"ऐकण्याची क्षमता फक्त मोदी सरकारमध्येच!"

    दिनांक :02-Dec-2019
|
नवी दिल्ली,
सध्याच्या काळात कुणालाही सरकारविरुद्ध बोलण्याची परवानगी नाही, हे उद्योगपती राहुल बजाज यांचे वक्तव्य आणि त्यालाच आधार मानून कॉंगे‘सने उठवलेली टीकेची झोड या सर्वांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्‌ यांनी आज सोमवारी लोकसभेत आपल्या घणाघाती भाषणातून सडेतोड उत्तर दिले. टीका असा किंवा सूचना, ते सहर्षपणे ऐकून घेणारे फक्त मोदी सरकारच आहे, असे सीतारामन्‌ यांनी ठासून सांगितले. 
 
nirm_1  H x W:  
 
एका उद्योगपतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत, मोदी सरकारवर टीका केली. या सरकारच्या काळात मत व्यक्त करण्याचा अधिकार नाही, असे या उद्योगपतीने सांगितले. त्यावर अमित शाह यांनी अतिशय सभ्यपणे त्यांना उत्तर दिले. टीका ऐकण्याचीही आमची क्षमता आहे, हेच यातून सिद्ध होते, असे सीतारामन्‌ यांनी कररचना कायदा दुरुस्ती विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले. 
 
मी आजवरची सर्वांत खराब अर्थमंत्री असल्याचे मला सांगण्यात आले. माझा कार्यकाळ जेमतेम सुरू झाला. तो पूर्ण होण्याची प्रतीक्षाही हे लोक करू शकत नाहीत. मी त्यांना म्हटले की, मला तुमच्या कल्पना व सूचना द्या, आम्ही त्यावर नक्कीच काम करू. मात्र, तसेही त्यांना मान्य नाही, असे त्या म्हणाल्या. 
 
मोदी सरकारच्या काळात 11 कोटी शौचालय तयार करण्यात आले. ज्यांना या सुविधा मिळाल्या, ते काय आमचे जावई आहेत काय? आमच्या पक्षात कोणीच जावई नाही. सर्वच जण सामान्य कार्यकर्ता आहेत. 8.1 कोटी शेतकर्‍यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा झाला, ते कोण आहेत? ते अमूक व्यक्तीचे भाऊ किंवा जिजाजी आहेत काय? उज्ज्वला योजना, आयुषमान योजजना व किसान सन्मान योजनेचा ज्यांना लाभ मिळाला, ते आमचे भाऊ आहेत काय? असे त्यांनी एकापाठोपाठ चिमटे त्यांनी काढले. 
 
अधीररंजन चौधरींचाही घेतला समाचार
या सभागृहात मला वेगवेगळ्या नावाने संबोधले जात आहे. प्रश्न विचारायचा आणि त्यावरील उत्तर न ऐकताच पळ काढणे जर एखाद्याच्या डीएनएमध्येच असेल, तर ती व्यक्ती भाजपाची असूच शकत नाही. तसाच डीएनए असलेल्या पक्षाचा तो सदस्य असावा, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांचा समाचार घेतला. 
 
आर्थिक शिस्तीवर आमचा भर
आमच्या सरकारने नेहमीच आर्थिक शिस्तीवर भर दिला आहे. देशात आर्थिक शिस्त लावण्यासाठी काही कठोर पावलेही उचलावी लागतात, असे सांगताना, देशात विदेशी कंपन्यांना आकर्षित करण्यासाठीच कॉर्पोरेट करात कपात करण्यात आली होती, असे त्यांनी स्पष्ट केले. 
 
पीएमसीबँक खातेदारांना मोठा दिलासा
पीएमसी बँकेच्या खातेदारांपैकी 78 टक्के खातेधारकांना त्यांच्या खात्यातील सर्व पैसे काढायची मुभा देण्यात आली असल्याची घोषणा निर्मला सीतारमन्‌ यांनी लोकसभेत केली. ताब्यात घेतलेल्या प्रवर्तकांच्या मालमत्ता भारतीय रिझर्व्ह बँकेला दिल्या जातील. त्या मालमत्तांच्या लिलावातून आलेले पैसे खातेधारकांना परत दिले जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.