...म्हणून फडणवीस तीन दिवसांचे सीएम झाले; भाजपा खासदाराचे वक्तव्य

    दिनांक :02-Dec-2019
|
बंगळुरू,
'तीन दिवसांचे मुख्यमंत्री' म्हणून विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले जात असतानाच कर्नाटकमधील भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी या संदर्भात नवा गौप्यस्फोट केला आहे. आघाडीच्या सरकारकडून केंद्र सरकारच्या ४० हजार कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांना बहुमत नसतानाही मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे. कर्नाटकात शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा दावा केला. 
 
fadanvis _1  H
 
अनंतकुमार हेगडे म्हणाले, 'महाराष्ट्रात आमचा माणूस फक्त ८० तासांसाठी मुख्यमंत्री झाला होता, हे सर्वांनाच माहीत आहे. नंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही दिला. हे सगळं नाटक त्यांनी का केलं? आपल्याकडे बहुमत नाही हे आम्हाला माहीत होते. तरीही फडणवीस मुख्यमंत्री का झाले, असा प्रश्न सगळे करताहेत. तर त्याचे उत्तर आहे, ४० हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी, असे ते म्हणाले. 
 
 
 
एएनआयच्या वृत्तानुसार हेगडे म्हणाले, केंद्र सरकारचा ४० हजार कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे पडून होता. दरम्यान, फडणवीस यांना माहिती होते की जर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार सत्तेत आले तर ते विकासाच्या नावाखाली या निधीचा गैरवापर करतील. त्यामुळेच हा निधी परत केंद्राकडे पाठवण्यासाठी फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याचे नाटक करण्याचे ठरले. त्यानुसार, फडणवीस हे मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर १५ तासांत त्यांनी ४० हजार कोटी रुपये पुन्हा केंद्राकडे पाठवून दिले.