ऑस्ट्रेलियाला केवळ 'हा' संघ देऊ शकतो मात

    दिनांक :02-Dec-2019
|
नवी दिल्ली,
पाकिस्तानविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने निर्विवाद वर्चस्व राखले. त्यांनी पाकिस्तानला २-०ने धूळ चारली. ऑस्ट्रेलियाची कामगिरी दिवसे न् दिवस अधिकच चांगली होत आहे. या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने ऑस्ट्रेलियाच्या संघाची कौतुक केले आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरात कोणताही संघ पराभूत करू शकत नाही, असे सांगतानाच ऑस्ट्रेलियाला त्यांच्या गृहमैदानावर केवळ भारतीय संघच पराभूत करू शकतो, असे वॉन यांनी म्हटले आहे.

australia _1  H 
ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा कसोटी मालिकेत दणदणीत पराभव केल्यानंतर मायकल वॉनने ट्विट करून टीम ऑस्ट्रेलियाची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. सध्याच्या परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा संघ अनेकांना पराभूत करत आहे आणि अनेक संघांना पराभूत करायला निघाला आहे. मात्र ऑस्ट्रेलियाला मात देण्याचं अस्त्र केवळ टीम इंडियाकडेच आहे, असं वॉनने या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
 
australia _1  H
 
 
अॅडिलेड येथे पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान दुसरी कसोटी दिवस-रात्र खेळवली गेली. यावेळी ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला एक डाव आणि ४८ धावांनी पराभूत केलं. या कसोटीत कांगारुंनी ३ गड्यांच्या बदल्यात ५८९ धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिला डाव घोषित केला होता. यावेळी डेव्हिड वॉर्नरने नाबाद ३३५ धावा केल्या होत्या तर मार्नस लाबुशेन यांनी १६२ धावांचं योगदान दिल्यानं ऑस्ट्रेलियाला धावाचा डोंगर उभा करता आला. त्या तुलनेत दोन्ही डावातील धावसंख्याची बेरीज केली तरी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील धावसंख्येची पाकिस्तानला बरोबरी करता आली नाही.
 
दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या या कसोटी मालिकेत त्रिशतक ठोकण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नरने रचला. पाकविरुद्धच्या ओव्हल कसोटीत सलामीवीर म्हणून त्रिशतक ठोकणारा तो जगातला १६वा तर ऑस्ट्रेलियाचा चौथा सलामीवीर ठरला आहे. तर, पाकिस्तानविरुद्ध त्रिशतक झळकावणारा चौथा फलंदाज ठरला आहे. ओव्हल मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम वॉर्नरनं मोडला आहे. ओव्हल मैदानावर ब्रॅडमन यांनी २९९ धावांची खेळी केली होती. वॉर्नरने ३८९ चेंडूंमध्ये हे त्रिशतक पूर्ण केलं. त्यात ३७ चौकारांचा समावेश आहे. १२० षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून त्यानं दिमाखात हे त्रिशतक साजरे केले. तो ३३५ धावांवर नाबाद राहिला.