प्रिती बारिया हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी

    दिनांक :02-Dec-2019
|
बारीया कुटूंबियांची पोलिस विभागाकडे मागणी
 
भंडारा, 
प्रिती बारिया हत्या प्रकरणातील आरोपींना जिल्हा न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने आजीवन कारावासाला रुपांतरीत केले आहे. या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात न्याय मागण्यासाठी पोलिस विभागाकडून याचीका दाखल करण्यात यावी, अशी मागणी भंडारा शहरातील विविध संघटनांच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
 
 
priti bariya murder case_
 
भंडारा शहरात 30 जुलै 2015 रोजी दरोडा टाकण्याच्या हेतूने घरात शिरलेल्या दोन आरोपींना प्रिती बारिया यांच्यावर वार केला. यात त्या जागीच मृत झाल्या. तर त्यांचा मुलगा भव्य गंभीर जखमी झाला. या प्रकरणी अमीर एजाज शेख व सचिन राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती. प्रकरण न्यायालयात गेले. जिल्हा सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना 30 जून 2018 रोजी फाशीची शिक्षा सुनावली. दोन्ही आरोपींच फाशीची शिक्षा कायम रहावी म्हणून सत्र न्यायालयाने हे प्रकरण उच्च न्यायालयात पाठविले. यावर निर्णय देत 3 नोव्हेंबर 2019 रोजी न्यायालयाने दोन्ही आरोपींची फाशिची शिक्षा रद्द करुन आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.उच्च न्यायालयाच्या निकालातील आरोपींच्या संदर्भात असलेले काही मुद्दा न पटण्यासारखे असल्याने यावर स्थानिक व्यापारी व बारिया कुटूंबियांनी असमाधान व्यक्त केले आहे. दरम्यान या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात यावी, अशी मागणी बारिया कुटूंब व विविध संघटनांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. पोलिस विभागाने यात पुढाकार घ्यावा व लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात याचीका दाखल करावी, असेही निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे. निवेदन देताना रुपेश बारीया, छगनलाल संघानी, ईश्वरलाल काबरा, गुरुमूखदास भोजवानी, धरमवीर खुराणा, किरीट पटेल यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.