स्वागत भूमकेतूचे

    दिनांक :15-Dec-2019
|
डॉ. पंडित विद्यासागर
 
 
आपल्या सूर्यमालेत नवीन पाहुणा आला आहे. तो आहे- ‘बोरिसॉन धूमकेतू!’ आपल्या सूर्यमालेतही अनेक धूमकेतू आहेत. हा धूमकेतू ठराविक वेळी सूर्याजवळ आल्यानंतर आपल्याला दर्शन देत असतात. हा धूमकेतू मात्र दुसर्‍या सूर्यमालेतून आला असावा, असे मानले जात आहे. हे आकाराने लहान असल्याने नुसत्या डोळ्यांनी तो पाहता येत नाही. त्याला पाहण्यासाठी दुर्बिणीचा उपयोग करावा लागत आहे. या धूमकेतूचा शोध ऑगस्ट महिन्यात एका हौशी आकाशनिरीक्षकाने लावला. आजमितीस (08 डिसेंबर) रोजी तो सूर्याच्या जवळ आहे. तरी हे अंतर 15 कोटी किलोमीटर एवढे आहे. 28 डिसेंबरला तो पृथ्वीच्या जवळ असेल. 

ketu_1  H x W:  
 
 
मानवाला धूमकेतू हजारो बर्षापासून माहित आहे. त्याची पहिली नोंद चीनमध्ये सापडते. लॅटीनमध्ये ‘कॉमेट’ या शब्दाचा अर्थ केस असलेला तारा असा होतो. धूमकेतू दिसणे हे चिन्ह वाईट किंवा अमंगल मानले जाई. धूमकेतू दिसल्यास राजा अथवा प्रतिष्ठित व्यक्तिचा मृत्यू होतो अशी धारणा होती. तशीच ती भूकंप, अवर्षण, प्रलय अशा संकटाची नांदी मानली जाई. परग्रहावरून इतर सजीव त्याव्दारे हल्ला करतात असाही समज होता. धूमकेतूविषयी इतर अनेक दंतकथा प्रचलित आहेत. नोर्स मायथॉलॉजीनुसार धूमकेतू म्हणजे यमीरची कवटी आहे. या कथेनूसार ओडिन आणि त्याच्या भावाने यमीरचा वध करून त्याच्या मृत देहातून हे जग निर्माण केले. त्याच्या रक्तापासून समुद्र, कातडीपासून जमीन, स्नायूपासून वनस्पती, मेंदूपासून ढग आणि कवटीपासून आकाश तयार केले. याउलट भारतात इ.स. सहाव्या शतकात धूमकेतू हे खगोलीय घटक असून ते ठराविक कालानंतर दिसतात, अशी खगोल संशोधकांची धारणा होती. ‘वराहमिहिर’ आणि ‘भट्टबाहू’ यांनी त्याचा निर्देश केला आहे. काही संशोधकांनी धूमकेतूूचा भ्रमण काल निश्चीत केला होता. तो निश्चित करण्याची पद्धत मात्र माहित नाही. गिओट्टो या इटालियन संशोधकाने तेराव्या शतकात केलेले हॅलेच्या धूमकेतूचे केलेले वर्णन अचूक आहे. ऑरिस्टॉटल याने केलेल्या वर्णनावर सेनेका यांनी अनेक आक्षेप घेऊन त्यातील फोलपणा सिध्द केला. हे संशोधन सुरू असतानाही काही जण धूमकेतूचा संबंध वाईट घटनांशी लावीत होते. ‘प्लिनी दी एल्डर’ याने धूमकेतूचा संबंध राजकीय अराजक आणि मृत्यू याच्याशी लावला. धूमकेतूला मानवी रुपात पाहून शेपटी म्हणले लांब केस अथवा दाढी समजली जाई.
 
 
पंधराव्या शतकात धूमकेतूचा खगोलशास्त्रीय अभ्यासाला सुरुवात झाली. काही संशोधांनी धूमकेतूचे पृथ्वीपासूनचे अंतर मोजण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला फारसे यश आले नाही. ‘टायको ब्राहे’ या संशोधकाने धूमकेतूचे अंतर मोजण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अंदाजाप्रमाणे धूमकेतू हा पृथ्वी आणि चंद्र याच्यामधील अंतराच्या चारपट अंतरावर असल्याचा अंदाज व्यक्त केला. ‘जीवोव्हानी’ या संशोधकाने धूमकेतूची कक्षा पॅराबोलिक असल्याचे प्रतिपादन केले. गॅलिलिओचे धूमकेतू हे दृष्टिभ्रमातून दिसतात असे होते. अर्थातच ते मान्य होण्यासारखे नव्हते. आयझॅक न्यूटन या प्रसिद्ध शास्त्रज्ञाने धूमकेतूची कक्षा ठरविण्यात रस घेतला. गुरुत्वाकर्षणावर आधारित आकडेमोठीवरून त्याने धूमकेतूची कक्षा ही पॅराबोलिक असल्याचे दाखवून दिले. न्यूटन हा धूमकेतूचे गुणधर्म समजून घेण्यात महत्त्वाचे योगदान देणारा संशोधक ठरला. धूमकेतूविषयी असणारे गूढ कमी करण्यात एडमंड हॅले या संशोधकाने हातभार लावला. त्याने 1337 ते 1698 या कालावधीत दिसलेल्या धूमकेतूच्या कक्षा निश्चीत केल्या. त्यासाठी त्याने न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांताचा आधार घेतला. त्यावरुन 1531,1607 आणि 1682 साली दिसलेल्या धूमकेतूंची कक्षा सारखी आहे, असे दिसून आले. त्यावरून हा धूमकेतू एकच असला पाहिजे, असे अनुमान त्याने काढले. शिवाय तो धूमकेतू 1758 साली पुन्हा दिसेल असे भाकित वर्तवले. हा धूमकेतू गुरू आणि शनी या ग्रहांजवळून जात असताना गुरुत्वार्षणामुळे त्याच्या कक्षेत होणारा बदल ही दाखवून देण्यात संशोधक यशस्वी ठरले. हा धूमकेतू अंदाज वर्तवल्याप्रमाणे 1759 मध्ये दिसला. या धूमकेतूला ‘हेलेचा धूमकेतू’ असे नाव देण्यात आले. त्या नंतरही तो ठराविक कालावधीनंतर दिसला आहे.
 
 
 
एकोणिसाव्या शतकापासून धूमकेतूच्या भौतिक गुणधर्मांचा अभ्यास करण्यात आला. धूमकेतूची शेपटी का तयार होते, याविषयी अनेक अंदाज वर्तविण्यात आले होते. धूमकेतूच्या डोक्याकडील भागात असलेले द्रव्य सूर्यकिरणामुळे गरम होऊन त्याचे वाफेमध्ये रुपांतर होत असावे, असे प्रतिपादन न्यूटन याने केले होते. असेच अनुमान इतर शास्त्रज्ञांनीही काढले होते. वायूरुप झालेले द्रव्य वेगाने मागे फेकल्यामुळे त्याचा परिणाम धूमकेतूच्या गतीवर होऊन त्याची कक्षाही बदलू शकते, हे सप्रमाण सिद्ध करण्यात संशोधकांना यश आले. धूमकेतू हा खडकांच्या तुकड्यांचा बनलेला असून त्याभोवती बर्फ साठलेला असतो, असा समज होता. त्याऐवजी धूमकेतू हा बर्फाचा बनलेला असून त्यात काही खडकांचे तुकडे असावेत, अशी कल्पना पुढे आली. यालाच ‘घाणेरडा बर्फाचा गोल’ असे नाव आहे. ही कल्पना बरीच उचलून धरली गेली. याच कालखंडात धूमकेतूच्या शेपटीमध्ये असणार्‍या द्रव्याचे परीक्षण करण्याकरता मोहिमा आखण्यात आल्या. त्या युरोपीयन स्पेस एजन्सी आणि सोव्हिएट स्पेस एजन्सीने आखलेल्या मोहिमांचा समावेश आहे. युरोपीयन स्पेस एजन्सीने जीओट्टी हे उपकरण आणि सोव्हिएट युनियनने व्हेगा 1 आणि व्हेगा 2 ही दोन उपकरणे वापरली. धूमकेतूच्या डोक्याकडील भागाचे त्यांनी छायाचित्रे घेतली. याच मोहिमेत डोक्याकडील द्रव्य तापून ते जेटप्रमाणे मागे फेकले जाते हेही दिसून आले.
 
 
 
धूमकेतूचा अभ्यास करण्यासाठी अनेक अवकाश मोहिमा आखण्यात आल्या आहेत. त्यातील पहिली मोहिम डीप इंम्पॅक्ट ही होती. 2001 साली राबवलेल्या या मोहिमेत धूमकेतूच्या रचनेचा अभ्यास करण्यात आला. त्यावरुन धूमकेतूच्या पृष्ठभागाचे तपमान 17 ते 71 अंश सेल्सीअस एवढे आढळून आले. वरील आवरणाखाली पाणी आढळले. असेच निरिक्षण 2005 साली करण्यात आले. यावेळी धूमकेतूवर एक लहानसा स्फोट घडवून आणण्यात आला. त्यामुळे पडलेल्या खड्डयाचा निरिक्षणासाठी उपयोग करण्यात आला. 2007 सालीर यूलिसिस ही मोहिम आखण्यात आली. स्टारडस्ट या मोहिमेत नवीनच माहिती पुढे आली. धूमकेतूच्या शेपटीत स्फटिकाच्या स्वरुपात द्रव्य आढळले. असे स्फटिक 1000 अंश सेंटिग्रेड एवढ्या उच्च तपमानाला निर्माण होणारे होते.अशा प्रकारचे द्रव्य विश्वाच्या उत्पत्तीच्या वेळी तयार झाले असावे. याचाच अर्थ धूमकेतूंची निर्मिती ही सूर्यमाला आणि ग्रह यांच्या इतकीच जुनी आहे. धूमकेतूमध्ये असणार्‍या द्रव्याच्या अभ्यासाला त्यामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. युरोपीयन स्पेस एजन्सीने 2014 साली एक अभिनव प्रयोग केला. या एजन्सीने युरियमीह- गेरान्सीमेंको या धूमकेतूवर रोसेटा मोहिमें अंतर्गत एक वाहन थेट धूमकेतूच्या डोक्यावर उतरवले. अवकाशयात्रेच्या इतिहासातील हा पहिलाच प्रयोग होता. या मोहिमांमुळे धूमकेतूबदल खूपच माहिती गोळा झाली आहे. धूमकेतू हे सूर्यमालेचा एक घटक असून त्यांच्या कक्षा खूपच मोठ्या असतात. त्यामुळे त्यांना सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास अनेक लाख वर्ष लागू शकतात. धूमकेतूच्या डोक्याचा आकार काही मीटर ते काही किलोमीटर एवढा असू शकतो. त्यामध्ये प्रामुख्याने बर्फ, धूळ आणि खडकाचे तुकडे असतात. धूमकेतूची शेपटी एक अॅस्ट्रोनॉमीकल युनिट एवढी लांब असू शकते.
 
 
धूमकेतू अवकाशात दूरवर जात असल्यामुळे ते अवकाशातील द्रव्याचे सूक्ष्मकण स्वतःबरोबर आणतात. सूर्याजवळ आल्यानंतर पाण्याच्या होणार्‍या वाफेबरेाबरच कधी कधी घन पदार्थ बाहेर फेकले जातात. असे पदार्थ पृथ्वीच्या वातावरणात आल्यानंतर घर्षणामुळे पेट घेतात. त्यामुळे उल्कावर्षाव होतो. धूमकेतूंचा पृथ्वीवरील जीवनावर परिणाम झाला आहे. पृथ्वी निर्माण झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात अनेक धूमकेतू पृथ्वीवर आदळत होते. हे धूमकेतू स्वतःबरोबर पाणी घेऊन येत. या पाण्यामुळेच पृथ्वीवर समुद्र निर्माण झाले असाही एक सिध्दांत आहे. पृथ्वीवर सजीवांची उत्पत्ती कशी झाली याबद्दल जे मतप्रवाह आहेत, त्यातील एक प्रवाह हा धूमकेतूंशी संबंधित आहे. सजीव निर्माण होण्यापूर्वी जैवरेणूंची उत्पत्ती झाली असे मानले जाते. कदाचित हे जैवरेणू अवकाशात तयार झाले असले पाहिजेत. धूमकेतू ते जेैवरेणू पृथ्वीवर घेऊन आले. त्यावेळी पृथ्वीवरील वातावरण अतिशय उष्ण होते. त्याचप्रमाणे विजांचा लखलखाट होता. या वातावरणात लहान रेणू एकत्र येवून मोठ्या आकाराच्या जैवरेणूंची निर्मिती झाली. त्यातूनच एकपेशीय सजीव निर्माण झाले. धूमकेतूनी केलेले सहाय्य माहीत असूनही त्यांच्याविषयी असणारी भिती कमी होत नाही. याचे कारण पूर्वीच्या काही लिहून ठेवलेल्या गोष्टी. धूमकेतू दिसला की- ‘डे ऑफ जजमेंट’ जवळ आला अशी धारणा आहे. धूमकेतूमुळे दहा प्रकारची संकटे येतात असाही समज आहे. त्यात भूकंप, पूर, नद्यांची पात्र बदलणे, गारपीट, उष्ण आणि कोरडे हवामान, अवर्षण, रोगांची साथ, युद्ध, देशद्रोह आणि महागाई यांचा समावेश आहे. लेखाच्या सुरुवातीला वर्णन केल्याप्रमाणे हा नवा धूमकेतू दुसर्‍या सूर्यमालेतून आला असल्यास तो नवीन माहिती उपलब्ध करून देऊ शकतो. त्यात विश्वनिर्मितीचे महत्त्वाचे दुवे असू शकतात. तसेच माहिती मिळवण्याच्या नवीन शक्यता पुढे येऊ शकतात. त्यामुळे मनातील भिंती बाजूस सारून या पाहुुण्याचे स्वागत करायला हवे.
 
 
(लेखक हे स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)
••