मुलाच्या विवाहात वृद्धाश्रमातील वृद्धांचा सन्मान

    दिनांक :02-Dec-2019
|
कुदळे दाम्पत्याने दिला आपुलकीचा परिचय
 
तिवसा, 
अगदी जन्मापासून मायेने पालन, पोषण करून आपल्या लेकराला मोठे करणार्‍या आई-वडिलांना आजही अनेक मुले मोठे झाली की लग्नानंतर वृद्धाश्रमात दाखल करतात. या वृद्धांना अशी अपेक्षासुद्धा नसते. अशी अनेक वृद्ध मंडळी ही वृद्धाश्रमात आपले जीवन जगत असतांना त्या वृद्धाना आपुलकीने सन्मानित करण्याचा एक आदर्श जपला आहे, अमरावती येथील कुदळे दाम्पत्याने.
आपल्या लाडक्या कुणाल नामक मुलाच्या लग्नात अमरावतीच्या मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना कुदळे दाम्पत्याने निमंत्रित केले. या वृद्धांचे आशीर्वाद आपल्या नवविवाहित वर-वधूंना मिळण्यासाठी त्यांनी वृद्धांना निमंत्रित तर केलेच शिवाय वृद्ध माता-पित्यांचा शाल, साडी-चोळी, टॉवेल, टोपी, मिठाई बॉक्स देऊन सन्मान सुद्धा केला. त्याचबरोबर वृद्धाश्रमाचे सर्वेसर्वा राऊत गुरुजी यांचा सुद्धा शाल, श्रीफळ देऊन यथोचित सन्मान केला.


vrudhha_1  H x

वृद्धाश्रमातील वृद्धांप्रति प्रेम व आपुलकीची भावना बाळगून भावना व प्रशांत कुदळे या दाम्पत्याने वृद्धांचा आपल्या मुलाच्या विवाहात यथोचित सन्मान करून समाजाला एक नवी दिशा देण्याचे व यातून ज्याप्रमाणे आई-वडील मुलांना लहानाचे मोठे करून मायेने जपतात, त्याचप्रमाणे आजच्या तरुण मुलांनीही आपल्या आई-वडिलांना वृद्धावस्थेत त्याच मायाळू भावनेने जपले पाहिजे,असे आवाहन सुद्धा याप्रसंगी केले.