वैद्यकीय खर्चातील वाढीबाबत...

    दिनांक :02-Dec-2019
|
अलिकडच्या काळात वाढता वैद्यकीय खर्च आपलं आर्थिक नियोजन पूर्णपणे बिघडवून टाकतो. कुटुंबातल्या सदस्यांच्या आजारपणाचा खर्च उचलताना नाकी नऊ येतात. त्यातच आजार गंभीर असेल तर आपली सगळी बचत खर्ची पडते. ज्येष्ठच नाही तर कोणत्याही वयोगटातली व्यक्ती आजारी पडू शकते आणि उपचारांचा खर्च काही लाख रुपयांच्या घरात जाऊ शकतो. घरात नव्या पाहुण्याचं आगमन झाल्यावर पालकांचा खर्च वाढतो. त्यातही बाळाचं आजारपण, लसीकरण याचा खर्च बराच जास्त असतो. बाळाचा जन्म झाल्यावर खर्चात भर पडतेच शिवाय बाळंतपणातही बरेच पैसे खर्च होतात.
 
आईची नियमित आरोग्य तपासणी तसंच औषधोपचारांचा खर्च तर असतोच शिवाय महानगरांमधल्या मोठ्या रुग्णालयात प्रसूतीचा खर्च साठ हजार रुपये ते दीड लाख रुपयांच्या घरात जाऊ शकतो. त्यातच सिझेरियन असेल तर हा खर्च वाढू शकतो. म्हणूनच नवविवाहित जोडप्यांनी आरोग्य विमा घेताना त्यात गरोदरपणातल्या खर्चाचा समावेश असल्याची खात्री करून घ्यावी. सर्वसाधारण आरोग्य विमा पॉलिसीत हा खर्च ग्राह्य धरला जात नाही. अगदी मोजक्या कंपन्यांच्या आरोग्य विमा पॉलिसीत गरोदरपणातल्या खर्चाचा समावेश असतो. 
 
 
लहानग्यांची आजारपणं, जंतूसंसर्ग, दुखापती यांच्या उपचारांचा खर्च दीड ते तीन लाख रुपयांच्या घरात जातो. त्यामुळे तुमच्याकडे कौटुंबिक आरोग्य विमा पॉलिसी असेल तर बाळ तीन महिन्यांचं झाल्यावर त्यालाही या पॉलिसीत समाविष्ट करून घ्यायला हवं. काही कंपन्या पॉलिसी नूतनीकरणाच्या वेळी हा बदल स्वीकारतात तर काही कंपन्या बाराही महिने नव्या सदस्याच्या समावेशाची परवानगी देतात. त्यामुळे तुमच्या पॉलिसीच्या नियम व अटी जाणून घ्यायला हव्यात. कौटुंबिक विमा पॉलिसीत नव्या सदस्याचा समावेश झाल्यानंतर विम्याची रक्कम वाढते. यामुळे विम्याच्या हप्त्यातही वाढ होते. ही बाब आपण लक्षात घ्यायला हवी. फॅमिली फ्लोटर योजनेअंतर्गत कुटुंबासाठी दहा लाख रुपयांचं विमा संरक्षण असणं योग्य ठरतं. एवढ्या रकमेचं विमा संरक्षण घेणं शक्य नसेल तर किमान पाच लाख रुपयांचं संरक्षण तरी घ्यायला हवं, असं तज्ज्ञ सांगतात.