करा विचार वार्षिक शुल्काचा

    दिनांक :02-Dec-2019
|
तुमच्या जीवनशैलीच्या दृष्टीने योग्य ठरणार्‍या, भरपूर सुविधा देणार्‍या क्रेडिट कार्डची माहिती मिळाल्यानंतर तुम्ही त्यासाठी अर्ज करण्याची तयारी करता. क्रेडिट कार्डची नियमावली वाचताना तुमची नजर कार्डच्या वार्षिक शुल्कावर पडते. या शुल्काचा आकडा बघून तुम्ही बिचकता आणि संबंधित क्रेडिट कार्ड घेण्याबाबत संभ्रम निर्माण होतो. क्रेडिट कार्डचं वार्षिक शुल्क भरणं जीवावर येतं. पण म्हणून क्रेडिट कार्ड घेण्याचा बेत रद्द करणं योग्य ठरतं का? अर्थात या प्रश्नाचं हो किंवा नाही असं थेट उत्तर देता येणार नाही. 
 
 
 
विविध बँका क्रेडिट कार्ड जारी करतात. या कार्डच्या माध्यमातून ग्राहकांना असंख्य सुविधा दिल्या जातात, आकर्षक सवलती मिळतात. हे सर्व लाभ मिळवण्यासाठी ग्राहकांना वार्षिक शुल्क भरावं लागतं. आता वार्षिक शुल्काची अट वाचल्यानंतर क्रेडिट कार्ड घेण्याचा निर्णय मागे घ्यावा का? खरं तर नाही. कारण क्रेडिट कार्डचं शुल्क भरल्यानंतर तुम्हाला कोणते लाभ मिळतात हे जाणून घेणं गरजेचं आहे.
 
 
वार्षिक शुल्काच्या तुलनेत अधिक लाभ मिळत असतील तर अशा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करायला काहीच हरकत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक ग्राहकाची क्रेडिट कार्डचा वापर करण्याची पद्धत वेगवेगळी असते. कोणी किराणा सामान खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरतात तर कोणी क्रेडिट कार्डद्वारे विमानाचं तिकिट आरक्षित करण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे आपली गरज आणि क्रेडिट कार्ड देत असलेल्या सुविधा यांचा ताळमेळ बसवून फायद्याचं गणित जुळवायला हवं. तसंच एखादं क्रेडिट कार्ड उपयुक्त असेल आणि त्याचं शुल्क जास्त वाटत असली तरी बँकेतल्या अधिकार्‍यांशी चर्चा करून शुल्कात सवलत मिळवण्याचा पर्याय मिळू शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीचं क्रेडिट कार्ड घेता येईल.