऊलीचं महत्त्व पटवून देणारी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर २३ डिसेंबरपासून सायंकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे. 
ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली २५ वर्ष संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचे संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसली आहे. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.