हैदराबादच्या घटनेवर विराटची संतप्त प्रतिक्रिया

    दिनांक :02-Dec-2019
|
नवी दिल्ली,
तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबाद येथे महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर हत्या आणि नंतर मृतदेह जाळून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. हैदराबादमधील सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी समाजातील सर्व स्तरातून होत आहे. या संबंधी आता भारताचा कर्णधार विराट कोहली याने आपले मत व्यक्त केले आहे. 

virta _1  H x W 
 
बलात्काराची ही घटना म्हणजे क्रूरतेचा कळस आहे. आरोपींनी कामावरुन घरी परतणाऱ्या महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या केली. नंतर निर्जन स्थळी नेऊन तिचा मृतदेह जाळला. या घटनेबाबत विराटने तीव्र शब्दात आपला निषेध नोंदवला आहे. ‘हैदराबादमध्ये जी घटना घडली ती अत्यंत लज्जास्पद आहे. पण आता बास झालं… यापुढे अशा क्रूर घटनांना आळा घालण्यासाठी समाजातील लोकांनीच पुढाकार घ्यायला हवा आणि अशा अमानवी प्रवृत्ती संपवायला हव्या’, असे ट्विट विराटने केले.
 
 
दरम्यान, या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहम्मद आरिफ, नवीन, चिंताकुंता केशावुलू आणि शिवा अशी आहेत. पोलिसांनी सांगितल्यानुसार, बुधवारी रात्री ९.३५ ते १० दरम्यान ही सगळा प्रकार घडला. पोलिसांनी सांगितले आहे की, सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी डॉक्टरचा मृतदेह ट्रकमध्ये ठेवला आणि हायवेवर काही अंतरावर जाऊन एका पेट्रोल पंपावरुन पेट्रोल आणि डिझेल खरेदी केले. यानंतर एका निर्जनस्थळी जाऊन आरोपींनी मृतदेह फेकून दिला आणि पेट्रोलच्या आधारे पेटवून दिला.