पंकजा मुंडें भाजपात होत्या, आहेत अन् राहतील; चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण

    दिनांक :02-Dec-2019
|
मुंबई,
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज्यातले अनेक प्रमुख नेते शिवसेनेच्या वाट्यावर आहेत. पंकजा मुंडे काय करतात, ते 12 डिसेंबरला कळले, असे सूचक विधान केले होते. मात्र, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी पंकजा मुंडें भाजपात राहतील, असे स्पष्टीकरण दिले आहे.

patil _1  H x W 
 
पंकजा मुंडे या भाजपाच्या नेत्या होत्या, आजही आहेत अन् उद्याही असतील, असे म्हणत पंकजा मुंडेंच्या शिवसेना प्रवेशाचे वृत्त चंद्रकांत पाटील यांनी फेटाळून लावले. भाजपाच्या आजच्या स्थितीमध्ये गोपीनाथ मुंडेंचं मोठं योगदान आहे. पंकजा मुंडे या गोपीनाथ मुडेंनी उभारलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्या, नेत्या आहेत. त्यामुळे, भाजपा सोडून इतर कुठल्याही पक्षासोबत त्या जाणार नसल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे आमचे त्यांच्याशी बोलणे झालेले आहे, त्यामुळे मीडियातील या बातम्या केवळ अफवा असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. 12 डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडेंची जयंती असते, त्यामुळे 12 डिसेंबरला काही वेगळी घोषणा होईल, असे नाही. जयंती दिनाच्या कार्यक्रमाची ही माहिती असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
 
चंद्रकांत पाटील यांच्याअगोदरच भाजपा नेत्या खासदार पूनम महाजन यांनीही या वृत्ताचे खंडन केले आहे. पंकजा मुंडे भाजपा सोडणार नाहीत. पराभवामुळे त्या व्यथित असू शकतात. पराभवानंतरच्या अवस्थेतून मी पण गेलेय. त्यामुळे मी त्यांची स्थिती समजू शकते. 12 डिसेंबर रोजी गोपीनाथ मुडेंच्या जयंतीदिनाच्या कार्यक्रमासाठी पंकजा यांचे प्रयत्न सुरू आहेत, त्या फेसबुक पोस्टचा राजकीय अर्थ काढू नका, असे पूनम यांनी म्हटले आहे.