हेगडेंचा ४० हजार कोटींचा दावा धादांत खोटा : देवेंद्र फडणवीस

    दिनांक :02-Dec-2019
|
मुंबई,
महाराष्ट्राकडे असलेले केंद्र सरकारचे ४० हजार कोटी परत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस तीन दिवसाचे मुख्यमंत्री झाले होते, हा खासदार अनंतकुमार हेगडे यांचा दावा फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे. 'हे सगळं धादांत खोटं आहे. महाराष्ट्राने एकही पैसा केंद्राला परत केलेला नाही,' असे फडणवीसांनी म्हटले आहे. या प्रकरणी राज्य सरकारच्या अर्थ विभागाने सत्य समोर आणावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले आहे.
 

fadanvis-hegde_1 &nb 
केंद्राकडून आलेला ४० हजार कोटी रुपयांचा निधी परत पाठवण्यासाठी मी मुख्यमंत्री झालो होतो, या वृत्तात अजिबात तथ्य नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. 'केंद्राला निधी परत करता यावा यासाठी मुख्यमंत्री झालो असा दावा करण्यात आला. त्या दाव्याचे मी खंडन करतो. बुलेट ट्रेन हा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे. त्यात महाराष्ट्र सरकार केवळ भूसंपादनाचे काम करत आहे. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्राला निधी देण्याचा प्रश्नच येत नाही,' असे फडणवीस यांनी सांगितले.
'बुलेट ट्रेन असो किंवा इतर कोणता प्रकल्प, केंद्र सरकारने राज्याकडे पैसा मागितलेला नाही. त्यामुळे राज्यानेदेखील केंद्राला पैसा दिलेला नाही. मुख्यमंत्री किंवा काळजीवाहू मुख्यमंत्री असताना मी असा कोणताही निर्णय घेतला नाही. ज्याला सरकारची आर्थिक निर्णय प्रक्रिया समजते, त्याला ही गोष्ट समजू शकते. अशा प्रकारे पैसा देता-घेता येत नाही', असे माजी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारच्या अर्थ विभागाने सत्य समोर आणावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले.