पाणीपुरी विकणाऱ्या तरुणाची भारताच्या अंडर-१९ वर्ल्ड कप टीममध्ये निवड

    दिनांक :02-Dec-2019
|
 
मुंबई, 
पुढच्या वर्षी होणाऱ्या अंडर-१९ वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे. १५ सदस्यांच्या या टीमचे  नेतृत्व उत्तर प्रदेशमधल्या मेरठच्या प्रियम गर्गला देण्यात आले आहे. अंडर-१९ वर्ल्ड कप १९ जानेवारीपासून ७ फेब्रुवारीपर्यंत दक्षिण आफ्रिकेत खेळवला जाणार आहे. अंडर-१९ वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममध्ये मुंबईच्या यशस्वी जयस्वालचीही निवड करण्यात आली आहे.
 
yashashwi jaswal _1 
 
नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना यशस्वी जयस्वालने द्विशतक केले होते. स्थानिक क्रिकेटमध्ये केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे यशस्वीची टीम इंडियाच्या अंडर-१९ वर्ल्ड कप टीममध्ये निवड झाली आहे.
 
मूळच्या उत्तर प्रदेशच्या असलेल्या यशस्वी जयस्वालची कहाणी संघर्षमय आहे. यशस्वीचे क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न होते. भदोहीमध्ये त्याच्या वडिलांचे छोटे दुकान आहे. वडिलांकडे क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यासाठी पैसे नसल्यामुळे यशस्वी १०-११ वर्षाचा असताना मुंबईत काकाकडे आला. काकाची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. अखेर काकांच्या सांगण्यावरून यशस्वीला मुस्लिम युनायटेड क्लबने आपल्या टेंटमध्ये राहण्याची परवानगी दिली. याठिकाणी आणखी काही मुलंही राहत होती.
 
यशस्वी जयस्वालला वडिल पैसे पाठवत होते, पण त्याला हे पैसे पुरत नव्हते. त्यामुळे त्याने क्रिकेट खेळून उरलेल्या वेळेत काम करायचे ठरवले. पैसे कमवण्यासाठी यशस्वी पाणी पुरी आणि फळं विकायचा, याच्यातून त्याला थोडेफार पैसे मिळायचे. या पैशातून यशस्वी दिवसाचा खर्च भागवायचा.
 
काळबादेवी येथील एका डेअरीमध्ये तो रात्री झोपायचा, पण डेअरीमधून त्याला काढून टाकण्यात आले. 'मी टेंटमध्ये यासाठी गेलो कारण मला डेअरीतून काढून टाकण्यात आले होते. संपूर्ण दिवस क्रिकेट खेळ्यानंतर मला आरामाची गरज होती. एक दिवस त्यांनी माझं सामान बाहेर फेकून दिले. कारण मी त्य़ांची मदत करु शकत नव्हतो', असं यशस्वीने सांगितलं.
 
तीन वर्ष यशस्वी टेंटमध्ये राहिला. वडील गरज असेल तसे पैसे पाठवत होते. पण यशस्वीला अधिक पैशांची गरज होती म्हणून तो आझाद मैदानमध्ये राम लीला दरम्यान पाणीपुरी आणि फळं विकायचा.