रसिकमन पोरकं झालं...

    दिनांक :19-Dec-2019
|
इंग्रजी पहिलीत शिकत असताना, शाळेच्या स्नेहसंमेलनातल्या नाटिकेत मंचावरील प्रवेशापूर्वी पायांचा थरकाप अनुभवणारी, समोर प्रेक्षकांची गर्दी बघून गांगरणारी व्यक्ती, नंतरच्या काळात स्वत:त बदल घडवत नेते. इतका की, मेडिकल कॉलेजमधील प्रवेशापर्यंत नाटक विभागाचा विद्यार्थिप्रमुख काय, नाटक बसविण्यासाठीचा पुढाकार काय, ती तालीम, तो कसलेला अभिनय, संवादांची ती धारदार फेक... कधीकाळी मंचावर जायला घाबरणारा तो ‘हाच’ आहे, यावर विश्वासच बसू नये! पण, खरं सांगायचं तर हे असलं जगावेगळेपण आहे ना, ते डॉ. श्रीराम लागू यांनी आयुष्यभर जपलं. केवळ अभिनयातूनच नव्हे, तर उभ्या हयातीत जपलेल्या, जगलेल्या विचारांतूनही त्याचीच प्रचीती येते. डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू. कलाजगतातलं एक श्रेष्ठ नाव. खरंतर, नाटकातल्या नटांकडे फार आदरानं न बघण्याचा तो काळ. नाही म्हणायला काही कलावंतांनी लोकप्रियता मिळवली होती. पण, लोकप्रियता वेगळी अन्‌ प्रतिष्ठा वेगळी.
 
 
डॉक्टरांनी या दोन्ही गोष्टी आपल्या स्वतंत्र शैलीतून ‘कमावल्या’ होत्या. एरवी, नाक, कान, घसा विषयातील एक डॉक्टर हा. पण, तो रूक्षपणा विसरून, विसरायला लावून जो मायेचा ओलावा त्यांना रसिकांच्या मनात निर्माण करता आला, त्याचे सारे श्रेय त्यांच्यातील सुशिक्षित, सभ्य, सुसंस्कृत अशा तत्त्विंचतकामध्ये दडले होते. प्रेक्षकांनी बेधुंद होत केलेल्या टाळ्यांच्या कडकडाटाने होणारा नाटकाचा शेवट आणि त्यांच्या मनात चिरंतन साकारणारे डॉक्टर लागू अभिनित पात्र, त्याचीच साक्ष असायचे. गेली तब्बल पाच दशकं रसिकमनात विनासायास मुशाफिरी करीत, त्यावर अधिराज्य गाजविणारे डॉ. श्रीराम लागू रसिकमन पोरके करून इहलोक सोडून निघाले आणि मागे उरल्या त्या डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा. 

vidhan _1  H x  
 
 
‘अग्निपंख’, ‘इथे ओशाळला मृत्यू’पासून तर ‘शतखंड’, ‘हिमालयाच्या सावली’पर्यंतची नाटकं आपल्या अभिनयाच्या श्रीमंतीतून समृद्ध करणारा हा रांगडा कलावंत, चित्रपटक्षेत्रातील मुशाफिरीही तेवढ्याच बेफिकिरीनं करून आला. ‘अनकही’, ‘आवाम’ अशा कितीतरी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात रुजल्या त्या या हरहुन्नरी कलावंताच्या वेगळ्या बाजामुळे. काळजाला भिडणारा अभिनय असो की हृदयाला साद घालणारे संवाद, या कलावंतानं सारंकाही मनापासून केलं. ‘नटसम्राट’ साकारण्याचा प्रयत्न नंतरच्या काळात काय कमी लोकांनी केला? दत्ता भटांपासून तर राजा गोसावींपर्यंत, चंद्रकांत गोखल्यांपासून तर मधुसूदन कोल्हटकरांपर्यंत... अगदी परवा नाना पाटेकर, मोहन जोशींनी साकारलेला नटसम्राटही मजबूतच! पण, आजही या नाटकाचं नाव उच्चारलं की, समोर मूर्ती उभी राहते ती डॉ. श्रीराम लागूंचीच! असं वाटतं, डॉक्टरांनी ‘ही’ भूमिका केवळ रंगभूमीवर साकारली नाही, ते प्रत्यक्षात ती भूमिका जगलेत. हे खरं यश आहे. ते केवळ त्यांच्या अभिनयाचं नाही. ते यश, मुळात त्या व्यक्तिमत्त्वाच्या कर्तबगारीचं आहे. बट्रेंड रसेल यांच्या एका प्रसिद्ध विधानाची आठवण या क्षणी होते.
 
 
ते म्हणतात, एक नट हा केवळ एक चांगला अभिनेता असून भागत नाही. अभिनयाच्या सोबतीने इतरही कला, गुणांची जपणूक त्याला करायची असते. ‘‘ॲन ॲक्टर नीडस्‌ टु बी अ ॲथलेट्‌ फिलॉसॉफर.’’ तो कसलेला तत्त्वज्ञ अभिनेता असावा लागतो. एखादा कलावंत मंचावर, चित्रपटातून एखादी भूमिका साकारतो, तेव्हा त्यानं त्या भूमिकेचा अभ्यास सखोल केलेला असतो. त्याचं स्वत:चं तत्त्वज्ञान त्यानं साकारलेल्या भूमिकेतून ध्वनित होत असतं. यासाठी कलावंत कलेनं ओथंबलेला, मनानं हळवा, शरीरानं कसलेला, बुद्धीनं तल्लख... असा ‘सर्वकाही’ असावा लागतो. डॉ. लागू हे या परिभाषेत चपखल बसणारं व्यक्तिमत्त्व होतं. नाटकाचा अख्खा प्रयोग अंगावर पेलून धरण्याची ताकद, कुवत असलेला एक कलावंत काळाच्या पडद्याआड गेला असला, तरी त्यानं आजवर साकारलेल्या प्रत्येक कलाकृतीतून तो रसिकांच्या हृदयात भविष्यातही कायम घर करून राहणार आहे.
 
 
‘‘ही युजड्‌ टू प्ले फॉर द गॅलरी’’ असं वर्णन करावं, अशा भूमिका साकारलेले कलावंत कमी नाही झालेत या रंगभूमीवर. प्रेक्षादीर्घेतील शेवटच्या रांगेतील रसिकांच्या आर्थिक आणि बौद्धिक दर्जाची बूज राखण्याची धडपड करताना, मंचावरील कलेच्या सादरीकरणाच्या पातळीशी तडजोड करणारी मंडळी नाही म्हणायला लोकप्रियता कमावून गेलीच. डॉ. लागूंनी नेमकं इथेच स्वत:ला आवरलं. तसल्या तडजोडी करून लोकप्रिय होण्याचा मोह झुगारला. ‘पिंजरा’च्या निर्मितीतला एक महत्त्वपूर्ण दुवा म्हणून व्ही. शांताराम यांना डॉ. लागू यांची आठवण व्हावी, यातच सारं काही आलं. पिंजराच कशाला, ‘सामना’, ‘सिंहासन’ या सर्वच चित्रपटांच्या यशाची कमान पेलून धरण्याचे सामर्थ्य डॉ. लागूंनी सिद्ध केलं आहे. बरं, केवळ व्ही. शांतारामांनाच या हिर्‍याचे पैलू उमगलेत असं नाही. गुलजारांना ‘किनारा’ साकारताना निवडावासा वाटलेला तो कलावंतही ‘हाच’ होता. ‘मीरा’मधील मीरेचे पिताश्री असोत वा मग ‘देवकीनंदन गोपाला’मधले गाडगेबाबा... हा माणूस रंगभूमी, चित्रपटांतून कितीतरी भूमिका जगला. अक्षरश: जीव ओतून त्यानं ती पात्रं रंगवलीत. वास्तविक जीवनातही डॉ. लागू असेच जीव ओतून जगले. जिथे जन्म झाला त्या सातार्‍यापासून, करीअर घडलं त्या मुंबईपासून, तर आयुष्याचा शेवट अनुभवला त्या पुण्यापर्यंतचा प्रवास एका वास्तववादी कर्मठतेच्या कठोर साधनेचा होता...
 
 
एक चरित्र अभिनेता म्हणून स्वत:ची प्रतिमा निर्माण करताना श्रीराम लागूंनी नटाची प्रचलित संकल्पना स्वत:च्या आचरणातून बदलली. त्याला समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. कलावंतांनीही वाचन करायचं असतं, अभ्यास करायचा असतो, ही संकल्पना त्यांनी आपल्या वर्तणुकीतून सभोवताली रुजविली. मुळात ते स्वत: एक तत्त्वज्ञ होते. चेहर्‍यावरील हावभावांसोबतच शरीर हेदेखील कलेच्या अभिव्यक्तीचे एक माध्यम आहे, याची जाणीव त्यांना होती. म्हणूनच त्यांनी व्यायामातून ते कमावले. ‘‘ ॲन ॲक्टर नीडस्‌ टु बी अ ॲथलेट्‌ फिलॉसॉफर’’ हे बट्रेंड रसेल यांचे म्हणणे खरे ठरायला याहून वेगळे अजून काय हवे होते? व्यक्तिगत जीवनातही त्यांनी स्वत:ची अशी तत्त्वं जपली होती. त्यांची निरिश्वरवादी मतं समाजाला ठावुक नव्हती, असं नाही, पण त्यात आक्रस्ताळेपणा नव्हता नि उथळपणाही जाणवला नाही कधीच कुणाला. कसा जाणवेल? जे होतं ते सारं मनापासून. अभ्यासपूर्ण. परिणाम हा की, त्यांचं निधर्मी तत्त्वज्ञानही सुसंस्कृत वर्तनातून अधिष्ठित झालं. त्यामुळे त्यांच्या या वैयक्तिक मतांचा रंगभूमीवरील त्यांच्या अग्रणी असण्यावर परिणाम झाला नाही कधीच.
 
 
त्यांची मतं पटो वा न पटोत, त्यांच्यातला कलावंत मनाला भावण्यात अडचण अशी निर्माण झालीच नाही कधी. एखाद्या न पटणार्‍या विचाराला विरोधही तात्त्विक पातळीवरून करायचे ते अन्‌ प्रतिक्रियाही संयमित असायची त्यांची. जाणवण्याइतपत बुद्धीची झळाळी असायची त्यात. नाटक ‘आत्मकथा’ असो वा मग ‘अग्निपंख’, विचारांची उंची अन्‌ चिंतनाची खोली, बहरणार्‍या अभिनयातून जाणवायची अन्‌ मग नकळत टाळ्यांचा गजर व्हायचा. ‘देवाला रिटायर करा,’ अशी टोकाची भूमिका घेऊनही डॉ. लागूंच्या निषेधाचा सूर उमटला नाही देव मानणार्‍या समाजात. ‘पुरोगामी नाट्य संस्थे’च्या माध्यमातून नाट्यचळवळ सुरू करणारे डॉ. लागू, आयुष्यभर तळागाळातील माणसाच्या समस्या मांडत राहिलेत. म्हणूनच त्यांच्या जाण्याने सामान्य माणूस हळहळला. ती हळहळ पिंजरामधील ‘मास्तर’साठी होती, ती हळहळ एका ‘नटसम्राटा’साठी होती, अगदी ‘सूर्य पाहिलेल्या माणसा’साठीदेखील होती...