कमी व्याजदरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी सक्रिय

    दिनांक :02-Dec-2019
|
मुंबई,
 मुंबईसह राज्यात आणि राज्याबाहेर कॉर्पोरेट कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या पाच जणांच्या टोळीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केलेली आहे. गेल्या काही वर्षांपासून ही टोळी मुंबईसह इतर राज्यातील व्यापारांना आणि छोट्या मोठ्या व्यावसायिकांना गाठून त्यांना सोशल माध्यमांच्या द्वारे कमीत कमी कागदपत्रांमध्ये कमी व्याजात मोठ्यात मोठे  कर्ज मिळून देण्याचे आमिष दाखवत होती.
 
farud 1_1  H x
 
 
शोहेब कासम चांदीवाला, विजय ग्रोव्हर, हिरेन किशोर भोगायता, शफिक बाबूमियाँ शेख उर्फ मामू आणि रवींद्र बाबुराव कामत या पाच जणांना मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ११ ने अटक केली आहे. गुंतवणूक तसेच व्यवसाय करण्यासाठी पैशांची गरज असलेल्या अनेक कॉर्पोरेट कंपन्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांत वाढल्या होत्या. अशा तक्रारी देशभरातून येत असल्याने गुन्हे शाखेच्या युनिट ११च्या पथकाने तपास सुरू केला. कोट्यवधी रुपयांचे कर्ज मिळवून देणारी मोठी टोळीच यामागे कार्यरत असल्याचे लक्षात आले. ही टोळी मालाड येथील हॉटेल लँडमार्क येथे अशाच एका कामासाठी येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून पाच जणांना अटक केली. अश्या प्रकारच्या आणखी टोळ्या सक्रिय असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.