डोपिंग एक शाप!

    दिनांक :15-Dec-2019
|
 क्रीडाविश्व 
 
 महेंद्र आकांत
 
डोपिंग नावाचा शाप अलीकडच्या काळात क्रीडा क्षेत्रांला बसला असून, त्याचा जबर फटका खेळ आणि खेळाडूंना बसू लागला आहे. रशियासारख्या बलाढ्य देशाला याची जबर शिक्षा नुकतीच भोगावी लागली आहे. वारंवार डोपिंग ची प्रकरणे उद्भवत असताना ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या उक्तीप्रमाणे कुणीही धडा घेताना दिसत नाही. डोपिंग म्हणजे नेमके काय? भारताचा विचार केला, तर राष्ट्रीय पातळीवर ‘नाडा’ (राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्था) नावाची एक संस्था आहे आणि जागतिक पातळीवर ‘वाडा’ (जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्था) नावाची. या दोन्ही संस्थांनी काही पदार्थांची यादी जाहीर केली आहे. हे पदार्थ अमली पदार्थ म्हणून ओळखले जातात आणि त्याचा वापर खेळाडू स्वत:मधील शक्ती वाढविण्यासाठी किंवा आपल्या खेळात शॉर्टकट मारून प्रगती करण्यासाठी करू शकतात. म्हणून या दोन्ही संस्थांनी ही यादी जाहीर केली आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे खेळाडूंच्या दुखण्या-खुपण्यावर वापरण्यात येणार्‍या औषधांमध्ये, शिवाय इतरही औषधांमध्ये या पदार्थांचा वापर केला जात असतो. जाणूनबुजून अमली पदार्थांचे सेवन करून खेळात प्रगती साधण्याचा शॉर्टकट कुणी वापरत असेल, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे व त्याला शिक्षाही मिळालीच पाहिजे. मात्र, अनावधानाने दुखण्या-खुपण्यावर औषधांचे सेवन करून खेळाडूंची तपासणी केल्यानंतर त्या चाचणी जर अमली पदार्थ आढळून येत असतील, तर त्याचा सहानुभूतिपूर्वक विचार व्हायला हवा.

doping in sport mahendra
अलीकडेच्या आलेल्या बातमीनुसार, खेळामध्ये आपला दबदबा निर्माण करणार्‍या रशियाला या डोपिंग चा जबर फटका सहन करावा लागला आहे. ऑलिम्पिक ही जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेत खेळायचे तर सोडा, क्रीडाप्रेमींना या स्पर्धेचा प्रत्यक्ष आनंद जरी घेता आला, तरी त्याच्यासाठी जणू ती पर्वणी असते. क्रीडा पत्रकारांचेही स्वप्न असते की, आपण आपल्या कारकीर्दीत एकदा तरी या स्पर्धेचे वृत्तसंकलन करावे. अशा परिस्थितीत मग खेळाडूंच्या स्पर्धेबाबत काय अपेक्षा असतील, याची आपण कल्पना करू शकतो. ऑलिम्पिकमधील सहभाग, हे खेळाडूंचे स्वप्न असते आणि त्यातही त्याने सुवर्ण किंवा इतर पदक प्राप्त केले तर सोने पे सुहागा! अशा या ऑलिम्पिक स्पर्धेला आता रशियाला मुकावे लागणार आहे. यावरूनच आपण कल्पना करू शकतो की, रशियाला आणि रशियातील खेळाडूंना एका चुकीची किती जबर शिक्षा भोगावी लागणार आहे. आज असंख्य विक्रम रशियातील खेळाडूंच्या नावावर आहेत, सुवर्णपदकांची रास या खेळाडूंनी रचली आहे. अलीकडच्या खेळाडूंनी केलेल्या चुकीमुळे आता या आधीच्या खेळाडूंच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले तर नवल वाटायला नको.
डोपिंग चाचणीत वारंवार खेळाडू दोषी आढळत असल्यामुळे ‘वाडा’ने एक मोठा निर्णय घेऊन रशियावर चार वर्षांसाठी बंदी घातली आहे. या निर्णयामुळे सारे क्रीडाविश्व हादरले आहे. या निर्णयामुळे रशियाला आणि रशियातील खेळाडूंना पुढील चार वर्षेपर्यंत सर्वच प्रकारच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांना मुकावे लागणार आहे. केवढी मोठी ही शिक्षा! यात 2020 साली टोकिओमध्ये होणार्‍या ऑलिम्पिक आणि 2022 मध्ये होणार्‍या विश्वचषक फुटबॉल स्पर्धांचा समावेश आहे. जगातील सर्वात मोठ्या या दोन स्पर्धांमध्ये आता रशियाचे संघ आणि खेळाडू दिसणार नाहीत. त्यामुळे एकप्रकारे स्पर्धेतील चुरसच कमी झाली तर नवल वाटायला नको. नुसतेच स्पर्धेत सहभागी होण्यास मुकावे लागणार नाही, तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनापासूनही रशियाला वंचित राहावे लागणार आहे. डोपिंग मध्ये दोषी आढळणे समजू शकतो. मात्र, डोपिंग मध्ये दोषी आढळल्यानंतर त्याचा अहवालच दाबून ठेवणे किंवा त्या संदर्भात चुकीचा माहिती देणे म्हणजे खूपच झाले. हीच बाब रशियाला भोवली आहे. एका लॅबमधून डोपिंग संदर्भातील चुकीचा तपशील देण्यात आल्यामुळे ‘वाडा’ने त्याची गंभीर दखल घेत हा मोठा निर्णय मोठ्या मुश्किलीने घेतला आणि जाहीर केला आहे. ‘वाडा’ने हा निर्णय एकमताने घेताना खेळाडूंना थोडा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. डोपिंग चाचणीत रशियाच्या ज्या खेळाडूंना क्लीन चिट मिळेल त्या खेळाडूंना तटस्थ झेंड्याखाली आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होता येईल, असा निर्णयही ‘वाडा’ने जाहीर केला. एक मात्र खरे की, देशाच्या झेंड्याखाली खेळण्याचा जो अभिमान असतो, तो तटस्थ झेंड्याखाली खेळण्यात नसतो. ‘वाडा’ने हा कठोर निर्णय घेतला असला, तरी रशियाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली आहे. त्यासाठी 21 दिवसांची मुदतही देण्यात आली आहे. रशियाने या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर स्वित्झर्लंडमधील क्रीडाविषयक आंतरराष्ट्रीय लवादापुढे होणार्‍या सुनावणीत ते आपली बाजू मांडण्यात यशस्वी झाले, तरच त्यांना पुन्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धांची दारे उघडू होऊ शकतात. स्पर्धेत बाजी मारण्यासाठी, प्रतिस्पर्धी खेळाडूला मागे टाकण्यासाठी आपली शारीरिक क्षमता जलदगतीने वाढविण्यासाठी खेळाडू हे अमली पदार्थ म्हणजेच उत्तेजक द्रव्य घेत असतात. मैदानावर खेळाडूने कामगिरी बजावल्यानंतर लगेच त्याच्या मूत्राचे नमुने घेतले जातात आणि त्याची चाचणी केली जाते. यालाच डोपिंग चाचणी म्हणतात. ही चाचणी स्पर्धेच्या आधी किंवा स्पर्धेनंतर लगेच किंवा प्रशिक्षण शिबिरातही घेतली जाऊ शकते. या डोपिंग चाचणीचा सर्वाधिक फटका इतर खेळांच्या खेळाडूंना जास्त बसतो. क्रिकेट यापासून दूर असले किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्यात फारसा उत्साह दाखविला नसला, तरी युवा फलंदाज पृथ्वी शॉ याला या डोपिंग ची शिक्षा भोगावी लागली आहे. भारतातही डोपिंग चाचणीत दोषी आढळणार्‍या खेळाडूंचे प्रमाण जास्त आहे. 
त्याबाबत विद्यमान केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी चिंताही व्यक्त केली आहे. देशाची मान शरमेने झुकणार्‍या अशा घटना रोखल्या गेल्या पाहिजेत, असा त्यांचा आग्रह आहे. उत्तेजक द्रव्य घेण्याचे खेळाडूंमधील वाढते प्रमाण लक्षात घेता, त्याला रोखण्यासाठी जागतिक पातळीवर 1999 साली ‘वाडा’ची स्थापना करण्यात आली. त्यानंतर प्रत्येक देशामध्ये ‘नाडा’ संस्था स्थापन केली गेली. या दोन्ही संस्थांतर्फे घेण्यात येणार्‍या डोपिंग चाचणीत खेळाडू दोषी आढळला, तर दोन वर्षांपासून ते आजीवन बंदीपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षेचे हे अधिकार या दोन्ही संस्थांना देण्यात आले आहेत.
असे प्रकार भविष्यात घडू नये किंवा कमी व्हावेत म्हणून खेळाडूंची जबाबदारी तर आहेच, मात्र सर्वाधिक जबाबदारी ही त्यांचे प्रशिक्षक, फिजिओ आणि त्यांचे वैद्यकीय सल्लागार यांची आहे. राष्ट्रीय संघांची घोषणा करताना त्यात या सर्व लोकांचा समावेश केला जात असतो. शिवाय खेळाडूंच्या वैयक्तिक आवडीनिवडीची जोपासना करण्यासाठी एका व्यवस्थापकाचीही नियुक्ती पथकात केली जात असते. एवढे जबाबदार लोक पथकात असताना त्या पथकातील खेळाडू डोपिंग मध्ये दोषी आढळूच कसे शकतात, हा प्रश्न आहे. त्यामुळे खेळाडूंप्रमाणेच या पथकातील अधिकार्‍यांनाही तेवढेच दोषी ठरविले जाणे व त्यांनाही शिक्षेचा भुर्दंड बसविणे गरजेचे आहे.
क्रीडाविश्वातही आपली महासत्ता असावी म्हणून रशिया खेळाडूंना जाणूनबुजून उत्तेजक द्रव्य देत असतो, असा ‘वाडा’चा आरोप आहे. परिणामस्वरूप रिओ ऑलिम्पिकदरम्यान रशियाच्या अनेक खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. हे प्रकरण तेव्हापासूनच नाही, तर त्या आधीपासूनचे आहे. 2014 साली सोची स्पर्धेदरम्यान रशियातील राष्ट्रीय संस्था असलेल्या ‘नाडा’ने डोपिंग अहवालात छेडछाड केली आणि काही तथ्य लपवून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात आल्यामुळे, गेल्या वर्षी दक्षिण कोरियाच्या प्योंगचोंग शहरात झालेल्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान रशियाच्या खेळाडूंना त्यांच्या राष्ट्रीय झेेंड्याखाली खेळण्यास मनाई केली होती. याच प्रकरणी आणखी खोलात चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार डोळ्यांत धूळ फेकणारा असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ‘वाडा’ने कठोर निर्णय घेतलेला आहे. हा सर्व प्रकार लॅबमधून आलेल्या डाटात झालेल्या गोंधळामुळे घडला असल्याचे स्पष्टीकरण भलेही रशियाने दिले असले, तरी मैदानावरील खेळाडूंच्या कामगिरीवरूनही ही बाब लक्षात येऊ शकते. एक मात्र नक्की की, या प्रकरणी संबंधितांनी वेळीच लक्ष घालून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही, तर हा डोपिंग नावाचा कीडा क्रीडाक्षेत्राला आणि खेळाडूंना पोखरल्याशिवाय राहणार नाही!
9881717803