चीनमधील कंपन्या भारतात येण्यास उत्सुक

    दिनांक :02-Dec-2019
|
मुंबई,
चीनमधील काही स्थिरावलेल्या कंपन्या भारतात येण्यास उत्सुक आहेत. चीनमधील 12 आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या व्यवसायाचा तळ भारतात हलवण्याबाबत स्वारस्य दाखवले असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्‌ यांनी दिली. केंद्र सरकारने कंपनी करामध्ये कपात केल्यामुळेच या कंपन्या भारतात येण्यास उत्सुक आहेत, असे त्या म्हणाल्या.
 

nirmala sitharaman_1  
 
केंद्र सरकारने कंपनी करात कपात केल्याने हा कर 30 टक्क्यांवरून 22 टक्क्यांवर आला आहे. तसेच, 1 ऑक्टोबरनंतर व 31 मार्च 2023 पूर्वी भारतात नवा उद्योग सुरू करणार्‍या उद्योजकांना हा कर आणखी कमी म्हणजे 15 टक्के लागू असेल. या पार्श्वभूमीवर अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतात येण्यास उत्सुक असल्याचे सीतारामन्‌ म्हणाल्या.
 
कंपनी करामध्ये कपात केल्यानंतर अर्थ मंत्रालयातर्फे एक कृतिगट स्थापन करण्यात येईल व चीनमधून कोणत्या कंपन्या बाहेर पडण्याच्या विचारात आहेत, याची हा गट चाचपणी करेल, असे मी आधिच सांगितले होते. त्यानुसार हा कृतीगट कामाला लागला असून त्याने चीनमधील अनेक कंपन्यांशी संपर्क साधला आहे. आतापर्यंत 12 कंपन्यांनी भारतात तळ हलवण्यास उत्सुकता दाखवली आहे, अशी माहिती सीतारमन्‌ यांनी दिली.