सब लेफ्टनंट शिवांगीची गगनभरारी

    दिनांक :02-Dec-2019
|
भारतीय नौदलाच्या ठरल्या पहिल्या महिला पायलट
नवी दिल्ली,
सब लेफ्टनंट शिवांगी यांना नौदलाच्या पहिल्या महिला पायलट बनण्याचा बहुमान मिळवून इतिहास रचला आहे. कोची येथील नौदलाच्या तळावर सध्या त्या कार्यरत आहेत. नौदलाचे सर्वांत शक्तिशाली विमान डोर्निअर सर्विलांसचे त्या उड्डाण करणार आहेत. नौदलाच्या अधिकार्‍यांनी सोमवारी ही माहिती दिली.
 

shivangi_1  H x 
 
नौदलात पहिली महिला पायलट म्हणून नियुक्ती झाल्यानंतर शिवांगी यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, मी अनेक वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत होते. त्यानंतर आज अखेर ही संधी मला मिळाली. माझ्यासाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे. मी आता आपल्या प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी उत्सुक आहे.
 
नौदलाच्या माहितीनुसार, सब लेफ्टनंट शिवांगी यांनी शॉर्ट सर्विस कमिशनद्वारे (एसएससी) 27 व्या एनओसी कोर्समध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर गेल्या वर्षी जून महिन्यात केरळच्या ऐझिमाला येथील भारतीय नौदल अकादमीतून त्यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले. दरम्यान, त्यांनी दीड वर्षे पायलटचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी शिवांगी यांची नौदलाची पहिली महिला पायलट म्हणून घोषणा करण्यात आली.