शून्य धावात, ६ विकेट्स! महिला गोलंदाजाचा विक्रम

    दिनांक :02-Dec-2019
|
काठमांडू,
नेपाळची अंजली चंद या क्रिकेटपटूने सोमवारी इतिहास रचला. दक्षिण आशियाई गेम्समध्ये महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत अंजलीने एकही धाव न देता ६ विकेट्स घेतल्या आहे. नेपाळमधील पोखरा येथे हा टी-२० आंतरराष्ट्रीय सामनाआयोजित करण्यात आला होता. मालदीव महिला टीमविरुद्ध खेळताना अंजलीने हा विक्रम रचला आहे.

hota _1  H x W:
 
दक्षिण आशियाई गेम्समध्ये महिला क्रिकेट स्पर्धेतला हा पहिलाच सामना होता. नेपाळने मालदीवच्या महिला संघाला अवघ्या १६ धावांमध्ये गुंडाळले. नंतर १६ धावांचे आव्हान अवघ्या ५ चेंडूंमध्ये पूर्ण केले. मालदीवच्या या आव्हानाचा सामना करण्यासाठी मैदानात सलामीला आलेल्या काजल श्रेष्ठने १३ धावा काढल्या आणि तेवढ्या पाच चेंडूत अतिरिक्त चार धावाही मिळाल्या.
२४ वर्षीय अंजलीने या टी-२० आंतरराष्ट्रीय स्पर्धेत २.१ षटकांची गोलंदाजी केली आणि ६ विकेट घेतले. या विक्रमासह अंजलीच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील (पुरुष आणि महिला) सर्वश्रेष्ठ गोलंदाजीची नोंद झाली आहे. यापूर्वी मालदीवच्या मास एलिसाने चीनविरुद्ध ३ धावा देत ६ विकेट्सचा विक्रम रचला होता. हा विक्रम अंजलीने मागे टाकला. पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत भारतीय गोलंदाज दीपक चहरच्या नावे सर्वश्रेष्ठ गोलंदाजीची नोंद आहे. त्याने याच वर्षी १० नोव्हेंबरला बांगला देशविरुद्ध ७ धावा देऊन सहा विकेट्स घेतले होते.
 
 
विशेष बाब ही की अंजलीचा हा पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना आहे. नेपाळने हा सामना ११५ चेंडू राखून १० गडी राखून जिंकला. अंजली स्वाभाविकपणे प्लेअर ऑफ द मॅच झाली. या स्पर्धेत नेपाळ, मालदीप, बांगलादेश आणि श्रीलंकाचे संघ खेळत आहेत.