पंकजा मुंडेंच्या ट्विटरवरून भाजपचा उल्लेख गायब!

    दिनांक :02-Dec-2019
|

pankaja _1  H x 
 
मुंबई,
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.  पुढील राजकीय वाटचाल काय असेल? कोणत्या मार्गाने जायचे हे १२ डिसेंबरला सांगणार अशी फेसबुक पोस्ट केल्यानंतर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून भाजपाच उल्लेख हटविला आहे. त्यामुळे त्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही त्यांच्या पत्रकार परिषदेत अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे.
 

pankaja _1  H x 
पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट शनिवारी व्हायरल झाली होती. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं?, यासंबंधी मी १२ डिसेंबर रोजी सांगणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. पंकजाच्या या पोस्टमुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात असतानाच आज सकाळी पंकजा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून भाजपाचा उल्लेख गायब केला आहे. यापूर्वी पंकजा यांच्या ट्विटर प्रोफाइलमध्ये त्यांच्या मंत्रिपदाचा उल्लेख होता. मात्र, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तो हटवण्यात आला. आता मात्र भाजपा नेत्या किंवा भाजपा संदर्भातला कोणताही उल्लेख त्यांनी अकाउंटवर ठेवलेला नाही. कव्हरपेजवर जनतेला अभिवादन करणारा त्यांचा फोटो आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र आहे.
 
 
 
परळी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पराभव केला. पकंजा यांना पराभवाचा धक्का बसल्याने आता पुढची रणनीती काय?, यासंबंधी त्या १२ डिसेंबर म्हणजेच वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळातील सर्वांना या दिवसाची उत्सुकता लागून राहिली आहे.