ई-कॉमर्स कंपन्या आर्थिक दहशतवादी; केटचा आरोप

    दिनांक :02-Dec-2019
|
नवी दिल्ली,
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स कंपन्या आर्थिक दहशतवादी असल्याचा गंभीर आरोप अ. भा. व्यापारी महासंघाने (केट) रविवारी केला. या कंपन्यांकडून सरकारच्या थेट विदेशी गुंतवणुकीसंबंधित कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केटने केली आहे. फ्लिपकार्टच्या प्रवक्त्याने मात्र हे आरोप फेटाळले.
 

e-commerce_1  H 
 
ॲमेझॉन व फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स कंपन्याकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून, त्यामुळे देशातील किरकोळ व्यापार्‍यांना वर्षभरापासून मोठा आर्थिक फटका बसत आहे. या कंपन्यांच्या कारभाराला आर्थिक दहशतवाद हेच विशेषण चपखल बसते.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सवर नेण्याची महत्त्वाकांक्षा योजना आखली आहे. मात्र, या उद्दिष्टपूर्तीत या कंपन्यांचा मोठा अडसर आहे, असा आरोप केटने केला. केंद्र सरकारने या कंपन्यांवर त्वरित कारवाई करावी किंवा या कंपन्यांनी संबंधित कायदे व नियमांच्या चौकटीत राहून व्यवसाय करावा, असे आवाहनही केटतर्फे करण्यात आले आहेत.