...आता राहुल गांधींना माफी नाही!

    दिनांक :19-Dec-2019
|
दिल्ली वार्तापत्र
श्यामकांत जहागीरदार  
 
राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानावर शनिवारी आयोजित ‘देश बचाओ रॅली’त, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणामुळे देश वाचेल की नाही ते सांगता येणार नाही; मात्र राहुल गांधी यांच्यापासून काँग्रेस वाचवण्याची वेळ आली आहे! राहुल गांधी यांनी आपला पप्पूपणा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे.
 
 
राजकारणात काय बोलायचे यापेक्षा काय बोलू नये, हे समजणे आवश्यक असते. राहुल गांधी यांना नेमके तेच समजत नाही. राहुल गांधी यांनी आतापर्यंत आपल्या वाचाळपणामुळे स्वत:ला आणि काँग्रेस पक्षालाही अनेकवेळा अडचणीत आणले आहे. मात्र, त्यापासून कोणताही धडा त्यांनी घेतला नाही, त्यामुळे आता त्यांनाच धडा शिकवणे आवश्यक झाले आहे.
 
स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. झारखंडमधील प्रचारसभेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’वर टीका करताना राहुल गांधींनी ‘रेप इन इंडिया’ची कोटी केली. मुळात ही कोटीपण अनावश्यक होती. या कोटीवरून भाजपाच्या सदस्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ करत त्यांच्या माफीची मागणी केली. पण, राहुल गांधी यांनी माफी मागण्यास नकार दिला. प्रकरण इथे संपले. कारण संसदेचे अधिवेशनही संपले होते. 

raga_1  H x W:  
 
 
पण, राहुल गांधी यांच्यात खुमखुमी शिल्लक होती. रामलीला मैदानावर आयोजित ‘देश बचाओ रॅली’त राहुल गांधी यांनी, माफी मागायला मी काही राहुल सावरकर नाही तर राहुल गांधी असल्याची घोषणा करत आपला बालिशपणा दाखवून दिला. मी माफी मागणार नाही, एवढे म्हटले असते तरी पुरेसे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तसेच भाजपा आणि मोदी सरकारवर टीका करण्याचा राहुल गांधी यांना अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी या लोकांवर टीका केली असती तरी लोकांनी आक्षेप घेतला नसता.
 
 
पण, राहुल गांधी यांनी कारण नसताना सावरकरांना या वादात ओढून मधमाश्यांचे पोळे आपल्या अंगावर ओढवून घेतले आहे. सावरकरांचे नाव घेत राहुल गांधी यांनी कारण नसताना आपल्या तसेच काँग्रेस पक्षाच्या पायावर दगड पाडून घेतला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पायाच्या नखाची बरोबरीही राहुल गांधीच काय, संपूर्ण नेहरू-गांधी घराणे करू शकत नाही. स्वातंत्र्यलढ्यातील योगदानासाठी सावरकरांना काळ्या पाण्याच्या जन्मठेपेच्या दोन शिक्षा झाल्या.
 
 
पंचतारांकित राजकारण करणार्‍या गांधी-नेहरू घराण्यातील नेत्यांपेक्षा सावरकरांनी देशासाठी केलेला त्याग आणि बलिदान फार मोठे आहे. स्वातंत्र्यलढ्यात सावरकरांनी केलेल्या त्यागाची आणि बलिदानाची बरोबरी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानापेक्षाही कितीतरी जास्त आहे.
 
 
गांधी घराण्यात सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले म्हणजे नेता होता येत असले तरी लोकनेता होता येत नाही. राहुल गांधी तसे लोकनेता असते, तर गांधी घराण्याचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या अमेठी मतदारसंघात त्यांचा पराभव झाला नसता. सावरकरांचा ‘सा’ तोंडातून काढण्यासाठी लायकी असावी लागते. नेहरू-गांधी घराण्यातील नेत्यांनी स्वातंत्र्यलढ्यात जेवढे योगदान दिले, त्याच्या बदल्यात सत्ता मिळवून कितीतरी पटीने त्याची वसुलीही केली. याउलट, सावरकरांच्या संपूर्ण घराण्याने फक्त हालअपेष्टाच सोसल्या.
 
 
म्हणजे तुलनात्मकदृष्ट्या स्वातंत्र्याच्या लढ्यात सर्वात कमी योगदान देत सत्तेचे सर्वाधिक फायदे नेहरू-गांधी घराण्याने लाटले, असे म्हटले तर ते चूक ठरू नये. आपले वय काय, आपली लायकी काय, बौद्धिक पात्रता काय आणि आपण बोलतो काय, याचे भान राहुल गांधींनी ठेवायला हवे होते. पण, राहुल गांधींना भान नाही, हेच तर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे खरे दुखणे आहे.
 
 
लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नाईलाजाने सोनिया गांधींना पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी लागली. फार काळ सोनिया गांधी अध्यक्षपद स्वत:कडे ठेवू शकत नाहीत. त्यांना नजीकच्या काळात अध्यक्षपद सोडावेच लागणार आहे. हे अध्यक्षपद पुन्हा राहुल गांधींकडे सोपवण्याच्या हालचाली काँग्रेस पक्षात सुरू आहेत.
 
 
राहुल गांधींचे नेतृत्व पुनर्स्थापित करण्यासाठी रामलीला मैदानावर या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे राहुल गांधींकडून अधिक प्रगल्भ आणि जबाबदार वागणुकीची अपेक्षा होती. पण, राहुल गांधी म्हणजे काँग्रेस पक्षातील शेखचिल्ली आहे, काँग्रेस पक्षातील अध्यक्षपदाच्या ज्या फांदीवर बसायचे, त्याच फांदीवर राहुल गांधी वार करत असतात. मुळात आपण बसलेल्या फांदीवर वार करून ती तुटली आणि ते स्वत: खाली पडले तरी हरकत नाही, पण त्या फांदीखाली काँग्रेस पक्ष आहे, त्यामुळे राहुल गांधींसकट फांदी खाली पडली, तर त्याखाली दबून जखमी होणारा काँग्रेस पक्ष आणि त्याचे कार्यकर्तेच राहणार आहेत.
 
 
मुळात आपण काय बोलतो, काय करतो, त्याचा राजकारणावर काय परिणाम होईल, याचा विचारच राहुल गांधी करीत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना चोर म्हटल्याबद्दल राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयात माफी मागावी लागली आणि आता नाकाने कांदे सोलत राहुल म्हणतात, माफी मागायला मी काही सावकर नाही. मग सर्वोच्च न्यायालयात माफी मागितली तेव्हा ते काय गांधी नाही तर जिन्ना होते?
 
 
राहुल गांधी यांनी काँग्रेसचे जेवढे नुकसान केले, तेवढे या आधी होऊन गेलेल्या एकाही अध्यक्षाने केले नसावे. राहुल गांधी यांच्यामुळे काँग्रेसचा फायदा तर काही झालेला नाही, नुकसान मात्र सातत्याने होत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष वाचवायचा असेल, तर राहुल गांधींना काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून दूर ठेवले पाहिजे.
 
 
आधी, काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी, अंदमान येथील सावरकर स्मारकावरील नामपटि्‌टका उखडून फेकली होती. त्याचीच शिक्षा म्हणून 2014 च्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने काँग्रेस पक्षाला सत्तेवरून उखडून फेकले होते.
 
 
संपूर्ण देशात आज काँग्रेसचे अस्तित्व कुठे दिसत नाही. तरीसुद्धा काँग्रेसच्या नेत्यांचा सावरकरांबद्दलचा द्वेष कमी होत नाही. काँग्रेसच्या नेत्यांना सावरकरांबद्दल एवढा टोकाचा द्वेष का, ते समजत नाही. सावरकरांच्या कुटुंबीयांना सत्ता मिळाली नाही, मात्र देशातील जनतेचे निखळ प्रेम मिळाले आहे. आजही सावरकरांवर कुणी टीका केली वा त्यांच्याबद्दल कुणी अपशब्द काढला, तरी आपल्या काळजावर ओरखडा उमटल्यासारखे वाटणारे कोट्यवधी भारतीय आहेत. ही सावरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांची उपलब्धी आहे.
 
 
वेगवेगळ्या घोटाळ्यातून आणि भ्रष्टाचारातून अमर्याद पैसा कमावता येत असेल, मात्र जनतेचे प्रेम मिळवता येत नाही, हे काँग्रेसनेत्यांना कधी समजणार नाही. कारण, त्यांच्यासाठी जनतेच्या प्रेमापेक्षा पैसा महत्त्वाचा आहे. त्यामुळे आज काँग्रेस पक्षाची अन्नानदशेसारखी लोकान्न दशा झाली आहे. काँग्रेस पक्ष लोकांसाठी महाग झाला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अद्याप कुणी ‘भारतरत्न’ दिला नसला, तरी ते खर्‍या अर्थाने भारताचे ‘रत्न’ आहेत! काँग्रेसचे नेते सावरकरांवर जेवढ्या द्वेषाने आणि त्वेषाने तुटून पडतील, तेवढे सावरकरांचे महत्त्व वाढणार आहे.
 
 
राहुल गांधींना नाईलाजाने काँग्रेसचे नेते पुन्हा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवू शकतात, मात्र जनतेचे प्रेम आणि लोकमान्यता त्यांना आणि त्यांच्या पक्षाला आता कधी मिळणार नाही. कारण ‘बुंद से गई सो हौद से नही आती!’ आता राहुल गांधींनी या मुद्यावर माफी मागितली तरी जनता त्यांना माफ करणार नाही. कारण, राहुल गांधींच्या या गुन्ह्यासाठी आता माफी नाही...!
 
 
9881717817